मैत्री म्हणजे काय? मित्र कसा असावा?

         सर्वप्रथम सर्वांना मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा मैत्रीदिन म्हणून पाळला जातो. मित्रांची यादी करायला सांगितली, तरआपली प्रत्येकाची  यादी खूप मोठी होईल. पण जेव्हा खरंच वेळ येते, तेव्हा त्यातले किती कामाला येतात?  याचा विचार केला तर मात्र पदरात काहीच पडत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, 'सारा गाव मामाचा एक नाही कामाचा'. जो कामाला येतो तोच खरा मित्र. A Friend in need is a friend indeed. ही इंग्रजी म्हण त्यासाठीच तर निर्माण झाली.

what-friendship-means, what is friend
what-friendship-means


            भारतीय तत्वचिंतनाने मित्र कोणाला म्हणावे? याविषयी फार मूलगामी चिंतन केले आहे. त्याकडे जर पाहिले, तर आपल्या लक्षात येते, की ज्यांना आपण मित्र समजतो ते फक्त आपले परिचित आहेत, मित्र नाहीत. काय आहेत नेमकी मित्राची लक्षणे? चला सविस्तर जाणून घेऊयात.

नीतिशतक  या आपल्या प्रसिध्द ग्रंथात भर्तृहरी मित्रांची लक्षणे सांगताना म्हणतात,

पापान्निवारयति योजयते हिताय।

गुह्यं निगूहति गुणान् प्रकटीकरोति।

आपद्गतं च न जहाति ददाति काले।

सन्मित्रलक्षणमिदं निगदन्ति सन्ताः।।

अर्थात जो आपल्याला पापांपासून दूर ठेवतो, आपल्या हिताची योजना करतो, आपली गुप्त रहस्य गोपनीय ठेवतो, आपल्यातील सुप्त गुण प्रकट करतो, आपत्ती मध्ये साथ सोडत नाही आणि आवश्यकता पडल्यास धन आदि देऊन मदत करतो - चांगल्या मित्राची ही लक्षणे संतांनी सांगितलेली आहेत. आता या लक्षणांवर जरा प्रकाश  टाकू.

पाप दूर करणारा

कोणताही बेवडा कधी स्वत:हून दारू प्यायला सुरू करीत नाही. सुरूवातीला त्याचे मित्रच त्याला पाजतात. त्याचे व्यसन हद्दीबाहेर गेल्यावर त्याच्या स्त्री आणि संपत्तीवर डोळा ठेवणारे मित्रच असतात. तंबाखू खायला आपल्याला कोण शिकवतात? वेश्यावस्तीत जाणारा कधीच स्वतहून जात नाही. त्याला तिकडे कोण नेतं? जर ही कामं मित्र नावाच्या व्यक्तीकडून होत असतील तर त्याला मित्र म्हणावे का? याचा आज नक्की विचार करण्याची वेळ  आहे.

मित्राने मित्राला पाप करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. आपले मित्र, त्याला काय होतंय असं म्हणत पापाला जर प्रोत्साहन देत असतील तर?  इतिहासात कृष्ण-अर्जुन आणि कर्ण-दुर्योधन ही दोन उदाहरणे मैत्रीच्या बाबतीत प्रसिध्द आहेत.

  कोणतंही पाप अर्जुनाच्या हातून घडत नाही, त्याला कारण सज्जनाशी मैत्री. सज्जन असूनही कोणतंही पुण्यकर्म कधी कर्णाला करता आलं नाही, याचं कारण दुर्योधनाशी मैत्री. आपल्या डोळ्यादेखत भरसभेत एका स्त्रीला निर्वस्त्र  करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे पाप आहे हे न कळण्याइतका अडाणी कर्ण नक्कीच नव्हता.  आपला मित्र कोणत्या कॅटेगरीत आहे कृष्ण की दुर्योधन याचा आजच्या दिवशी नक्की विचार करावा.

 

हित पाहणारा

खरा मित्र आपल्या मित्राच्या हिताचाच विचार चोविस तास करत असतो. त्याशिवाय दुसरा विचार त्याच्या मनाला शिवत नाही. कर्णाच्या मनात स्वप्नातही दुर्योधनाच्या अहिताचा विचार आला नाही. आपल्या मैत्रीखातर त्याने जीव दिला पण आपला मैत्रीधर्म शेवटपर्यंत निभावला. त्याच्यासाठी त्याची मैत्री हाच सर्वोच्च धर्म होता.

याउलट दुर्योधनाच्या मनात कधी स्वप्नातही कर्णाच्या हिताचा विचार आला नाही. कर्ण मरत असेल तरी हरकत नाही, पण माझे हित व्हायला हवे असा विचार दुर्योधनाने कायमच केलेला दिसतो. आपल्याही मैत्रीत बर्याचदा असे अनुभव आपल्याला येताना दिसतात. एक मित्र आपलं सर्वस्व उधळून देतो आणि दुसरा मात्र आपल्या स्वार्थासाठी कायम मैत्रीचा ढाल म्हणून उपयोग करतो.

कृष्ण आणि अर्जुनाच्या मैत्रीचा विचार केला तर त्यामध्ये दोघांच्या उत्कर्षाचा आणि धर्माचा विचार आहे. जीवनातलं असं कोणतंही गुढ रहस्य नाही जे कृष्णाने अर्जुनाला सांगितले नाही. गीतेमध्ये भगवान म्हणतात,

स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः।

भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्।।

तू माझा मित्र आहेस म्हणून हे अत्यंत पुरातन रहस्य मी तुला सांगत आहे. ते रहस्य अर्जुनाच्या निमित्ताने सार्या जगाचा आजही उध्दार करीत आहे-श्रीमद्भगवद्गीता. अर्जुनही मित्राला इतका समर्पित आहे की तो म्हणतोय, करिष्ये वचनं तव. तू सांगशील तेच करीन. आयुष्यभर अर्जुन श्रीकृष्णाला विचारून जे काम करतो त्यात कायम यशच मिळवतो.

आपले रहस्य गोपनीय ठेवणारा

खरा मित्र आपल्या मित्राचे वीक पॉइंटस् कधीच कोणाला सांगत नाही. आपल्या प्रेमभंगाची गावभर जाहिरात करणारी आपली मित्रमंडळीच असतात. वास्तविक मित्राची कमजोरी जो भरून काढतो तो खरा मित्र. जो मित्राच्या कमजोरीचा स्वार्थासाठी वापर करतो त्याला मित्र कसे म्हणणार?

सुप्त गुण जागृत करणारा

प्रत्येक व्यक्तीमध्ये अनंत प्रकारच्या विकासाच्या संभावना असतात. फक्त त्या शक्यतांना बळ देणारं कोणीतरी आयुष्यात असलं पाहिजे. हे कोणीतरी म्हणजे मित्र असतात. कितीतरी यशस्वी लोकांच्या जीवनाचा धांडोळा घेतला तर ही बाब प्रकर्षाने जाणवते. मित्राने आग्रह धरला म्हणून एखादी गोष्ट कुणीतरी करतो आणि ती गोष्टच नंतर त्या व्यक्तीचे जीवितकार्य बनते. अशी लाखो उदाहरणे आपल्याला सापडतील.

कधीकधी या उलटही घडतं. उदाहरणार्थ एखादा चांगला गात असेल तरी जाणून बूजून त्याच्यावर टीका करून त्याला त्या चांगल्या कामापासून परावृत्त करणारीही माणसे असतात. त्यांनाही आपण आपल्या मित्राच्या यादीत स्थान देत असू तर कठीण आहे.

संकटात साथ सोडत नाही

मुळात जर आपले मित्र आपल्या हातून पापा होऊ देत नसतीलआणि आपल्या हिताचीच कायम योजना करीत असतील तर आपल्यावर संकटं येतील याची शक्यता फारच नगण्य. तरीही यदाकदाचित असा एखादा प्रसंग उद्भवलाच तर मित्र कायम आपल्या खांद्याला खांदा देऊन उभा असतो. मित्र आपली जबाबदारी न सांगता पार पाडत असतो.

कराविव शरीरस्य नेत्रयोरिव पक्ष्मणी|

अप्रोक्तमपि कुर्वंति तन्मित्रं मित्रलक्षणम्||

देहाचे काम जसे हात, डोळ्यांचे रक्षण जसे पापण्या (आदी) न सांगताच करतात, तसेच मित्रकार्य हे न सांगता करणारा तो मित्र व तसे करणे हे मित्रलक्षण होय. अशा प्रकारची मित्राची लक्षणे संतांनी सांगितलेली आहेत असे भर्तृहरी म्हणातात. याचा अर्थ हे मी सांगतोय असा त्यांचा दावा नाही. हे भारतीय विचारवंतांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून आमचे तुकाराम महाराज देखील म्हणतात, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. हे सगळं तत्वज्ञान ऋषीप्रणीत आहे.

सोमसेनकृत त्रैवार्णिकविचीर या ग्रंथात मित्रलक्षण सांगताना असे म्हटले आहे,

अमुत्रात्र हितंकारी धर्मबुध्दी प्रदायक:

गुणवाची परोक्षेsपि  स सुहृत्कथितो बुधै:।।

इह आणि परलोकातही जो आपल्या मित्राच्या हिताचाच विचार करतो, जो धर्मानुसार वागण्याची बुध्दी देतो, जो आपल्या अनुपस्थितीत आपल्या पाठीमागेही फक्त आपल्या गुणांचेच वर्णन करतो त्याला विद्वान लोकांनी मित्र असे म्हटले आहे.

            अशा प्रकारचा मैत्रीभाव प्रत्येक जीवाविषयी आपण अंत:करणात बाळगला पाहिजे. त्यासाठीच माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात,

तैसी आघवियांचि भूतमात्रीं । एकपणें जया मैत्री ।
कृपेशीं धात्री । आपणचि जो ॥

            आमची आई नेहमी म्हणत असते, सर्वांचे कल्याण होऊ दे, त्याच्या पाठीमागे आपलेही कल्याण आपोआपच होते. आजच्या मैत्रीदिनाच्या निमित्ताने उपरोक्त लक्षणांनी युक्त मित्र आपणा सर्वांना मिळोत याच सदिच्छा.  माऊलींच्या शब्दांत, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे।

            सर्वांचं सर्वांशी असं मैत्रीचं नातं विकसित व्हावं. तसं झालं तर जगाच्या सार्या समस्या, सारे भेदभाव नाहीसे होतील आणि माऊलींची प्रतिज्ञा सत्य होईल,

अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।

रमेश वाघ, नाशिक.

मो. ९९२१८१६१८३

 

 आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या

  1. खूप छान लेख। पण कर्णाने खरी मैत्री जपली। मैत्रीत त्याने धुर्तपणा केला नाही।

    उत्तर द्याहटवा
  2. खरंच खूप छान लेख आहे सर्वांनी आवर्जून वाचन करावे.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान दाखले दिले आहेत.. .
    सुंदर लेख!!

    उत्तर द्याहटवा