कर्मफळ का सोडायचं?

         बाजरीची सोंगणी करायची होती. गावात मजूर मिळत नव्हते. अधिकची मजूरी कबूल करून बाहेर गावावरून मजूर आणले. दुसर्या दिवशी मजूर रानात पोचताच पाहतो तर काय? सगळी बाजरी रानडुकरांनी लोळविली होती. मजुरांना मजुरी द्यावीच लागली. रानडुकरांनी नासाडी करू नये म्हणून मजूर लावले, पण उपयोग झाला नाही. डोळ्यादेखत हिरवं स्वप्न मातीमोल झालं. मी वडलांना म्हणालो, "आण्णा लई नुकसान झालं. सगळे कष्ट वाया गेले." आण्णा म्हणाले "जे हातचं होतं ते आपण केलं. ह्याला आपला इलाज नाही. पांडुरंगाची इच्छा."

आमचं भाग्य आम्ही अशा मातीत जन्माला आलो की, जिथे आमच्या संतांनी जगातलं सर्वोच्च तत्वज्ञान आपल्या रक्तामांसाच्या खतानं रूजवलंय. अडाण्यातला अडाणी माणूस देखील वेदांचं तत्वज्ञान लोकभाषेत बोलतो. वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाची साधला ।। घडाभर ताक घुसळून पसाभर लोणी काढावं, त्याप्रामाणे विचारांचं नवनीत आमच्या संतांनी आमच्या तळहातावर ठेवलं. निष्काम कर्मयोग सांगणारी वेदोक्ती, लोकोक्ती बनली. खेड्यात जाऊन पहा, साध्या साध्या म्हणींमध्ये जीवनदर्शन सामावलेलं आहे.

मला अमूक गोष्ट मिळाली, तर मी सुखी होईन, नाहीतर मात्र माझ्या जीवनाला काही अर्थच नाही, अशा प्रकारची धारणा उरात बाळगून आपण जगत असतो. कार्य करणं आपल्या हातात आहे, परंतु त्या कार्याचा काय आणि कसा परिणाम व्हावा, ते आपल्या हातात नाही, हे लक्षात आल्यावर जीवनाचा यथार्थ दृष्टीकोन विकसित होतो. गीता सांगते कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन | तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. फळावर तुझा अधिकार नाही. अनुकूल फळाच्या अपेक्षेने कार्य करू नकोस. प्रतिकूल फळाच्या भीतीने कर्मापासून विचलीतही होऊ नकोस.

फळाची अपेक्षाच धरायची नसेल, तर मग कर्म तरी कशाला करायचे? कर्म करायचेच असेल, तर फळ  का सोडायचे? वास्तविक कर्म केल्याशिवाय जीवनव्यवहार चालू शकत नाही. प्रत्येक क्षणी आपण कर्मच करीत असतो. आता तुम्ही हा लेख वाचताय हेही तुमचं कर्मच आहे.  पेरलेलं उगवणारच. त्यासाठी पेरलेलं रोज उकरून पाहण्याची गरज नसते. फळ देणं हा कर्माचा स्वभावच आहे. आपण आज जे आहोत तो आपल्या पूर्वकर्मांचाच प्रताप आहे. यापुढे जे मिळणार त्याची बेगमी आपण आजच्या कर्मातून करीत असतो. केलेलं वाया जात नाही. फुकट काही मिळत नाही. माऊली म्हणतात, एर्‍हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन ।

श्रीमद्भगवद्गीता अध्यात्मिक वा धार्मिक असण्यापेक्षा अधिक मानसशास्त्रीय आहे. भगवान श्रीकृष्ण जसा अर्जुनाच्या रथाचा चालक आहे, तसा आमच्या मनाचाही चालक व्हायला हवा.  बुध्दीच अपरिपक्व असेल, तर तत्वज्ञान डोक्यात उतरत नाही. परंतु अभ्यासाअंती तुमच्या लक्षात येईल की, जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर त्यासाठी निष्काम भावनेनं कार्य करणं  आवश्यक आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, “Thou hast the right to work but not to the fruits thereof. If you want to do a great or a good work, do not trouble to think what the result will be.” परिणामाची काळजी न करता संपूर्ण समर्पित  भावाने कार्य करणं हीच यशाची गुरूकिल्ली आहे.

मला काय मिळेल, हेच डोक्यात असेल, तर  कर्तव्यावरून आपलं लक्ष उडतं. एकाग्रता भंग  पावते. शंभर टक्के प्रयत्न केले जात नाहीत. उदाहरणार्थ लहान मूल धावताना बहूतेकदा धडपडतं. आई म्हणते, "पुढे काय बघतोस, पायाजवळ बघून चालत जा." फळावर लक्ष केंद्रित झाल्यानं प्रयत्न कमी पडतात. त्यामुळे अपेक्षित परिणाम साधत नाही. त्यातून निराशा येते. निराशेतून व्यसनाधिनतेपासून आत्महत्येपर्यंतच्या नकारात्मक प्रतिक्रिया उमटतात. अनेकदा  अपयश पचूनही जातं, पण यश पचवणं बर्याचदा कठीण होऊन बसतं. खाल्लेलं पचलं नाही की, अपचन होतं. अपरिपक्व व्यक्तीला अनपेक्षित यश मिळालं की, त्याचा राक्षस बनतो. यश मिळालं की वासना वाढते, अपयश आलं की, निराशा जन्म घेते. जो लाभ आणि हानी या दोन्ही स्थितीत स्थिर राहू शकतो, तोच कर्मयोगी.

सत्कर्मासाठी सत्कर्म करायला पाहिजे. बर्याचदा सत्कर्माचा हेतू असत् असेल, तर सत्कर्मही असत् बनून जातं. आज अगदी यज्ञीय कार्याचाही इव्हेंट बनवला जातो. शंकराचार्य म्हणतात, चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तूपलब्धये । चित्तशुध्दीसाठी केलं जातं तेच खरं कर्म. ज्या कर्माने आपली वृत्ती मलिन होत असेल, त्याला  सत्कर्म म्हणता येत नाही. सध्या तथाकथित सत्कर्म करणार्यांचा लोंढाच आलेला आहे. लोंढ्याने फायदा होत नाहीच, जमिनीची धूप मात्र होते. कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वच नावासाठी काम करणारे. ज्यांनी वेद लिहीले त्यांनी त्यावर आपलं नाव लिहीलं नाही. पण आजकाल प्रत्येक लिहिणारा नव्वद टक्के कल्पना दुसर्याच्या कॉपी करूनही ग्रंथाला स्वत:चं नाव देतो. तुकोबांसारखा नव्हे माझी वाणी पदरीची।  असं म्हणण्याचा प्रामाणिकपणा किती जणांत आहे?

आपण जे जे काही करणार आहोत त्याचं कर्तृत्व आपल्या खांद्यावर घेतलं की, आपण बांधले जातो. बंधन कोणतंही वाईटचं. फळाची चिंता सोडली की स्वातंत्र्याचा अनुभव येतो. स्वातंत्र्य विकासाला  मदत करतं. परतंत्र विकसित होऊ शकत नाही. फळाच्या आशेशी बांधलं जाणं म्हणजे परतंत्र होणं. उद्या मला काय मिळेल याची स्वप्न रंगवताना आज काय करायचयं, याचाच विसर पडतो. वर्तमान हातचा निसटतो. भविष्य तर ना कोणाला कळते, ना चुकते. कर्तव्य हातचं आहे. फळाची चिंता सोडणं हाच राजमार्ग. निष्काम कर्मयोग्यांविषयी माऊली म्हणतात, ते कर्मी तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती ।आणि यातायाति लोपती । अर्जुना तयां ॥

   रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

कर्मफळ का सोडायचं, why-to-go-off-fruit-of-work
why-to-go-off-fruit-of-work


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या