थोडंतरी द्यावं माणसानं


कोणाचा उपकार घेतला की, त्याचं ओझं उपकार घेणार्याच्या मानगुटीवर बसतं. त्यामुळे कोणाचा उपकार घेऊ नये, अशी आपली सनातन परंपरा. फुकटचं खाऊ नये हा संस्कारही त्यातलाच. ज्याची स्वत:च्या पोटापुरतं कमवायची ताकद नाही, त्यानेच अन्नछत्रामध्ये जेवावं. सामर्थ्य असूनही जर फुकटचं खाल्लं, तर पाप लागतं अशी शास्त्रकारांची शिकवण आहे. आपलं जितकं सामर्थ्य असेल, तितकं देण्याचा प्रयत्न करावा. म्हणूनच सर्वस्वाचं दान करूनही आमचे तुकोबाराय म्हणतात, आता उरलो उपरकारापुरता। केलेला उपकार आत्मसंतुष्टी देतो. घेतलेला उपकार आत्म्याला क्षीण बनवतो. श्रम केल्याशिवाय खाऊ नये. याला श्रमप्रतिष्ठा म्हणतात. खरंतर श्रमामुळे आपल्याला प्रतिष्ठा मिळत असते.

Do-some-charity, थोडंतरी द्यावं माणसानं
Do-some-charity

जन्माला आल्यापासून आपण फक्त घेतोच आहोत. आपण समाजापासून काय घेतलं आणि काय दिलं याच्या याद्या केल्या तर आपल्या लक्षात येतं की, आपण घेतलेली यादीच मोठी आहे. माणूस क्षुल्लक प्राणी आहे. त्याने घेतलेल्या प्रत्येक उपकाराची परतफेड करायचं मनापासून ठरवलं, तरी त्याला ते शक्य नाही. सरासरी साठ वर्षांच्या आयुष्यात फक्त आपण घेतलेल्या ऑक्सीजनचाच विचार केला, तरी  त्याचं बील आपल्या कमाईत भागणार नाही. कितीही क्षुल्लक आणि खुरटं झुडप म्हटलं, तरी त्याचं जीवन आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण फक्त घेत जातो. झुडूप देत जातं.

रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसल्यावर त्याला कोणी वाढवलं असेल, हा विचारही आपल्या मनात येत नाही. मेंढी चरता-चरता आपल्या लोकरीतून बीजप्रसार करते. कावळा विष्ठेतूनही वृक्षारोपण करतो. आपण काय करतो? आजपासून घरात आणलेल्या आंब्याच्या कोया फेकू नका. त्याची रोपे बनवा. जिथे जागा असेल तिथे लावा. फिरायला जाताने सोबत चिंचोक्यासारख्या बिया ठेवा. थांबाल तिथे उकरून लावा. बोरी, बाभळी, सिताफळं, चिंचा असली झाडं एकदा उगवली की, कमी पाण्यातही जगतात. कुठल्यातरी अनोळखी रस्त्यावर तुम्ही पेरलेल्या बीचं वाढलेलं झाड जर तुम्हाला पहायला मिळालं, तर तो तुमच्यासाठी ब्रह्मानंद असेल. आपण सृष्टीला फार काही देऊ शकत नाही, पण तिच्या उपकाराची जाण ठेवली, तरी सृष्टीदेवता प्रसन्न होईल. लेकराने बापाच्या ताटात जेवताना त्यातलाच एक घास बापाच्या तोंडात भरवल्यावर बापाला आनंद होतो. तसा निसर्ग खुलेल या साध्या कृतीनेही. माऊली म्हणतात, बाळक बापाचिये ताटीं रिगे । रिगौनि बापातेंच जेवऊं लागे । की तो संतोषलेनि वेगें । मुखचि वोडवी ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - 9921816183

थोडंतरी द्यावं माणसानं,do-little-charity
Do-some-charity


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या