ज्ञान तेथे मान

 

इतिहासात नारद नावाचे पात्र आहे. जनमानसात कळीचा नारद अशी जरी त्यांची प्रतिमा असली, तरी त्यांच्या बाबतीत ग्रंथांचा सांगावा काही वेगळाच आहे. कोणत्याही स्थळी नारदाची एन्ट्री झाली की, त्यांना अत्यंत आदर दिला जात असे. कारण? त्यांचं ज्ञान. दोन शत्रूंमधून विस्तव जरी जात नसला, तरी नारद जाऊ शकत. नारद म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ. 'नारद स्मृती' 'नारदपुराण', 'नारदपांचरात्र' आदि त्यांचे सर्वमान्य ग्रंथ. 'नारद भक्तिसूत्र' तर प्रत्येक भक्ताच्या जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येक विद्वानाला मोहिनी घालणारा. नारद म्हणजे ज्ञान देणारा. ददाति नारं ज्ञानंच बालकेभ्यश्च बालक:। जातिस्मरो महाज्ञानी तेनाSयं नारदभिध:।। आज नारदजयंती. म्हणून ज्ञानाच्या अंगानं  त्यांचं हे स्मरण.

knowledge-get-respect

ज्ञान्याला जाईल तिथे मान मिळतो. एखाद्या अधिकार्याला तो खुर्चीवर आहे तोपर्यंतच मुजरा केला जातो. जिथे अधिकार चालतो तिथेच मान. खुर्ची गेली की, भरबाजारात त्याला कोणी ओळख दाखवित नाही. ज्ञानी कोठेही गेला, तरी त्याचं स्वागत केलं जातं. मायक्रोसॉफ्ट, गुगल आदि कंपन्या भारतीयांचं स्वागत त्यांच ज्ञान-कौशल्य पाहूनच करतात. विद्वत्वं च नृपत्वं च न एव तुल्ये कदाचन। स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते।। विद्वान आणि राजा यांची कधीही तुलना होऊ शकत नाही. राजाची फक्त स्वत:च्या देशात पूजा होते. विद्वानाचं सर्वत्र पूजन होतं. स्वामी विवेकानंदांसारखा भणंग संन्यासी केवळ ज्ञानाच्याच बळावर विश्ववंदनीय ठरला.

आज व्यासंग कमी होतो आहे. कारणाशिवाय लोक पुस्तकाला हातच लावीत नाहीत. धडा समजून घेण्याचेही कष्ट विद्यार्थ्याला पडू नयेत, याची काळजी घेतली जाते. चार-पाच इंची खिशात मावणारे पॉकेट गाईड्स मिळतात. पूर्वी फक्त दहावी बारावीसाठी असायचे. आता सर्वच इयत्तेला मिळतात. रेडीमेड सर्व मिळत असेल, तर वाचण्याचे कष्ट कोण घेणार? जगाची अर्थव्यवस्था ज्ञानाधारीत होते आहे. ज्याच्याकडे ज्ञान असेल त्यालाच सन्मान मिळेल. त्यामुळे दिवसाकाठी थोडा तरी वेळ नवीन ज्ञान मिळवण्यासाठी राखीव ठेवायला हवा. आमच्याकडे अंधार कोठडीत गीतारहस्य लिहिणार्या टिळकांचा वारसा आहे. खिळ्याने तुरूंगांच्या भिंतीवर महाकाव्य लिहिणार्या सावरकरांचा इतिहास आहे. मोठ्या लोकांनी ज्ञानाचं बोट कधीच सोडलं नाही. म्हणून ते मोठे झाले. जगात ज्ञानासारखं शक्तीमान आणि समर्थ काहीच नाही. माऊली म्हणतात, तर्ही ज्ञानशक्तीचेनि पाडें । हें आघवेंची गा थोकडें । ऐसे सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानी इये ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

ज्ञान तेथे मान
knowledge-get-respect


आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथेक्लिक करा. 

आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा. 

महाराष्ट्राचे विचारदुर्ग

आमचा हा ग्रंथ घरपोच मागविण्यासाठी ९९२१८१६१८३ या क्रमांकावर लगेच कॉल करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या