मोहाच्या जाळ्यातून बाहेर या

             मनाला कोणताही लगाम नसतो. त्याला आवरणं भल्याभल्यांच्या आवाक्याबाहेरचं असतं. कल्पनेचे इमले रचणं हा मनाचा स्वभावच. परंतु या काल्पनिक राजवाड्यांच्या पतनानंतर जीवनाची जी दुर्दशा होते, तिला पार नाही. मृगजळाला पाणी समजून त्याचा व्यर्थ पाठलाग केलात, तर उर फूडून मरणंच नशिबात येतं. प्रयत्न करायला हरकत नाही हे खरंय. पण तो प्रयत्न कशासाठी आणि कशाच्या आधारावर याचाही विचार व्हायला हवा. अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः । प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ श्रीमद्भगवद्गीता १६.१६॥ या श्लोकावर आपण चिंतन करीत आहोत. मागील लेखात चिंतांविषयीचे विवेचन केले. आज पुढच्या भागाचा विचार करू. अनेक कल्पनांनी चित्त भ्रमित झालेले, मोहाच्या जाळ्यामधे गुरफटलेले, विषय उपभोगात गर्क झालेले लोक अपवित्र नरकात पतन पावतात.

leave- infatuaion
leave- infatuaion

कल्पनांच्या फुग्यावर स्वार झालं, की वास्तवाचं भान राहत नाही. आभाळ हातात आल्यासारखं वाटतं. आपण कोणीतरी महापुरूष वगैरे असल्याचा भास होतो. मग कल्पनेचा घोडा इतका उधळतो, की त्याला कुठलाही धरबंध उरत नाही. तापाने फणफणल्यावर रोगी वाटेल तसा बडबडतो. त्याप्रमाणे मनोरथांची उतरंड रचणारे, वाटेल तशी वटवट करीत असतात. अज्ञानाच्या धुळीत गुरफटतात. आशांच्या वावटाळींनी मनोरथांच्या आकाशात सैरभैर होतात. आषाढ महिन्यात मेघ अमर्यादित येत असतात. पण पाऊस देत नाहीत. तशा यांच्या पोकळ इच्छा असतात. फलीभूत होत नाहीत. त्यालाच वायफळ म्हणतात. फळ आहे, पण खाता येत नाही.

 तरीही लोक शहाणे होत नाहीत. अशा स्वप्नांच्या आकाशात पायाहीन महाल बांधणार्यांना गीता असूर म्हणते. चित्ती असो द्यावे समाधान। ही फक्त बोलण्याची गोष्ट नाही. जगण्याचा वस्तूपाठ आहे.  समुद्रावर एकसारख्या लाटा येतच असतात. त्यांना खंड नसतो. तसे आसुरी स्वभावाचे लोक सदोदित अनेक प्रकारच्या इच्छा करीत असतात. मग त्या कामनाच अंत:करणात वेलीप्रमाणे जाळं तयार करतात. काट्यावरून कमळे ओढली, म्हणजे त्या कमळांच्या जशा चिंधड्या होतात, तशा यांच्या इच्छांच्या चिरफळ्या होतात. दगडावर मातीची घागर फुटल्यावर जसे तिचे तुकडे-तुकडे होतात, तसा त्यांच्या अंत:करणाचा चुरा होतो. म्हणून अवास्तव कामना करू नयेत. मोहाच्या वाघुरीत अडकू नये.

रात्र जशीजशी वाढते तसतसा अंधार वाढत जातो. त्याप्रमाणेच तुमच्या वासना अपूर्ण राहिल्या, की अंत:करणात मोह वाढू लागतो. जसजसा मोह वाढतो, तसतशी विषयांची लालसा वाढते. जिथे विषयलालसा असते, तिथे पापे आश्रयाला येतात. पापांची गर्दी वाढली, की जिवंतपणीच सर्व दु:खे पाहूणे येतात. यालाच नरकवास म्हणतात. तिथे केवळ वेदनांचीच पंगत असते. रोज निरनिराळ्या यम यातनांची जाचणी होत असते. अशा भयंकर नरकालोकात आसुरी स्वभावाचे लोक पडतात. माऊली म्हणतात, जेथ यातनांची श्रेणी । हे नित्य नवी यमजाचणी । पडती तिये दारुणीं । नरकलोकीं ॥ ज्ञा. ॥१६-३७५॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क -९९२१८१६१८३

मोहाच्या जाळ्यातून बाहेर या
मोहाच्या जाळ्यातून बाहेर या

आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथेक्लिक करा. 

 आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्राचे विचारदुर्ग
महाराष्ट्राचे विचारदुर्ग

आमचा हा ग्रंथ घरपोच मागविण्यासाठी लगेच कॉल करा. ९९२१८१६१८३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या