मनाला असावा सांडवा

         एका मोठ्या पावसातच तळी भरून जातात. पुढे संपूर्ण पावसाळाभर पाऊस पडला, तरी तळं फुटत नाही. काय कारण? तळ्याला असणारा सांडवा. जास्तीचं पाणी बाहेर सोडण्याचं काम सांडवा करीत असतो. पाणी साठविण्यासाठी बांधलेल्या तळ्यात पाणी बाहेर टाकण्याची व्यवस्था कशाला? साठलेलं पाणी टिकवायचं असेल, तर जास्तीचं पाणी बाहेर पडणं गरजेचं असतं. मनालाही असा सांडवा बांधता आला तर? आयष्याचं तळं कधी फुटणारच नाही. जास्तीच्या ओझ्याचा आपोआप निचरा होईल.
mind-should-have-outlet
mind-should-have-outlet
            मोठमोठे अधिकारी अचानक आपली जीवनयात्रा संपवतात. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले गळफास घेतात. लोकांना संकटांशी लढण्याचा उपदेश करणारे स्वत:च जगण्याची लढाई अर्ध्यावर टाकून पळ काढतात. संकटांनी गांजलेले, रोगांनी पिचलेले लोक जगण्याची उमेद हरत असतील, तर  समजू शकतं. परंतु ज्यांना व्यवहारीकदृष्ट्या कसलीच अडचण नाही, तेच लोक हार मानत असतील तर? याला काय म्हणावं? भावनांचा होणारा कोंडणारा. कोंडलेल्या भावनांचा स्फोट म्हणजे असला टोकाचा निर्णय. विचार करा प्रेशर कुकरला जर शिटीच नसेल तर? काय होईल? स्फोट. कोंडलेल्या मनाचाही असाच विस्फोट होतो.

            पाणी अडलं तर सडतं. मन अडलं तर कुढतं. पाणी आणि मन वाहतं राहिलं की, त्यात पावित्र्य येतं. मनाला प्रवाही ठेवण्यासाठीच नाती जन्माला आलीत. मन मोकळं करण्यासाठी रक्तनात्यात कोणी नसेल, तर रक्ताबाहेरच्या नात्याचा शोध सुरू होतो. त्यातलं सर्वांत विश्वासाचं नातं मैत्रीचं. आपल्याकडे रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्री श्रेष्ठ अशा अर्थाच्या म्हणी त्यामुळेच रूढ झालेल्या दिसतात. पण चांगला मित्र लाभायलाही भाग्यच लागतं. कोणी नाहीच मिळाला तर?

            अशावेळी आमच्या संतांनी देव सखा केला. देव सखा झाला, तर विश्व कृपा करतं. तेही नाहीच जमलं तर स्वत:च स्वत:चे मित्र बना. स्वत:शीच बोला. तुका म्हणे होय मनाशी संवाद।। जे जे अतिरिक्त ते वाहून जाऊ द्या. बिनकामाचं ओझं कमी करा. संतांचे आत्मनिवेदनपर अभंग हेच तर शिकवतात. बर्याचदा तुमचं ऐकायला कोणाला वेळही नसतो आणि देणंघेणंही नसतं. मग आपणच आपल्याशी संवाद का न साधावा? गाळ वाहून गेला, की मनाचा तळ नितळ  होतो. मन बंधनरहित होतं. अखंडीत सुख प्रत्ययाला येतं. माऊली म्हणतात, जो मनें ऐसा जाहला । संगी तोचि सांडिला । म्हणोनि सुखें सुख पावला । अखंडित ॥ ज्ञा. ५.२१ ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

मनाला असावा सांडवा


आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथेक्लिक करा.  

आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा. 


आमचा हा ग्रंथ घरपोच मागविण्यासाठी लगेच कॉल करा..9921816183

 

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या