मानवी जीवन आशेवर चालतं. ‘उम्मिद पे दुनिया कायम है।’ असं म्हणतात. पण वंदनीय गाडगेबाबा म्हणायचे, ‘माणसाने निराश असावं. निराश म्हणजे ज्याला कोणाकडूनच कसलीही आशा नाही असा. जो निराश आहे त्याच्याइतका सुखी कोणी नाही.’ आशा आली, की ती पूर्ण होईल की नाही याबाबतची अनिश्चितता निर्माण होते. अनिश्चितता आली, की चिंता उदयाला येते. चिंता आली, की शांती निघून जाते. उच्च कुळातल्या गुण व रूपसंपन्न स्त्रियांना सवतीचं वर्चस्व सहन होत नाही. त्याप्रमाणे चिंतारूपी सवत आली, की इतर सद्गुणांना घालवून देते.
चिंता सोडा चिंतन करा |
आज जग गतीमान झाले
आहे. माणूस नुसता कुत्र्यासारखा धावतोच आहे. कुत्राही कधीच शांत चालत नाही. कायम
धावत असतो. कधीकधी माणसाचाही कुत्रा झाला की काय, असं वाटतं. कुत्र्यांचं एक बरं.
त्याचा तो स्वभावच आहे. पण मानवाला अपरिहार्यतेमुळे धावायला लागतं. सतराशे-साठ
प्रकारच्या विवंचना मानवी मनात चोवीस तास पिंगा घालीत असतात. त्या त्याच्या मनाला
सारख्या कुरतडीत असतात. एखाद्या झाडाला वाळवी लागावी, तसं
अंत:करण आतून पोकळ होत जातं. बाहेरून धड दिसणारी व्यक्ती आतून कोसळायला लागते. असा
मनाने सत्वहीन झालेला व्यक्ती, या जगाच्या वावटळीत पाचोळ्याप्रमाने सैरभैर होतो.
चिंतेला
शास्त्रकारांनी चितेची उपमा दिलेली आहे. चिता चिंता समाप्रोक्ता बिंदुमात्र
विशेषता। सजीवं दहते चिंता निर्जीवं दहते चिता॥ चिता मेलेल्या निर्जीव शरीराला
जाळते. चिंता चालत्या बोलत्या सजीव देहाची होळी करते. एकवेळ चिता परवडली. ती
निर्जीव देह एकदाच जळतो. चिंता जास्त त्रासदायक. ती प्रत्येक क्षणाला जाळीत असते.
समोरच्याला ज्वाला दिसत नाही. जळणारा मात्र प्रतिक्षणी धुमसत असतो. बऱ्याचदा
आपल्या चिंता अनाठायी असतात. आपल्या नियंत्रणाच्या बाहेरच्या गोष्टीविषयी चिंता
करण्यात काहीच अर्थ नसतो. ज्याची आपण चिंता करीत होतो, त्याची
काळजी करण्याची आवश्यकता नव्हती, हे वेळ निघून गेल्यावर लक्षात येतं. अनेकदा
तुम्ही ज्याची चिंता करता, त्याला तुमचं आणि तुमच्या चिंतेचं काहीही घेणं देणं
नसतं.
आपल्या क्षमतांचा पूरेपूर वापर करावा. क्षमता असून निष्क्रिय बसू नये. आपलं कर्तव्य काय याचा नीट विचार करावा. ते योग्य पद्धतीने पार पडावं. मग चिंता करण्याची गरजच उरत नाही. कर्तव्यात धरसोड झाली, की चिंता येणारच. अशी चिंता उपयोगात येत नाही. वेळेवर अभ्यास केला, तर निकालाचे टेन्शन येत नाही. असुरी वृत्तीचे लोक जेव्हाचे काम तेव्हा करत नाहीत. आशेच्या भोवऱ्यात अडकतात. चिंतेच्या डोहात बुडतात. सर्वनाश ओढवून घेतात. पेराल तेच उगवते. कामात कसूर केलीत तर मनात चिंतेचा असूर जागा होणारच. म्हणून माऊली म्हणतात, तैसी चिंता अपार । वाढविती निरंतर । जीवीं सूनि असार । विषयादिक ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क -९९२१८१६१८३
आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथेक्लिक करा.
महाराष्ट्राचे विचारदुर्ग |
आमचा हा ग्रंथ घरपोच मागविण्यासाठी लगेच कॉल करा. ९९२१८१६१८३
0 टिप्पण्या