संताचिया खूणा

 

वाट पुसल्याविण जाऊ नये असे समर्थ म्हणतात. पण वाट विचारायची कोणाला? बहिर्याने आंधळ्याला रस्ता विचारला, तर आंधळ्याने काय सांगावे आणि बहिर्याने काय ऐकावे? आज समाजात ज्यांना कळतं ते गप्प  असतात. ज्यांना काहीच कळत नाही, ते सर्वज्ञ असल्यासारखे जगातल्या प्रत्येक गोष्टीवर बोलत असतात. ज्याने कधी बैलगाडी जुंपली नाही, तो कृषीतज्ज्ञ असतो. जो कधी कोणत्या निवडणुकीत उभा राहिला नाही, तो राजकीय विश्लेषक असतो. ज्याने आयुष्यात कधी कोणत्या वर्गाला शिकवलं नाही, तो शिक्षणतज्ज्ञ असतो. जो कोणत्याच बलिदानात पुढे नसतो, तो पुढारी असतो. ज्याला कधी स्पर्धा परिक्षेतून शिपाई पदाचीही परीक्षा पास होता आलं नाही, तो स्पर्धा परीक्षेच्या क्लासचं दुकान उघडून  बसलेला असतो.

ज्याच्याकडे अनुभवाची शिदोरी असतो, तो मार्गदर्शनाचा अधिकारी असतो. जो स्वत: नीट नाही, तो दुसर्याला काय वाट दाखवणार? ज्याला दोन वेळच्या तुकड्याची भ्रांत असते, लोक त्याच्याकडे आपलं भविष्य पहायला जातात. ज्या गावाला जायचं, त्याच्या विरूध्द रस्ता पकडला, तर तुमचा प्रवास कितीही झाला, तरी तुम्ही पोचणार कुठेच नाही. समाजाला सुख हवंय, पण ज्याच्याकडे ते नाही, तिकडे शोध घेतला जातोय. सुख हवं असेल, तर जे सुखी आहेत त्यांचं मत घ्यायला हवं. अकबराकडे काही मागण्याच्या हेतूने आलेल्या साधूने जेव्हा अकबरालाच देवाकडे मागतातना पाहिले, तो आल्यापावली परतला. समोरच्याकडेच काही नसेल, तर तुम्हाला कुठून मिळणार ?

 संत सर्व सुखाचे आगर आहेत. अनुभवसिध्द विचारवंतांचं ऐकलं, तर संसारताप निवतोच. संत प्रॅक्टीकल विचारवंत आहेत. शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक श्रमातून निवृत्त होण्यासाठी विश्राम हवा असतो. असा विश्राम एकवेळ शरीराला नसला, तरी मनाला हवा असतो. असा तनामनाचा विसावा म्हणजे पंढरीची वारी. जीवन जगताना नको त्या गोष्टींचं ओझं वागवत आपण जगत असतो. ते सगळं उतरवून ठेवून सावळ्या परब्रह्माच्या ओढीने केलेली वाटचाल म्हणजे वारी. कधीही न सरणार्या सकारात्मक विचारांची शिदोरी म्हणजे वारी. सेना म्हणे खूण सांगितली संती। यापरती विश्रांती न मिळे जीवा।।

श्रमहरण करण्याचं सामर्थ्य सद्विचारांमध्ये असतं. सद्विचार संतच देवू शकतात. इतर फक्त आपल्या फायद्यापुरती जाहिरात करीत असातात. कोणाला सत्ता हवी असते. कोणाला वाढवायचा असतो पक्ष. केवळ संतांचंच असतं जनहितावर लक्ष. ज्याच्यावर सज्जन प्रेम करतात, त्याला अवघी सृष्टी  साहाय्य करते. त्यामुळे त्यांना जवळ करावं. त्यांचं ऐकावं. जो आपल्याकडे येईल, त्यांनाही त्यांचंच सांगावं. खिशातल्या पुड्या सोडू नयेत. जे हित करतं ते ज्ञान. विकासाला मदत करतं, तेच तत्वज्ञान. तोच वेदांत. माऊली म्हणतात, पैं अहितापासूनि काढिती । हित देऊनि वाढविती । नाहीं गा श्रुतिपरौती । माउली जगा ॥ज्ञा. १६. ४६२ ॥

way-of-saints
way-of-saints


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या