"माझं तर नशिबचं उफराटं आहे. कोणाच्या कितीही कोपरापर्यंत
हात घातला तरी कोरडाच निघतो." किंवा 'दुनिया मतलबी आहे' अशी वाक्ये नेहमी ऐकायला मिळतात. आपण लोकांसाठी इतकं काही करतो, तरीही लोकं आपल्याशी वाईटच वागतात. जसं आणि ज्या भावनेने
आपण करतो, त्याच्या उलटच फळ आपल्या पदरात पडतं. मग माणूस निराश होतो. कोणी कितीही
तत्वज्ञ असला, तरी तोही शेवटी हाडामांसाचा माणूसच. मानवी भाव-भावना त्यालाही
असतातच. कोणी कितीही विद्वान होण्याचा प्रयत्न केला, तरी व्यावहारिक जगात वावरताना,
लगेच स्थितप्रज्ञ होता येत नसतं. सोडून द्यावं सगळं आणि फक्त स्वत:चाच विचार करावा, असाही विचार
मनात येतो.
खिशाला कात्री लावून लोकांच्या भल्यासाठी रात्रंदिन खपणार्या कार्यकर्त्याला निवडणूकीत तेच लोक पाडतात. अशावेळी सोडून द्यावी समाजसेवा! असा विचार त्याच्या मनात येणं स्वाभाविकही आहे. पण मग इतिहासातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होत नाहीत, म्हणून काम करायचं थांबवलं असतं, तर? आपल्याला ज्ञान, विज्ञान, इतिहास, संस्कृतीच्या गौरवाच्या बाता मारताच आल्या नसत्या. आजच्या पाश्चात्य जगात ज्यांनी समाजाला विज्ञानाचा रस्ता दाखविला, त्यांना लोकांनी भर चौकात जाळलं. मार्क्सच्या मृत्यूनंतर एंगल्स नसता, तर त्याचा अंत्यविधी तरी झाला असता का? महापुरूष ज्यांच्यासाठी झटले, त्यांना त्यांचं मूल्य कधीच कळलं नाही. तरी त्यांनी काम करायचं थांबवलं नाही.
बुडणारा समाज पाहवत नाही, म्हणून
आपल्या संसाराची आबाळ करवून घेणार्या तुकोबांना लोकांनी पूरेपूर छळलं. तरी
तुकोबांनी आपलं ऋषीप्रणीत वर्तन सोडलं नाही. बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया।।
लोकनिंदेमुळे प्राणप्रिय पत्नीचा त्याग करावा लागला, तरी रामाने आपल्या जनहितकारी
कार्यात खंड पडू दिला नाही. ज्यांच्या स्वातंत्र्यासाठी जीवनाची आहूती दिली,
त्यांना आपल्या लढ्याची किंमत कळलीच नाही. तरी हजारो क्रांतिकारकांनी पुन्हा याच
भारतभूमीत जन्म मागितला. वाईट लोक विंचवाप्रमाणे असतात. डंख मारणे हा त्यांचा
स्वभाव असतो. सज्जन आम्रवृक्षाप्रमाणे दगड मारणार्यालाही मधूर फळ देतात.
विंचवाच्या सहवासाने आंबा बदलत नसतो. तुम्हीही तुमचा चांगुलपणा सोडू नका. सूर्यावर
रात्र नसते आणि दिवसही. उत्तम कार्यकर्ताही सूर्याप्रमाणे असावा. शुभ-अशुभचा त्याग
करून आपल्या चांगुलपणावरच लक्ष द्या. माऊली म्हणतात, वोखटें कां गोमटें । हें काहींचि तया नुमटे ।रात्रिदिवस न घटे ।
सूर्यासि जेवीं ॥ ज्ञा.12-194।।
आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथेक्लिक करा.
आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी
येथे क्लिक करा.चांगुलपणा-सोडू-नका
आमचा हा ग्रंथ घरपोच मागविण्यासाठी लगेच कॉल करा
0 टिप्पण्या