गोपीनाथ मुंडे - एक समर्पित संघर्षयोध्दा

 राजकारण आणि राजकारणी यांच्याविषयी कधी आपुलकी  वाटलीच नाही. पण याला काही अपवाद निश्चितच आहेत. बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे. या व्यक्तीमत्वांविषयी कायम आदरच वाटत आला आहे. 

गोपीनाथ मुंडे हे या यादीतलं अग्रणी नाव. कुठलाही राजकीय वारसा नाही. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची. त्यातून मार्गक्रमण करत या महाकाय देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाव घेण्याइतपत योग्यता आणि विश्वास कमावणं हे अकल्पनीय आहे. हा त्यांचा राजकीय प्रवास रोमांचक, उद्बोधक आणि प्रेरणादायी आहे. राजकारणात त्यांनी भूषवलेली पदे, केलेली आंदोलने सर्वांना माहिती आहेत. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे असे कितीतरी कंगोरे आहेत, की  जे अत्यंत विलोभनीय आहेत. एक माणूस म्हणून त्यांच्या व्यक्तीमत्वाचं दर्शन करण्याचा प्रयत्न करूयात.

gopinath munde a devoted warrior, gopinathmunde and bhagwanbaba
gopinath-munde-a-deoted-warrior

वारकरी

मुंडे साहेब आणि वारकरी? काहींना हा प्रश्न नक्कीच पडला असेल. पण हे खरं आहे. माता लिंबाबाई आणि वडील पांडुरंग हे वारकरी होते. त्यांच्या प्रभावामुळे त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी वारी सुरू केली. पुढे सलग सात वर्षे ते वारीला गेले. नंतर राजकीय व्यापामुळे यात खंड पडला असेल तो भाग वेगळा. वारी आणि वारकर्यांविषयी प्रचंड आदराची भवना त्यांच्या अंत:करणात होती. वारकर्यांना पंढरपूर प्रवासासाठी बसच्या भाड्यात सवलत देणारे मुंडे साहेबच होते. पांडरंगाविषयी एक वेगळा जिव्हाळा प्रत्येक मराठी माणासच्या मनात आहेच; पण पायी चालत वारीला जाणं ही मोठी गोष्ट आहे. आपल्यालाही वारी आणि वारकरी आवडतात;  पण आपण पायी चालत वारीला किती वेळा गेलोय?

प्रवचनकार

आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? आम्ही तर कधी ऐकले नाही. वास्तविक मीही कधी ऐकले नव्हते. तरी हा मुद्दा का घेतलाय? सांगतो. राणेगावच्या नारळी सप्ताहात शास्त्री महाराजांनी(म्हणजे सध्याचे महंत ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री) यांनी ज्ञानेश्वरीवर कोणा एका विद्वानाने बोलण्यापोक्षा परिसंवादस्वरूप चक्रीय प्रवचने ठेवली होती. नेमके त्या वेळी गोपीनाथ मुंडे साहेब व्यासपीठावर दाखल झाले. सोबत ना.स. फरांदे आणि इतर नेतेही होते. त्यावेळी मुंडे साहेबांविषयी बोलताना महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री असं म्हणाले होते की, 'मुंडे साहेब राजकारणात गेले नसते तर उत्तम प्रवचनकार झाले असते. त्यांचे प्रवचन मी ऐकले आहे.' हे माझ्यासाठी नवीनच होते. परंतु त्यांचा कौटुंबिक वारसा आणि वैचारिक पिंड पाहता शास्त्रीजींनी जे सांगितलं त्याला पुराव्याची गरज वाटत नाही.

अद्वितीय वक्तृत्व

त्यांच्या वक्तृत्वाचे अनेक लोक दिवाने आहेत. अर्थात ते स्वत:ला फार उत्तम वक्ता मानत नसत. ते अटलबिहारी वाजपेयी, शिवाजीराव भोसले, बापूसाहेब काळदाते यांच्या वक्तृत्वाचे चाहते होते. अर्थात ही त्यांची नम्रता मानावी लागेल. भगवानगडावरून दसरा मेळाव्याच्या भाषणात, 'मला इथून दिल्ली दिसते,' असं म्हणणारे मुंडे साहेब आणि त्या शब्दांसरसी शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट करणारा समाज कोण विसरेल? लाखोंच्या जनसमुदासमोर त्यांनी दिलेली भाषणे आठवली की अजुनही अंगावर रोमांच उभे राहतात. मुंडे साहेब आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. आजही युट्युबर त्यांची भाषणे ऐकायला मिळतात ती पाहिली की याची सत्यता पटेल. खरंतर आमच्या मुलांना भाषण कसे करावे, याचे धडे देताना याच क्लिप दाखवल्या पाहिजेत.

व्यासंगी वाचक

प्रत्येक मोठा नेता तितकाच मोठा वाचक असतो हे जवळपास सर्वमान्य तत्व. यशवंतराव चव्हाण, मुंडे साहेब ते नरेंद्र मोदींपर्यंत. प्रत्येकाचे वाचन मन स्तिमित करणारे आहे. मुंडे साहेबांना चरित्रपर ग्रंथ वाचायला आवडायचे. राजकारणाच्या धावपळीतही ही माणसं वाचनासाठी वेळ काढतात. वाचतात. ही गोष्ट आमच्यासाठी किती प्रेरणादायी आहे! साहेबांना मानणारे कार्यकर्ते त्यांच्या जयंती पुण्यतिथीला भव्य दिव्य मिरवणुका काढतात; पण त्यांचा हा गुण घेतात का? गावागावात गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आहे. तिथे बसून गप्पा मारणे आणि गुटखा खाऊन पिचकार्या मारण्यापेक्षा एखादे वाचनालय सुरू करायला काय हरकत आहे? तीच त्यांच्याप्रतीची खरी आदरांजली असेल.

भगवानगडाचे निस्सीम भक्त

वडील पांडुरंग मुंडे यांच्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा भगवानबाबांशी संपर्क आला. त्यांना भगवानबाबांचे कीर्तन ऐकण्याचे सौभाग्य लाभले. ते भगवान बाबांचे निस्सीम भक्त बनले. भगवानगड भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. गडाचा जास्त संख्येने चाहतावर्ग मात्र मराठवाडा आणि विदर्भात आहे. हा त्यांचाच करिष्मा. भगवानबाबा, भिमसिंह महाराज आणि सध्याचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री असे तीन महंत क्रमाक्रमाने गडाच्या गादीवर आले. तिघांशीही त्यांचं तसंच आत्मीय जिव्हाळ्याचं नातं होतं. मुंडे साहेब आणि भगवानगड हे अभिन्न समीकरण होतं. साहेब गडावर नेहमी येत.  दसर्याला साहेब भगवानगडावर आले नाहीत, असं कधीही घडलं नाही. जीवात जीव असेपर्यंत ते येतच राहिले. ते स्वत:च्या यशाचं श्रेय कायम भगवानबाबांना देत. भगवानगड त्यांनी जगाच्या नकाशावर नेला.

कोयत्यावाल्यांचे दैवत

उसतोड कामगारांना कोयत्यावाले म्हणण्याची पध्दत आहे. गोंधळ होऊ नये म्हणून स्पष्टीकरण सुरूवातीला. ज्याची कोपरी फाटलीय(कोपरी कशाला म्हणतात हे माहित आहे ना?), चप्पल तुटलीय, शरीर म्हणजे हाडाचा सापळा. कुडाचं घर. सरमाडाने शेकारलेलं छत. सभोवार दारिद्रयलक्ष्मीचा मुक्त संचार. असल्या उसतोड मजुराच्या झोपडीत सहज डोकावून पहा. तिथे एकवेळ देवाचा फोटो नसेल पण मुंडे साहेबांचा असेल. फोटोवर बोल्ड टाईपमध्ये दैवत असं लिहिलेलं नाव तुमच्या काळजाचा ठाव घेईल. बाप मेल्यानंतर बापाचा फोटोही घरात न ठेवण्याच्या जमान्यात हा चमत्कार नाही का वाटत? हा चमत्कार या देवमाणसाने घडवलाय. जर कोणाला विश्वास नसेल तर तुम्ही खात्री करून घेऊ शकता.

 व्यावहारिक जगात ज्याला एका कामगारापलीकडे काहीही मुल्य नाही अशी व्यक्ती या माणसावर इतकं प्रेम करीत असेल; तर हा माणूस किती आभाळाएवढ्या उंचीचा होता याची आपल्याला जाणीव होते. मुंडे साहेबांनी उसतोडणी कामगारांना आत्मगौरव मिळवून दिला.

रसिक

साहेबांची रसिकता कदाचित आपल्याला माहित नाही. त्यांना नाटक फार आवडायचे. वेळ मिळाला;  की ते नाटक पहायला आवर्जून हजेरी लावत. राजकारणी म्हटलं की तो रूक्ष कंटाळवाणाच असला पाहिजे असं काही नाही. 'कृष्णाकाठ' वाचताना यशवंतरावांनी तुरूंगात वाचलेल्या आणि  त्यांना भावलेल्या पुस्तकांची नुसती  यादी जरी वाचली तरी आपला उर दडपून जातो. माणूस कितीही धकाधकीचे आयुष्य जगत असाला तरी त्याने आपल्या आवडी निवडी आवर्जून जोपासाव्यात हेच यातून सुचीत होते

दिलदार मित्र

त्यांच्या राजकारणापलीकडच्या मैत्रीचे किस्से सर्वश्रुत आहेत. विलासराव देशमुखांसोबतची त्यांची मैत्री संपुर्ण महाराष्ट्राला भावणारी आहे. राजकारणात एखादा पक्ष सोडून गेला तरी त्याच्यासोबतचे मैत्रीचे संबंध मात्र त्यांनी कधी तोडले नाहीत. राजकीय वादातून कायम अबोला धरणारे, कोर्ट कचेर्या करणारे कार्यकर्ते ह्यातून बोध घेतील तर साहेबांना किती आनंद होईल, नाही? टोकाचे राजकीय मतभेद हा त्यांच्या मैत्रीतला अडथळा कधीच ठरले नाहीत. आपणही स्वार्थ बाजुला ठेवून केवळ मैत्रीसाठी मैत्री केली;  तर आपल्याही मैत्रीच्या नात्यात कधी  अंतर पडणार नाही.

बहूजनांचे कैवारी

अभिजन विरूध्द बहूजन या वादात कायम बहूजनांची बाजू त्यांनी लावून धरली. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांचा सामावेश होता. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही त्यांची आग्रही भूमिका होती. मुस्लीम समाजाच्या आरक्षणालाही त्यांचा पाठींबा होता. किंबहुना त्यासाठी संघर्ष करण्याचीही त्यांची तयारी होती.

गोदावरीच्या पुरामध्ये आपलं सर्वस्व वाहून गेलेल्यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांनी 'गोदा परिक्रमा' केली. हाती सत्ता नसतानाही फक्त तळमळीपोटी ते प्रत्येक घराझोपडीपर्यंत पोचले. कधी कधी उगीच मनात येते आजच्या या संकटात साहेब आसते तर? धनदांडग्यांच्या दावणीला बांधलेले राजकारणी पाहिले की मुंडे साहेबांची आठवण आल्यावाचून राहत नाही.

संघर्षप्रेरक

त्यांच्या फोटोकडे नजर टाकली तरी संघर्षाची एक नवा उर्मी जागते. प्रस्थापित राजकीय पक्षात यशाचे सोपान चढणे सोपे असते.मुंडे  साहेबांचा प्रवास हा शून्यातून झालेला आहे. आज महाराष्ट्रात जो भाजपा दिसतो आहे त्यामागे या माणसाचे तप आहे. त्यांनी वेळोवेळी केलेली आंदोलने लढण्याचं बळ देतात. सत्तेच्या परिघाबाहेर राहूनही कायम सोबत कार्यकर्त्यांचं मोहोळ असणारा नेता विरळाच. सत्ता गेली की साथ सोडण्याच्या जमाण्यात ही निष्ठा कमावणे आणि टिकवणे हा चमत्कारच आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेसला पहिल्यांदा सत्तेबाहेर करण्याचा करिष्मा मुंडेसाहेबांनीच घडवू आणला.

ज्या पक्षाचे आस्तित्व नव्हते त्या पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवण्याइतपत मजबूत करण्यासाठी अखंड कष्ट केले. अभिजनांचा, शहरी लोकांचा पक्ष अशी ज्या पक्षाची ओळख होती तो शिक्का पुसून शेतकरी आणि बहूजनांचा पक्ष अशी भाजपाची प्रतिमा उभी करण्यासाठी हा माणूस अखंड झिजला. आजही त्यांचे गळ्यात शबनम पिशवी अडकवून मोटार सायकलवर प्रचार करणारे फोटो पाहिले की सगळा संघर्ष डोळ्यासमोर उभा राहतो.

महान माणसं त्यांच्या कर्तृत्वाने महान बनतात. त्यांच्या कर्तृतवाच्या सगळ्याच पैलूंपर्यंत आपली नजर पोचतेच असं नाही. या प्रेरणेच्या सरोवरातून आपण आपली ओंजळ भरून घ्यावी आणि तृप्त व्हावं इतकंच. मुंडे साहेबांना पुण्यातिथी निमित्ताने विनम्र अभिवादन.

प्रा. श्री. रमेश वाघ

नाशिक



 

 

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या

  1. वारकरी, प्रवचनकार ही मुंडेसाहेबांची ओळख वाघसर आपल्या लेखामुळे मिळाली. बाकी त्यांचं अद्वितीय कार्य, बहुजनांचा कैवारी असणं यामुळेच तर ते जनसामान्यांना आपले वाटत. भाजप ला शेतकऱ्यांचा आणि बहुजनांचा पक्ष करण्यामागे मुंडेसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मी आदरांजली वाहतो. लेख आवडला.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मनःपूर्वक धन्यवाद दर, आपली प्रतिक्रिया प्रेरणादायी आहे.

      हटवा
  2. या लेखाच्या माध्यमातून मुंडे साहेब यांच्या बद्दल विस्तृत माहिती प्राप्त झाली. त्यांनी तळागाळातील लोकांसाठी केलेले काम आणि गुन्हेगारी विश्वातील अंडरवर्ल्ड वर बसवलेली दहशत न विसरण्यासारखी आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान लेख माझ्या देवा वरती जे होत तेंच टिपले प्रध्यापक :रमेश वाघ सर याचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा सर

    उत्तर द्याहटवा