संत नामदेव चरित्र

        चालू वर्ष हे संत नामदेवांचे साडेसातशेवे (सप्त शतकोत्तर सुवर्णमहोत्सव) जन्मवर्ष आहे. आज संत शिरोमणी बालभक्त नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने संत नामदेवांना अभिवादन करण्यासाठी लिहीलेला हा विशेष चरित्रपर लेख.

sant namdev, namdev maharaj
sant-namdev-charitra

 
             मराठी संतांच्या मांदियाळी मध्ये सर्वात अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजे संत नामदेव. नामदेवांचा जन्म कयाधू नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या नरसी नामदेव या गावामध्ये   26 ऑक्टोबर 12 70 रोजी झाला नामदेवांच्या वडिलांचे नाव दामाशेटी आणि आईचे नाव गोणाई होते. नामदेवांच्या पूर्वी त्यांच्या पिढीतील सातवे पूर्वज यदूशेट हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. दामाशेटींचा कपडे शिवण्याचा व्यवसाय होता. त्याला आपण शिंपी असे म्हणतो आजही शिंपी समाजामध्ये नामदेव शिंपी नावाचा एक समाज महाराष्ट्रात आहे. नामदेवाच्या घरामध्ये पूर्वापार विठ्ठल भक्तीची परंपरा होती. त्यामुळे पांडुरंगाच्या भक्तीचा वारसा नामदेवाला जन्मताच मिळाला आणि आणि तो त्यांनी आयुष्यभर पुढे चालवला. लहानपणापासूनच नामदेव विठ्ठलाला आपला सखा म्हणू लागला. दररोज वडिलांसोबत मंदिरात जावं, देवाला नमस्कार करावामनातलं देवाशी बोलावं या गोष्टी नित्याचाच झाल्या.

            एके दिवशी त्यांचे वडील दामाशेटी व्यापाराच्या निमित्ताने बाहेरगावी गेले . माता गोणाईने पांडुरंगाला नैवेद्य दाखवण्यासाठी नामदेवाला पाठवले. नामदेव नैवेद्य घेऊन मंदिरात गेला. नैवेद्य पांडुरंग समोर ठेवला. पांडुरंग आता नैवेद्य खाईल, नंतर नैवेद्य खाईल या विचारांमध्ये नामदेव पांडुरंगाच्या मूर्ती समोर बसून होता. बराच वेळ गेला पण पांडुरंगाच्या मूर्तीने नैवेद्य काही खाल्ला नाही.

      'दररोज  बाबा नैवेद्य घेऊन यायचे.घरी रिकामे  ताट आणायचे. म्हणजे बाबांचा नैवेद्य पांडुरंग खायचा. आज मी नैवेद्य देतोय तर देव का बरे खात नाहीमाझ्याकडूनच काहीतरी चुकलं असावं!असा नामदेव विचार करू लागला.

                 त्याच्या मनात आले,' पांडुरंगाने नैवेद्य खाल्ला नाही आणि मी असाच घरी गेलो तर आई नाराज होईल. बाबा नाराज होतील. त्यामूळे पांडुरंगाने नैवेद्य खाल्ल्याशिवाय मी येथून हलणार नाही.'

                   अशाप्रकारचा दृढनिश्चय करून नामदेव देवासमोर बसून राहिला. बराच वेळ गेला पण देवाने नैवेद्य काही खाल्ला नाही. मग मात्र नामदेवाचा धीर सुटला. तो रडायला लागला.

                 देवाला म्हणाला,' देवा माझं काय चुकलं? दररोज बाबा नैवेद्य आणतात तो खातोस.... आणि मी मात्र आणलेला नैवेद्य खात नाहीस? जोपर्यंत तू नैवेद्य खाणार नाहीस तोपर्यंत मी तुझ्या दारातून उठणार नाही.'

                  त्याची आर्तता पाहून पांडुरंगाला त्याची दया आली. त्याचा दृढ निश्चय पाहून पांडुरंग प्रसन्न झाला. पांडुरंग प्रत्यक्ष नामदेवा समोर प्रकट झाला. त्याने तो नैवेद्य  घेतला. खाऊन टाकला. रिकामं ताट नामदेवाला परत दिलं. नामदेवाला खूप आनंद झाला.  ताट घेऊन नामदेव घरी गेला.

                 घरी आल्यावर आईने विचारलं,' नैवेद्य कुठे ठेवलास?'

                  नामदेव म्हणाला,' खाल्ला देवाने...!'

                   आई चकित झाली.' दगडाची मूर्ती कुठे नैवेद्य खाते का?'

                       शेवटी नामदेवाने सगळा प्रसंग कथन केला. मग आईला विश्वास वाटला. नामदेवांचे वडील व्यापारावरून परत आल्यानंतर त्यांना ही हकिगत कळली. त्यांनाही आश्चर्य वाटले. आपल्या पोटी एक अलौकिक भक्त जन्माला आला आहे , याची त्यांना जाणीव  झाली.

            नामदेव अकरा वर्षांचा  झाल्यानंतर त्याचा विवाह राजाई सोबत लावून देण्यात आला. त्यांना नारायण, विठोबा, महादेव आणि गोविंद अशी चार मुले आणि लाडाई ही एक मुलगी झाली. सुरुवातीला त्यांच्या भक्तिमार्गामध्ये कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य त्यांना मिळाले नाही.  नंतरच्या काळामध्ये मात्र सगळा परिवार पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रंगून गेला. इतकेच नाही तर त्यांनी अभंग  देखील लिहिले.

              एकदा परभणी वरून एक मुलगी वारीला पंढरपूरला आली. पंढरपूरला आल्यानंतर मात्र तिने आपल्या आई-बाबांसोबत घरी जाणं नाकारलं.

                    'मला पांडुरंगाजवळच राहायचं आहे. मला पंढरपुरातच राहायचं आहे,असा हट्ट धरून बसली .

                    तिच्या आईबाबाबांचा नाईलाज झाला.नाईलाजाने तिला तिथेच सोडून  ते निघून गेले.  दुसऱ्या दिवशी संत नामदेव पांडुरंगाच्या दर्शनाला आले.  त्या अनाथ मुलीला बघून त्यांचं मन द्रवलं तिला घेऊन ते घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने उदार अंतकरणाने त्या मुलीचे स्वागत केले. नामदेवांनी आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे त्या मुलीचा सांभाळ केला. तिला शिकवलं. तिला कधीच अंतर दिलं नाही. पांडुरंगाच्या दरवाज्यात मुलगी त्यांना मिळाली आणि ज्या मूलीला ते घरात घेऊन गेले ही मुलगी म्हणजे प्रसिद्ध संत जनाबाई होय.

                       संत चोखामेळा, सेना न्हावी, नरहरी सोनारबंका महारसावतामाळीगोरोबा कुंभार अशा अनेक संतांची मांदियाळी नामदेवांनी आपल्याभोवती जमवली.  त्यांचे पांडुरंगा वरचे  प्रेम दिवसेंदिवस वाढत होते.

 एकदा महाशिवरात्रीला नामदेव महाराज औंढा नागनाथला गेले.  तिथे महादेवाच्या मंदिरासमोर कीर्तन सुरू केले. किर्तन सुरु असताना मंदिराचे पुजारी तिथे आले.  त्यांनी नामदेवाला तिथे कीर्तन करू नको म्हणून सांगितले.

               'तू पांडुरंगाचा भक्त आहेस. तुला मंदिराच्या सभामंडपामध्ये उभा राहून कीर्तन करण्याचा अधिकार नाही. तू अधर्म करतो आहेस.' असं बोलून त्यांनी नामदेवाला तिथून हाकलले.

           नामदेवांनी आपली टाळ विणा घेतलाी.  मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आले. कीर्तन करायला सुरुवात केली. जी मंडळी  सभामंडपात नामदेवांसमोर कीर्तन ऐकायला बसली होती, ती सगळी उठून मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जिथे नामदेव कीर्तन करत होते तिथे जाऊन बसली. किर्तनाला रंग चढला. कीर्तनात बसलेली टाळकरी, माळकरी, वारकरी सगळे स्वतःचे भान विसरून गेले. कीर्तनाचा आनंद प्रत्येक जण घेत होता. त्याचवेळी नामदेवाच्या मनात आले,' देवा किर्तनाला एवढा रंग भरला आहे.  पण... कीर्तन ऐकायला जर तू असतास तर.... अजून किती मजा आली असती!'

                    नामदेवाची भावना महादेवापर्यंत पोचली. आणि चमत्कार घडला. पूर्वाभिमुख असणारे मंदिर फिरले. नामदेवाच्या कीर्तनातकडे तोंड करून  उभं राहिलं. पश्चिमाभिमुख बनलं. मंदिराचे पुजारी आले तेव्हा त्यांना मंदिराकडे बघून आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी स्वतःच्या डोळ्याने अनुभव घेतला. त्यांना नामदेवाचं मोठेपण लक्षात आलं. त्यांनी नामदेवाला साष्टांग दंडवत घातला.

                      ' तू खरच खूप महान भक्त आहेस! पांडुरंग आणि महादेव यांचे रूप दिसायला वेगळे दिसत असले तरी तत्व एकच आहेते आम्हाला आता पटले आहे.' असं म्हणून सर्वांनी नामदेवांचा जयजयकार केला.

                      भक्तीच्या क्षेत्रांमध्ये दिवसेंदिवस नामदेवाची प्रगती होत असली तरी, संसारिक गोष्टींमध्ये मात्र अडचणी कायमच होत्या. गडगंज धनसंपत्ती नामदेवाकडे कधी नव्हती. त्याच वेळी पंढरपूर मध्ये परिसा भागवत नावाचे नामदेवाचे मित्र होते. त्यांना रुक्मिणी माता प्रसन्न झाली. रुक्मिणीने परिसा भागवत यांना एक परिस दिला. परिस म्हणजे असा चमत्कारिक पदार्थ की जो लोखंडाला लावला की लोखंडाचं सोनं होतं. परिसा भागवत यांनी हा परीस आपल्या पत्नीकडे दिला. त्यामुळे परिसा भागवत संत आणि भक्त असूनही खूप श्रीमंत होते.

                       परिसा भागवत यांची पत्नी नामदेवांच्या पत्नी दोघी मैत्रीणी होत्या.     दोघी एकदा नदीवर पाण्याला गेल्या असताना त्यांची घरच्या परिस्थितीवर चर्चा झाली. नामदेवांच्या घरची परिस्थिती पाहून परिसा भागवत यांच्या पत्नीला त्यांची दया आली.

            परिसा भागवतांची पत्नी राजाईला म्हणाली, ' थोड्यावेळासाठी मी तुम्हाला परिस देते. तोपर्यंत घ्या आणि तुम्हाला लागेल तेवढे लोखंडाचे सोने  बनवा. त्यानंतर माझा परिस मला परत द्या.'

                 नामदेवांच्या पत्नीने परिस घेतला. घरी जाऊन लागेल तेवढं सोने बनवून घेतले.  त्यातले थोडे सोने घेऊन दुकानात गेली. वाण्याकडून किराणा, कपडे,  काय लागेल त्या सगळ्या वस्तू खरेदी केल्या.  घरी आल्यावर मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला.

                    पांडुरंगाच्या मंदिरातून नामदेव जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी बघितले, 'अरे आपल्या घरात आज पुरणपोळी? आपल्या घरात खायचे  वांदे होते. आणि आज ..पुरणपोळ्याअसे कसे काय?'

                 त्यांनी पत्नीला विचारलं. पत्नीने घडलेला सगळा वृत्तांत त्यांना सांगितला.

           नामदेव म्हणाले, ' बघू मला कसा आहे तो परीस!'

  नामदेवांनी परिस हातात घेतला. परीस घेऊन चंद्रभागेच्या पाण्याकडे धावत गेले. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये परीस फेकून दिला. ही बातमी परिसा भागवत यांच्या पत्नीला कळली. परिसा भागवत आणि त्यांची पत्नी आरडाओरडा करत नामदेवाच्या घरी आले.

           ते म्हणाले, 'रुक्मिणी मातेने प्रसन्न होऊन आम्हाला दिलेले वरदान तुम्ही अशाप्रकारे नदीमध्ये का  फेकून दिले? आम्हाला आमचा परीस परत करा.'

             नामदेवांनी नदीच्या पाण्यामध्ये हात घातला. मुठभर वाळू हातात घेतली. परिसा भागवत यांना उद्देशून म्हणाले,'यापैकी तुमचा परीस कोणता आहे? तो घ्या.'

     सगळ्यांना गंमत वाटली. सहज परीक्षा पहावी म्हणून त्यांनी हळूच एक वाळूचा कण घेतला. तो लोखंडाला लावला. आणि काय आश्चर्य! लोखंडाचे सोन्यात रूपांतर झालं.  परिसा भागवत यांनी हे बघितलं. त्यांनी नामदेवांना साष्टांग दंडवत घातला.

परिसा भागवत नामदेवांना म्हणाले,' मी तर शुल्लक गोष्टी मध्येच सुख अनुभवत होतो. पण खरे सुखाचे अधिकारी तुम्ही आहात. तुम्ही खरंच खूप श्रेष्ठ भक्त आहात. तुम्ही वाळूला सुद्धा परीस करू शकता. आता आमच्या जीवनाचे सोने बनवा.'

       वाळवंटा मधल्या सगळ्या लोकांनी नामदेवाचा जयजयकार केला.

एकदा संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई गोरोबाकाका, सावतामाळी आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा करत करत करत हा सगळा संतांचा मेळा मथुरा क्षेत्रांमध्ये पोहोचला. मथुरेला नामदेवांनी भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरासमोर कीर्तनाला सुरुवात केली. किर्तन रंगात आलं. लोक डोलत होते. तल्लीन झाले होते.  इतक्यात अघटित घडले. एका मुसलमान अंमलदारांने तक्रार केली. आणि तिथे बादशाहा आला.

            बादशहा म्हणाला,' तू काफर. हिंदू. खोटा भक्त आहेस. जर तू खरा भक्त असशील,तुझा देव खरा असेल तर आता आम्ही गाय कापतो. तिला तू जिवंत कर.अन्यथा आम्ही तुम्हाला मुसलमान बनवू.:

 त्यांनी नामदेवाच्या कीर्तनामध्ये गाय आणून कापली. नामदेवांसमोर संकट उभे राहिले. काय करावं, सुचेना!

 नामदेवाने पांडुरंगाला हाक मारली. पांडुरंगाचा धावा सुरू केला, 'हे पतित पावन, हे दयाघना! तूच ये आणि आमची लाज राख. आमचं सत्व सांभाळ. तुझ्या भक्तांचं रक्षण कर.'

           आणि काय आश्चर्य! मेलेली गाय जिवंत झाली!!

            हे बघुन बादशहाने आणि सर्वांनीच नामदेवांचा जयजयकार केला. बादशहाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याने सर्व संतांचा यथोचित आदरसत्कार केला.

      त्यानंतर संपूर्ण भारतभर नामदेवांनी समता, शांती, भक्ती या गोष्टींचा प्रचार केला. संत नामदेवांच्या तीर्थयात्रेतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जिथे जातील तिथल्या भाषेमध्ये त्यांनी अभंग लिहिले. लोकांच्या भाषेमध्ये लोकांना उपदेश केला. पंजाबमध्ये पंजाबी भाषेतून त्यांनी लेखन केतर. हिंदीमध्ये अनेक पदांची रचना केली. व्रज भाषेमध्ये उत्तम रचना केली.आणि संपूर्ण देशभर भक्तिमार्गाचा प्रसार केला.

       शिखांचा पवित्र धर्मग्रंथ गुरुग्रंथसाहेब या ग्रंथामध्ये नामदेवांच्या 61 पदांचा समावेश आहे.  पंजाब मध्ये संत नामदेव हे बाबा नामदेव म्हणून प्रसिद्ध आहेत. संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव त्या सर्व संतांच्या चरित्र विषयक प्रसंगांचा उल्लेख नामदेवांचा अभंगातून मिळतो. किंबहुना या संताविषयी माहिती आपणास नामदेवांच्या अभंगातून मिळते. नामदेवाने एक कोटी अभंग लिहिले आहेत असे मानले जाते याचा अर्थ नामदेवांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केलं असा घेता येऊ शकतो.

              संत नामदेव हे  वारकरी किर्तन परंपरेतील आद्य कीर्तनकार मानले जातात. नामदेवांचं 'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।' हे वचन प्रसिद्ध आहे.पंढरीच्या वाळवंटामध्ये देव भक्तांचा ऐक्याचा काला ही परंपरा नामदेवांनी सुरू केली.  अजूनही प्रत्येक हरिनाम सप्ताहामध्ये सप्ताह संपला की काला केला जातो. काला वाटला जातो. काला खाल्ला जातो. काल्याचा प्रसाद हा स्वर्गापेक्षाही जास्ती महत्त्वाचा मानला जातो. अशा या महान संताचा वयाच्या ऐंशीव्या वर्षी आषाढ वद्य त्रयोदशी शके 1272 म्हणजे 13 जुलै  1350 या दिवशी निधन झालं नामदेवांची  समाधी पंजाब राज्यातील घुमान या गावामध्ये आहे. तसेच नामदेवांची समाधी पंढरपुरामध्ये सुद्धा आहे. पांडुरंगाच्या मंदिराची पायरी आहे तिला नामदेव पायरी असे म्हणतात.  अजूनही भाविक भक्त पंढरपूरला भेट दिल्यानंतर त्या नामदेव पायरीला भक्तिभावाने नमस्कार करतात. देशभरातले शीख बांधव त्याच प्रकारे वारकरी बांधव नामदेवांच्या समाधीला भेट देण्यासाठी पंजाब मधील घुमानलादेखील जातात.  नुकताच 2019 चाली महाराष्ट्र शासनाने नामदेवांचा जन्म स्थळ असलेल्या नरसी नामदेव या गावाचा देखील तीर्थस्थळ म्हणून विकास केलेला आहे. नामदेवाचा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या दिमाखात आणि आनंदात अजूनही साजरा केला जातो. यावरून नामदेवांचं कार्य नामदेवांचं जीवन आणि त्यांचं मोठेपण आपल्या लक्षात येतं

रमेश वाघ लिखित महाराष्ट्राचे विचारदुर्ग या पुस्तकातून साभार.

पुस्तकाची मूळ किंमत- १२५ रूपये

सवलतीत किंमत- १००

हे पुस्तक घरपोच हवे असल्यास ९९२१८१६१८३ या क्रमांकावर फोन पे, पेटीएम किंवा अमेझॉन पे ने १५० रूपये पाठवा.(पुस्तकाची किंमत१०० अधिक पोस्टेज ५०). पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट आणि तुमचा संपूर्ण पत्ता याच नंबरवर व्हाट्सअपवर पाठवा. ताबडतोब पुस्तक घरपोच मिळेल.

खालील फोटोवर क्लिक करूनही पुस्तक घरपोच मागवू शकता.

maharashtrache vichardurg, santcharitre
maharashtrache-vichardurg
संस्कृती, परंपरा, इतिहास, वारसा आणि विचार जतन करणारे सर्वोत्तम पुस्तक आपल्या मित्रमंडळींना नक्की भेट द्या.

आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.  

आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा. 

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

  1. Best vr archery games, tips and strategy dafabet dafabet 1xbet korean 1xbet korean 485Most Sure Soccer Predictions Today | vntopbet.com

    उत्तर द्याहटवा
  2. भक्तिमय विवेचन...
    विनम्र अभिवादन🙏🙏

    उत्तर द्याहटवा