तुमच्या जगण्याचा रिमोट कोणाच्या हातात आहे?


    एकदा एक तुरळक ओळखीच्या मॅडम भेटल्या. साधारणपणे ओळखीची व्यक्ती भेटली की, नमस्कार करावा, ही आपली संस्कृती. मी त्यांना अभिवादन केलं. प्रतिक्रिया म्हणून त्या बाईने असा चेहरा केला की, त्याचं वर्णन कदाचित शब्दात करता येणार नाही. एखाद्याचं आपण करोडोंचं नुकसान करावं आणि त्याने जसा जळजळीत कटाक्ष टाकावा, अगदी तसा. आपण हिचं काय घोडं मारलंय? हा प्रश्न दिवसभर माझ्या डोक्याचा भुगा करीत होता. असाच पूर्वी ऑफिसात एक कारकून होता. ऑफिसात गेल्यावर त्याला नमस्कार केल्यावर तो फक्त निर्विकारपणे चेहर्याकडे पाहायचा. आपलंच काहीतरी चुकलं की काय, असंच मला वाटत राहायचं.

तुमच्या जगण्याचा रिमोट कोणाच्या हातात आहे?, Who is controlling you
तुमच्या जगण्याचा रिमोट कोणाच्या हातात आहे?

      आपण सर्वाधिक प्रेम स्वत:वर करतो, पण सर्वाधिक विचार दुसर्यांचा करतो. ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे. ज्या गोष्टीवर आपलं सर्वाधिक प्रेम आहे, त्याचाच विचार आपण करावा; पण तसं होत नाही. आपले विचार, आपलं वागणं हे स्वयंभू असलं पाहिजे. परंतु वरच्या दोन्ही उदाहरणांत मी अशा लोकांविषयी विचार करण्यात मेंदू शिणवला की, त्या व्यक्ती भेटल्या नसत्या, तरी मला वा त्यांना काहीही फरक पडला नसता. तरीही ती व्यक्ती अशी का वागली असावी, हा शेंडा आणि बुडूख नसलेला प्रश्न मी स्वत:लाच विचारत राहिलो. विनाकारण.

    दुसर्यानं कसं वागावं हा त्याचा प्रश्न आहे. एखादी व्यक्ती आपल्याशी जे वागते, त्याला इतरही वेगळी कारणं असू शकतात. आपण दुसर्या बाजूने कधी विचारच करत नाहीत. कोणी कसं वागावं, यापेक्षा आपण कसं वागावं हे महत्वाचं. दुसर्याचं वागणं, बोलणं आपण नियंत्रित करू शकत नाहीत; पण स्वत:ला नियंत्रित करू शकतो. जो स्वत:ला नियंत्रित करू शकतो, तो विश्व विजयी होऊ शकतो. कारण जो स्वत:ला नियंत्रित करू शकतो, त्याची प्रज्ञा विश्वाकार होते. हे विश्वच माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहूना चराचर । आपणचि जाहला।। स्वामी विवेकानंद म्हणतात, जगातल्या प्रत्येक जीवाचा आत्मा हा वैश्विक आत्म्याशी जोडलेला असतो. त्याचा प्रत्यय येण्यासाठी आत्मपरिचय महत्वाचा. तसा तो झाला की, 'ब्रह्म सत्य जगन्मिथ्या' या महावाक्याची प्रचिती येते.

    भगवंत वगळता जगातले सर्व व्यवहार मिथ्याच असतात. व्यवहार आला की, देवाण घेवाण आली. देवाण-घेवाण आली की, नफा-तोटा येणार. नफा-तोट्याचा विचार आला की, व्यक्तीचं वागणं बदलतं. तिच्या वर्तनाला बेगडी स्वरूप येतं. शॉपिंगला जायचं असेल तर, पत्नी गोड बोलते. आपल्याला वाटतं कीती सज्जन आहे! ज्यांचं जन्मात कधी तोंड पाहिलेलं नसतं, ती माणसं स्वार्थासाठी दारात येतात. तोंड फाटेस्तोवर आपली स्तुती करतात. आपणही सगळं विसरून त्यांच्या मदतीला धावून जातो. आता सांगा, आपल्या जगण्याचा रिमोट कोणाच्या हातात आहे? 

एकदाच नरदेह मिळतो. त्यातही आपण कधी जाणार, हे कोणालाच माहित नसतं. हा लेख वाचताना बोलावणं आलं, तरी पेपर टाकून निघावं लागेल. जीवन एकदाच आहे. किती क्षण शिल्लक आहेत, कोणालाच माहित नसतात. कोणताही क्षण अंतिम असू शकतो. लाखो रूपये मोजलेत तरी, एक क्षणही पुन्हा परत घेता येत नाही. मग प्रत्येक क्षण दुसर्याचा विचार करण्याऐवजी स्वत:च्या विकासासाठी का घालवू नये? आपल्या जगण्याचा रिमोट कोणाच्या हातात असावा?

    रिमोट आपल्याचं हातात पाहिजे. पण आपलं वागणं तरी निश्चित आहे का? कोणी रागावला, तर आपण रागावतो. एखादा वाईटसाईट बोलला, तर शिव्या घालतो! एखादा गोडगोड बोलला तर, त्याला नेसते वस्त्र फेडून देणार! क्षणिक निंदा-स्तुतीनं आपलं वर्तन बदलतं असतं. आपली बुध्दी आणि वृत्ती दोन्हीही दृढ नाहीत. त्यासाठी ज्यांच्यावर कुठल्याही बाह्य गोष्टींचा परिणाम होत नाही, अशांच्या हाती आपल्या जीवनरूपी पतंगाची दोरी असावयास हवी. तुकोबाराय म्हणतात, संताचिये पायी हा माझा विश्वास । सर्वभावे दास झालो त्यांचा ।। संत माझ्यावर कृपा करतील, जेणेकरून माझ्यावर ईश्वरकृपा होईल. जीवनप्रवासात जर मी थकलो भागलो, तर संत मला उचलून कडेवर घेतील. मी त्यांचे वैचारिक उच्छिष्ट खाईल. त्यांच्या वचनांचे आवडीने पालन करीन. ही तुकोबांची भाषा आहे. आपली भाषा काय असते? मी माझे पाहून घेईन! अरे, पण तू कोण टिकोजीराव? 

    दुसरा हसला की, आपण हसणार. रूसला की, रूसणार. सगळं वर्तन इतरांच्या तालावर. आपल्याला आपला तालच नाही. त्यामुळे आयुष्य बेताल होऊन जातं. संतांना स्वत:चा ताल असतो. गाये नाचे उडे आपुलिया छंदे । मनाच्या आनंदे आवडीने ।। ज्याला स्वत:चा प्रकाश आहे, तोच इतरांच्या जीवनातला अंधकार दूर करू शकतो. आंधळा दुसर्याला मार्ग दाखवू शकत नाही. ज्याला आत्मदर्शन झालं तोच डोळस. जो डोळस तोच जीवनविकासाच्या मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. हा डोळसपणा एकतर संत देतात किंवा भगवंत. डोळसपणा आला की, दृष्टी देखणी होते. दृष्टी देखणी झाली की, अवघं विश्व रमणीय वाटू लागतं.

    दररोज झोपताना हाच विचार करावा की; आज मी जे काही वागलो, ते वर्तन माझं होतं की, कोणीतरी रिमोटचं बटन दाबलं, म्हणून मी तसा वागलो. ज्या दिवशी आपल्या वागण्याचा रिमोट संतांच्या हातात जाईल तेव्हापासून आपली प्रत्येक कृती उत्सवी होईल. आयुष्याची आनंदयात्रा होईल. संपर्कात येणार्या प्रत्येकाच्या जीवनात सुगंधाची पेरणी करता येईल. संत सर्व मनोरथ पुर्ण करणार्या कामधेनूप्रमाणे आहेत. संतविचाररूपी कल्पतरूच्या मांडवाखाली फक्त आपण आश्रय घ्यायला हवा. सर्व मनोरथ पूर्ण होतील. माऊली म्हणतात, किरीटी कामधेनूचा पाडा । वरी कल्पतरूचा आहे मांदोडा । म्हणौनि मनोरथसिद्धीचिया चाडा । तो नवल नोहे ॥

रमेश वाघ, नाशिक.

संपर्क - ९९३१८१६१८३


तुमच्या जगण्याचा रिमोट कोणाच्या हातात आहे, who is guiding your life
तुमच्या जगण्याचा रिमोट कोणाच्या हातात आहे 



    


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या