मंदिर कशासाठी?

 

रविवारी शिर्डीला गेलो होतो. सुट्टी असल्याने रांगेत प्रचंड गर्दी. सकाळी साडेनऊला रांगेत थांबलो, ते दुपारी दोन वाजता दर्शन घेऊन बाहेर पडलो. दर्शनबारी सुरळीत चालू असताना जवळचे दार उघडले गेले. त्यामुळे  जो तो त्या नव्याने उघडलेल्या दरवाज्याने जाण्याची धडपड करू लागला. त्या गडबडीत एका सुशिक्षित दिसणार्या जोडप्याबरोबर कोण प्रथम पुढे जाणार, यावरून आमच्या मित्रांची बाचाबाची झाली. मी मध्यस्थी केली आणि म्हणालो, "ठीक आहे, त्यांना पुढे जायचे तर जाऊ द्या. थोडासा उशीर झाल्याने देव काही पळून जात नाही."

सहज प्रश्न पडला. मंदिरांची गरजच काय? मंदिरात एखाद्याला देव भेटलाय किंवा ज्ञानप्राप्ती झालीय असं अपवादात्मक तरी उदाहरण आहे काय? कुणाला मंदिरात गेल्यावर साक्षात्कार झालाय काय? श्रीमदभगवद्गीता सांगते विविक्तदेशसेवित्वमरतिजनसंसदि।। ज्याला भगवदप्राप्ती करून घ्यायची आहे त्याने लोकांताचा त्याग करून एकांतात राहावे. भगवान बुध्दांपासून तुकोबांपर्यंत ज्यांना ज्यांना साक्षात्कार झालाय, तो काही मंदिरात झालेला नाही. किंबहूना जिथे महापुरूषांना साक्षात्कार वा ज्ञानप्राप्ती झालीय तिथे कालांतराने मंदिरे उदयाला आलीत. कोणत्याही मंदिराचा इतिहास हा कोणातरी भक्ताच्या  महान कर्मयोगाचा इतिहास आहे. त्याच्या कर्मभक्तीचा प्रसाद म्हणून भगवंताने दर्शन दिलंय. त्या भक्ताने जगाच्या कल्याणासाठी भगवंताला तिथे राहण्याचा आग्रह  केलाय. पंढरपूरपासून ते ज्योतिर्लिंगांपर्यंत प्रत्येक मंदिराची हीच कथा आहे.

मग प्रश्न असा पडतो की वैयक्तिक भक्तीमध्ये मंदिराचा वाटा नसेन, तर आमच्या ऋषीसंतांनी मंदिरांची निर्मितीच का केली? ऋषी वेडे होते का? ऋषति संसारस्य पारं दर्शयति, इति ऋषि:। संसाराच्या पलीकडचं पाहतो आणि दाखवतो तो ऋषी. त्यांच्याइतकं ज्ञान मिळवायला आपल्या आधुनिक शास्त्रज्ञांना अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. सर्वे भवन्तु सुखिनः। हा दृष्टीकोन ठेऊन ऋषींनी प्रत्येक गोष्ट उभी केलेली आहे. आज ज्या विविध शोधांचे आपल्याला इतके कौतुक आहे, त्याविषयी आमच्या जंगल झोपडीत राहणार्या ऋषींनी आगोदरच फार मोठं संशोधन केलेलं आहे. गुलामीच्या साखळदंडांमुळे मेढरांच्या कळपात चरणार्या छाव्याप्रमाणे आपण आत्मविस्मृत बनलो.

समाजात काही गोष्टी ह्या इतक्या मुरलेल्या असतात की, त्या समाजातल्या सर्वांना माहितच असतील असं सर्रासपणे गृहीत धरल  जातं. त्याविषयी काही लिहून वगैरे ठेवावं असं कोणाला वाटत नाही. त्याविषयीचे उल्लेख नंतर सापडत नाहीत. अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना डोळसपणे तर्क वापरावा लागतो. श्रध्देच्या डोळ्यांनी बुध्दी चालवावी लागते.  श्रध्दाविहीन बुध्दी उपकारक तर्क करू शकत नाही. यासाठीच गणपतीचा अखंड दात श्रध्देचं तर खंडित दात हा बुध्दीचं प्रतिक मानला जातो.  सुप्रसिध्द तत्वज्ञ व्हाल्टेअर असे म्हणतो, Faith consists in believing when it is beyond the power of reason to believe. ज्याअर्थी आक्रमकांच्या कित्येक पिढ्या खपल्या तरी मंदिर नावाची संस्था  तग धरून आहे, त्याअर्थी तिचे सामर्थ्य आक्रमकांच्या रक्तपिपासू तलवारीपेक्षा अधिक मानायलाच हवे.

समाजामध्ये सर्व घटक कधीच समान असू शकत नाहीत. कायम  कोणी श्रीमंत, कोणी गरीब हा भेद राहणारच. समानता वगैरे गोष्टी व्यासपीठावरून बोलण्यासाठी ठीक वाटत असल्या, तरी  निसर्गाने जन्मत:च प्रत्येक व्यक्ती इतरांपासून भिन्न बनवलेली आहे. त्या भिन्नतेचा आदर करूनही सर्वांना एकत्र आणण्याची जागा म्हणजे मंदिर. जिथे सर्वजण आपला लहनमोठेपणा विसरून काही काळासाठी आपण एका भगवंताची लेकरे आहोत, या भावाने एकत्र बसतील. समाजात एकात्मभाव उभा करण्यासाठी ऋषींनी मंदिराची निर्मिती केलेली आहे.

असमर्थाला समर्थ बनवण्यासाठी मंदिरे आस्तित्वात आली. ज्याला जगण्याचं  साधन नाही, त्याला जगवण्याची जबाबदारी अनादी काळापासून मंदिरांनी आपल्या शिरावर वाहिलेली आहे. गावातील अडाणी खेडूतही शेतात पिकलेलं पहिलं कणीस देवळात देवासमोर ठेवतो. ते कणीस देव खात नाही. ज्याला गरज असेल तो ते खातो. क्षमता असताना फुकट खाल्लं, तर पुण्यक्षय होतो अशी आपली धारणा आहे. त्यामुळे या संबंध भारतवर्षात लोक उपाशी मरतील, पण कोणाकडून काही फुकट घेणार नाहीत. पण ज्यावेळी मंदिरातून घेतलं जातं ते दान वा मदत नसते. तो प्रसाद असतो. त्याचा फोटो कोणी सोशल मिडीयावर टाकून कोणाच्या गरीबीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगणारा नसतो.

सर्वांनी एकत्र येवून आपली सुखदु:खे देवाला सांगावीत, एकमेकांना सांगावीत, यासाठी मंदिरे असतात. परंतु आजकाल कोणत्याही मंदिरात जाताना आपण धक्काबुक्की करत आगोदर दर्शन घेऊन निसटण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यामागचा मूळ उद्देशच हरवतो. आपण ज्या मंदिरात जाणार आहोत, त्याचा संपुर्ण इतिहास समजून घेऊन गेलं, तर मनामध्ये भाव उभा राहतो. भावाने चित्तशुध्दी होते. धक्काबुक्की करण्याची गरजच पडत नाही. जिथे सद्विचारांचा स्वाध्याय चालतो, ते मंदिर. जिथे शक्तीची उपासना चालते, ते मंदिर. मंदिरे म्हणजे  समाजाची उर्जाकेंद्रे. आमचे लाखो ग्रंथ जाळल्यानंतरही विश्वाने माथ्यावर घेऊन मिरवावं, असं जे आमच्याकडे आहे, त्याचं बहुतांशी श्रेय मंदिरांना जातं. हा देश ताब्यात घेतल्यानंतर मेकॉलेला ज्या पाठशाळा आढळल्या त्या मंदिरांच्या आश्रयाने होत्या. आज त्याची आठवण ना मंदिरांना आहे ना मंदिरात जाणार्यांना.

मंदिरे समाज जोडण्यासाठी आस्तित्वात आली. आज जातीजातींची मंदिरे आस्तित्वात येत आहेत. मंदिरात गेल्यानंतर एकतरी अनोळखी माणसाचं सुखदु:ख जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.  तसं नसेल तर मंदिरात गेला काय अन् न गेला काय सारखंच.   धक्का देण्यापेक्षा प्रेम देऊयात. मंदिराने बोध द्यावा. परस्पर संवाद व्हावा. प्रत्येकाला सुख मिळावं. तिथं फक्त आत्मबोधाचंच देणंघेणं चालावं. माऊली म्हणतात, मग तया बोधाचेनि माजे । नाचती संवादसुखाचीं भोजें । आतां एकमेकां घेपे दीजे । बोधचि वरी ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

मंदिरे कशासाठी, what is need of temple
मदिरे कशासाठी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या