माळ का घालतात?

             एकजण मला म्हणाला, " माळकरी सगळे लबाड असतात. तो अमका, माळकरी असून मला असं असं म्हणाला.' मी म्हणालो, " नशीब तो माळकरी होता. फक्त बोलण्यावर थांबला. माळकरी नसता, तर प्रकरण  फार पुढं गेलं असतं." माळकर्यांकडून लोक किती अपेक्षा ठेवतात, याचं एकाचवेळी दु:खही झालं आणि कौतुकही वाटलं. किमान इतकी अपेक्षा लोकांनी माळ धारण करणार्यांकडून करावी, इतकी तरी माळीला समाजात आजही प्रतिष्ठा आहे, हे समाधान. एखादा माळकरी झाला, म्हणजे तो  संत झाला, असा त्याचा अर्थ होत नाही. कोणतंही परिवर्तन एका रात्रीत होत नाही. हळूहळू ढाळे ढाळे । केतूलेनी ऐके वेळे । मार्गाचेनी बळे । निश्चित ठाके ।।

            तुळसीची माळ का घालतात? 'तुळशीमाळा गळा कर ठेऊनी कटी' अशा स्वरूपात जर महाराष्ट्राचं आराध्य दैवत पूजलं जात असेल, तर त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असायला पाहिजे. तुळशीमाळ हा विषय लोकांनी चेष्टेचा करून ठेवलाय. गळ्यात तुळशीमाळ घालणे म्हणजे, मांसाहार न करणे, किंवा दारू न पिणे, इतकाच अर्थ काहीजण घेतात. अर्थात माळ खुंटीला टांगून पिणारे आणि खाणारेही कित्येक महाभाग असतात. स्वामी विवेकानंद म्हणतात, आपली भक्ती फक्त खाण्यातच अडकते. वास्तविक प्रश्न खाण्याचा नाही, मनाचा आहे. मनाला सामर्थ्य देण्यासाठी माळ मदत करते. मानवी मन भरकटलेल्या जहाजाप्रमाणे वारा येईल तिकडे भरकटणारे आहे. चंचल मनाला योग्य मार्गावर आणायचे असेल, तर योग्य दिशादर्शक हवा.

            आता प्रश्न असा उभा राहतो की, आपल्या मनाला मजबूत करायला माळ तुम्हाला काही मदत करते का? मानसशास्त्र  सांगतं, होय. माळ भगवंताच्या निकट आस्तित्वाची जाणीव कायम जागी ठेवायला मदत करते. जर जगाचा बाप कायम सोबत असेल, तर तुमच्या सगळ्या फिजूल तक्रारी क्षणात गायब होतात. रस्त्याने चालताना जर आजोबा सोबत असतील तर तरूण नातू , इकडे तिकडे ना पाहता शिस्तीत चालतो. आजोबा काही करत नसतात. त्यांच्या आस्तित्वाचा धाक असतो. गळ्यात माळ असेल, तर प्रत्येकाशी वागताना 'तो' माझ्या सोबत आहे, हा भाव जागा राहतो. भारतीय विचारधारा भगवंताचं सामिप्य समजावते. आमचा देव दूर कुठे आकाशात बसलेला नाही. तो माझ्या हृदयात आहे, तसा समोरच्या व्यक्तीच्या हृदयातही आहे. त्यामुळे कोणालाही फसवायचा प्रयत्न केला, तरी ती चोरी झाकून राहणार नाही. ही जाणीव व्यक्तीला सन्मार्गावरून च्यूत होऊ देत नाही.

            जरा आपली मोठ्या माणसाशी ओळख असली की, आपण फुशारून जातो. गल्लीतल्या भाऊ, दादा, तात्या, भावी नेते, माजी नेते असल्यांचा फोटो असलेला टी-शर्ट जरी घातला तरी आपल्याला आपण स्पेशल आहोत, असं वाटायला लागतं. अमूक कंपनीचा चष्मा, कपडे, बुट ,चप्पल घातली की, आपली चाल बदलते. मित्र अधिकारी झाला, तरी आपण झोकात चालतो.  तुळसीची माळ तुमची देवाशी गाठ घालून देते. Comradeship with god.  देव सखा जरी। विश्व अवघे कृपा करी।। हे सख्यत्व विसरलं जाऊ  नये, हे माळेचं काम.  समर्थाघरचा श्वान । त्याला सर्वही देती मान।। मोठ्या लोकांचं कुत्रही असलं, तरी त्याचं सर्वजण कौतुक करतात.

माळ ज्यावेळी आपल्या गळ्यात असते, त्यावेळी ती फक्त एका य:किंचित झुडपाच्या लाकडाच्या मण्यांची जंत्री नसते. तिच्यामागे प्रचंड मोठा इतिहास आहे. प्रह्लाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीष शुक शौनक भीष्मदाल्भ्यान् । रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन्  पुण्यानिमान् परमभागवतान् स्मरामि ।। या परम भागवतांचा जाज्वल्य इतिहास  त्या माळेमध्ये दडलेला आहे. अवघ्या जगाचा इतिहास यांच्यावरून ओवाळून टाकला, तरी यांच्या कर्तृत्वाच्या नखाचीही सर येणार नाही. एकेका तत्वासाठी आपल्या आयुष्याची कुर्वंडी करणारे हे महानायक फक्त माळकर्यांपुरतेच नाहीत, ते संपुर्ण जगाचे मार्गदर्शक आहेत. दुर्दैवाने आपल्या कथा किर्तनातून गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, म्हणून कंठशोष करणारे तिचा इतिहास बुध्दीगम्य पद्धतीने समाजाला कधी समजावत नाहीत.

गळ्यात तुळशीचीच माळ का घालायची? सोने, रूपे, मोती, पोवळे अशा आणखीही अनेक प्रकारच्या माळा असू शकतात. केवळ तुळशीच्या माळेलाच प्राधान्य देण्याचे कारण काय? तुळस म्हणजे मूर्तिमंत सात्त्विकता. तिच्या अस्तित्वाने वातावरणात शुद्धतेचा प्रवाह प्रवाहित होऊन मन प्रसन्न होतं. तुळस म्हणजे वड, पिंपळ, आंबा असला मोठा वृक्षही नाही. ना कोणते फळ, ना फुल.  तुळस म्हणजे साधेपणा. अपरिग्रहाचे प्रतिक म्हणजे तुळस. तोळा दोन तोळ्याची माळ घालून जर भक्तीचं सर्टिफिकेट मिळालं असतं, तर गरिबाच्या वाट्याला देव कधीच आला नसता. यारे यारे सानथोर। या ते भलते नारी नर।।हे वचन खरे व्हायचे असेल तर सर्वांना सोयीचं आणि परवडणारं साधन हवं. तुळस त्याचं उत्तर आहे. कुठेही सहज उपलब्ध असणे, हा तिचा आणखी महत्वाचा विशेष.

कपडे, चपला, बूट यावर कोण पुढारी वा व्यापारी कंपन्यांची नावे मिरवून त्यांची जाहिरात करायला आपल्याला लाज वाटत नाही. परंतु माळ  टिळा वगैरे गोष्टी आपल्याला कालबाह्य वाटतात. कोणी नट वा नटी एखाद्या वस्तूची जाहिरात करत असेल, तर त्यांना त्याचे दाबून पैसे मिळालेले असतात.  आपण मात्र फुकटात त्यांची जाहिरात करीत असतो.  माळकरी सद्विचारांचा ब्रॅंड एम्बेसेडर असतो. माळ फक्त एक वस्तू नसते, तिच्यामागे वेदांपासून गीतेपर्यांतचा, ज्ञानेश्वरीपासून गाथेपर्यंतचा विचार असतो. ती परिधान करणे म्हणजे तो विचार कायम स्वत:च्या  सोबत  बाळगणे.  तो भावसुगंध आपल्या आस्तित्वासोबत दिशादिशांतून पसरवून देणे. अठराव्या अध्यायात माऊली म्हणतात, तैसी भक्तां गीतेसीं । भेटी करी जो आदरेंसीं । तो देहापाठीं मजसीं । येकचि होय ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

माळ का घालतात,why to wear mala
माळ का घालतात?


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या