अभय

 

भीती ही मानवी जीवनाच्या आरंभीपासून मानवाची सावलीप्रमाणे सोबतीण आहे. परंतु जोपर्यंत जगण्याच्या पायात भीती असेल, तोपर्यंत व्यक्तीविकास अशक्य आहे. भीतीच्या त्यागाशिवाय विकासाच्या वाटा गवसत नाहीत, हेच सत्य आहे. जहाजाला बुडण्याची भीती आहे, म्हणून ते जर किनार्यावरच नांगरून ठेवलं, तर त्याच्या आस्तित्वाचा मूळ उद्देशच नष्ट होतो. आमच्या राष्ट्रवीरांना जर मृत्यूची भीती वाटली असती, तर आमच्या पुण्यभू मातृभूला कधी स्वातंत्र्याची पहाट पहायला मिळाली नसती. मृत्यूची भीती त्यागून आमचे ऋषी जर फिरले नसते, तर आज अनेक प्रकारच्या विविधतेतही जी सांस्कृतिक  एकता आसेतूहिमाचल अनुभवायला मिळते, ती दिसली नसती.

 भय या शब्दाचे विस्तृत विवरण दासोपंतांच्या गीतार्णव ग्रंथामध्ये पहायला मिळते. ज्ञानेश्वरीपेक्षा कितीतरी सुक्ष्म आणि  विस्तारपूर्वक विवेचन त्यांनी त्यामध्ये केलेले आहे. अमृत विषा ऐसे सांडवी । विष अमृतापरी घोटवी।। भय साधूते नाचवी । मादळेवीण।। अशा भयाच्या विविध किमया त्यांनी वर्णिलेल्या आहेत. ते मूळातूनच वाचण्यासारखे आहे. राजा भर्तृहरीने नीतिशतकामध्ये भयाचं सुंदर वर्णन केलेलं आहे. भोगे रोगभयं कुले च्युतिभयंवित्ते नृपालाद् भयं मानेदैन्यभयं बले रिपुभयं रूपे जरायाः भयम्। शास्त्रेवादिभयं गुणे खलभयंकाले कृतान्ताद् भयम् सर्व वस्तुभयान्वितं।।

धनहानी, मानहानी, प्रिय व्यक्तीचा वियोग आणि मृत्यू ही भयाची प्रमुख कारणे. धन मिळवताना अप्रामाणिकता केली असेल, तर धनाचा आनंद मिळणार नाही. पैसा कधी निघून जाईल याची खातरी नाही. जे आज मान देतात, ते उद्या अपमानही करू शकतात. लोकांचा स्वभावच चंचल असतो. ते आज ज्याला डोक्यावर घेऊन नाचतात, त्याला उद्या पायदळी तुडवतील. ज्यांनी एकेकाळी निरंकुश सत्ता गाजवली, आज त्यांचं नावही घेतलं जात नाही. जी व्यक्ती आपण आपली म्हणतो, ती उद्या अर्ध्या रस्त्यातच आपला हात सोडणार नाही, याची काहीही शाश्वती नाही. ज्यांच्यासाठी मायबाप पोटाला फडकं बांधून उपाशीपोटी कष्ट करतात, तीच लेकरं त्यांचा त्याग करतात. ज्यांच्यावर आपण सर्वाधिक प्रेम करतो, तीच माणसं आपल्याला सर्वाधिक दु:ख देतात. मृत्यू सावलीसारखा कायम सोबत असतो. आपल्या जीवनातला कोणता क्षण शेवटचा ठरेल, हे कोणालाही सांगता येत नाही.

दैवी गुणसंपत्तीचं वर्णन करताना भगवंताने अभयाला प्रथम स्थान दिलेलं आहे. दैवगुणांमाजीं धुरेचा बैसणा। महापुरात उडीच घातली नाही, तर बुडण्याची भीती उरत नाही. जीवनशैली योग्य असेल, तर रोगाचं भय जातं. जो निष्पाप असतो त्याचं भय नष्ट होतं. ज्याचा अहंकार नष्ट होतो, त्याचा संसाराविषयीचा  धाकही लयाला जातो. भेदभावातून भय जन्म घेतं. अभेदाचं ज्ञान झालं की, भय खलास होतं. सर्वांभूती ईश्वराचं ज्ञान झालं की भय नष्ट होतं.  माऊली म्हणतात, अथवा ऐक्यभावाचेनि पैसें । दुजे मानूनि आत्मा ऐसें । भयवार्ता देशें । दवडणें जें ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

अभय, how to be fearless
अभय
पूर्वप्रसिध्दी दै. पुण्यनगरी दि. २ जानेवारी २०२३


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या