चला, सोडून देऊयात!

           

चला, सोडून देऊयात!, art of forgivness
चला सोडून देऊयात

 
वीन वर्ष म्हटले की, प्रत्येकजण काही ना काही नवीन संकल्प करीतच असतो. या वर्षात अमूक एक मिळवीन, अमूक घेईन, अमक्या गावाला जाईन. असल्या प्रकारचे आपले संकल्प असतात. काही ना काही प्राप्त करणे, मिळवणे ही मानवी मनाची सहज प्रवृत्ती आहे. परंतु त्यामुळे आपला भौतिक पसारा इतका वाढतो की, प्राप्तीचा आनंद बाजूलाच राहतो, वस्तूंना सांभाळण्यातच आपली दमछाक होते. अट्टहासाने काहीतरी मिळवायचं. त्यासाठी मन:स्वास्थ्य खराब करायचं. मिळवल्यानंतर त्याची काळजी घ्यायची. त्याच्या काळजीत आपलं मुक्त जगणंच हरवून जातं.

            मनाच्या पातळीवरही बर्याच गोष्टी नकळत आपण जमा करत असतो. एखाद्याशी आपलं क्षुल्लक कारणावरून भांडण होतं. आपण आपला रूसवा कुरवाळत बसतो. मी कसा त्याच्याशी  वर्षभरापासून बोलत नाही, याचाच आपल्याला आभिमान वाटत असतो. त्या खोट्या अभिमानापायी  आपण गोड नात्याचा बळी देतो. आपलं भांडण काही अनोळखी व्यक्तीशी होत नसतं. ज्याच्याशी आपला काही निमित्ताने संबंध येतो, त्याच्याशीच वादाचे प्रसंग उभे राहतात.  नातं मेलं की, जीवनात कोरडेपणा येतो. नात्याला स्नेहाचं खतपाणी घालायला हवं. त्यासाठी साध्या साध्या बाबींचा राग मनात धरून कसं चालेल?

            ज्यामुळे कोणालाच फारसा फरक पडणारा नसतो, अशा हजारो चिंता आपल्याला सतावत असतात. रात्रीची निवांत झोप मिळत नाही. अगदी वेळेवर गाडी नाही मिळाली तरी टेन्शन. मुलगा परिक्षेला गेला, तरी टेन्शन. यश मिळालं तरी टेन्शन. अपयश आलं, तरी टेन्शन. गीता सांगते, शुभ आणि अशुभ दोन्हींचाही त्याग करता आला,  तरच प्रसन्न जीवन जगता येईल. प्रसन्नतेने सर्व दु:खांचा नाश होतो. मनाची हाव खुंटली की, धावाधाव कमी होते. एखाद्या गोष्टीचा अभाव असला, तरी व्यक्तीचा भाव घसरत नाही.

            ज्या ज्या प्रकारच्या विचारांनी आपल्या काळजावर ओझं ठेवल्यासारखं वाटेल, असे सगळे विचार सोडून द्या. काहीतरी मिळवण्याचा संकल्प करण्यापेक्षा सोडून देण्याचा संकल्प करा. ओझं कमी होईल. हलकं वाटेल. जे काही नकारात्मक असेल, ते टाकून द्या. ज्यांच्याकडे काही कमी असते, त्यांनी काही मिळवायचा संकल्प करावा. वास्तविक भारतीय विचारधारा प्रत्येकजण परिपूर्ण आहे, अशीच शिकवण देते. जर आपल्याकडे सर्वकाही असेल, तर नवीन कशाला जमा करायचे? हिताचं नाही ते, सोडण्याचा संकल्प करूयात. मग ते व्यसन असो, सवय वा स्वभाव.

           रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या