सत्वसंशुध्दि:

        

satva sanshuddhi, सत्व संशुध्दी
satva sanshuddhi

सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
ज्याची जशी श्रध्दा असते त्याप्रमाणे त्याचे आयुष्य बनते. सत्वानुरूप श्रध्दा आकाराला येत असेल, तर मग सत्व कशाने आकाराला येतं? मुळात सत्व म्हणजे तरी काय? सत्व म्हणजे आत्मसामर्थ्य! सत्व जसं हनुमंतात असतं तसं रावणातही असतं.  किंबहूना  काकणभर जास्तच असतं. पूजा मात्र मारूतीची होते. रावणाला नमस्कार नाही केला जात. कारण रावणाचं सत्व भोग, अहंकार आणि स्वार्थाने बरबटलेलं आहे. हनुमंताच्या सत्वात साधुत्वाचं तेज आहे. जीवनात शुचिता बाळगता आली, तर अशा प्रकारचं तेज निर्माण होतं.

राख कोणालाही जाळत नाही आणि स्वत:ही जळत नाही. अमावस्या आणि शुक्ल प्रतिपदा दरम्यान चंद्र दिसत नसला, तरी सुक्ष्म रूपाने विद्यमान असतो. पावसाळ्याचा पूर आणि ग्रीष्माची ओहोटी या मधल्या काळात गंगा स्थिर आणि निर्मल असते. त्याप्रमाणे ज्याला जीवनाच्या चढउतारांत आणि विपरित परिस्थितीतही चित्ताची समता टिकवता येते, त्याचंच सत्व शुध्द राहतं. जीवन जगतानाही आपण वारा येईल, तिकडे हेलकावे खात असतो. आपलं कोणत्याच बाबतीत निश्चित मत नसतं. प्रलोभने हजार येतील, ध्येयावरची नजर अढळ असायला हवी. तरचं सत्व कलंकीत होत नाही. सत्व निर्मळ असायला हवं.

सत्वानेच यशाची प्राप्ती होते. रावणाकडे सशस्त्र रथ होते. रामाला पायात घालायलाही चप्पल नव्हती. इंद्राला जिंकून घेणारे योध्दे रावणाच्या सेनेत होते. रामाकडे झाडपाला खाऊन जगणार्या आदिवासींची सेना. ना शस्त्र ना अस्त्र. दगड गोटे हीच आयुधं. केवळ साधनांनीच विजय मिळत असता, तर रामाला कधीच जय मिळाला नसता. ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता, त्यांनी अन्नाला महाग असलेल्या देशांना कधीच स्वातंत्र्य दिलं नसतं. रस्त्यावरच्या  दिव्याखाली अभ्यास करणार्या कोणा गरीबाच्या लेकराने जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं संविधान लिहिलं नसतं. रस्त्यावर खडी फोडणार्या माऊलीचं लेकरू  कधीही आयएएस झालं नसतं. उपकरणांशिवायही यश मिळू शकतं. तुमचं सत्व मजबूत असायला हवं. 'क्रियासिद्धिः सत्वे भवति महतां नोपकरणे।।'

एकदा एखादं तत्व जीवनात अंगीकारलं की, वाटेल ते झालं तरी त्यापासून मागे हटता कामा नये. निश्चयाने आत्मबळ वाढतं. आत्मबळ वाढलं की निश्चय पूर्णत्वाला जातात. 'निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ।।' अध्यात्मिक जीवन असो वा दैनंदिन संसारी जीवन ध्येयाचा ध्यास घेतल्याशिवाय सिध्दी मिळत नाही. सत्वशुध्दी झाल्याशिवाय ध्येयाचा ध्यास लागत नाही. दररोज हजार गोष्टी आपल्याला वाकुल्या दाखवित असतात. त्यांचा पाठलाग करताना जे मिळवायचं, त्याचा विसर पडतो आणि नको त्याचा पाठलाग सुरू होतो. जे उत्तम आणि कल्याणकारक आहे त्याचाच अनन्यभावाने पाठपुरावा करावा. माऊली म्हणतात, 'तेवीं सत्स्वरूप रुचलेपणें । बुद्धी जें ऐसें अनन्य होणें । ते सत्त्वशुद्धी म्हणे । केशिहंता ॥'

 रमेश वाघ, नासिक

संपर्क - ९९२१८१६१८३



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या