दम

 

मानवी मनाची प्रवृत्ती सतत बहिर्गामी असते. त्याला कायम बाहेर डोकावण्याची सवय झालेली असते. बाहेर सगळे उत्तमच मिळेल याची खात्री नसते. मनाची ही बहिर्गामी वृत्ती नियमित करून त्याला अंतरंगाकडे वळविण्यासाठी भगवान पतंजलींनी भारतीय मानसशास्त्र जन्माला घातलं. योगदर्शनातल्या एकशे शहाण्णव सूत्रात एकाही आसनाचा उल्लेख नाही. योग म्हणजे काय? पतंजली म्हणतात, योग: चित्तवृत्तिनिरोध: पांगलेल्या चित्तवृत्तींचा निरोध करणे, म्हणजे योग. योग हा खास मानवी मनाच्या विकासासाठी जन्माला आलेला आहे. योगाने शरीरस्वास्थ्यासाठी काही फायदे होत असतील, तर ते त्याचं बायप्रॉडक्ट समजावं. आत्म्याची निर्मिती परमात्म्यापासून झाली. नंतर त्याला त्याचा विसर पडला आणि जीवाशिवाची ताटातूट झाली. जीवाशिवाच्या पुनर्मिलनासाठी योग आहे.

            यमनियमासनप्रणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाधयोsष्टावङगानि। ही योगाची आठ अंगे आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम आणि शौच,संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे पाच नियम. यम नियमाच्या नियमित पालनाने व्यक्ती  आसने करण्याच्या योग्यतेची होते. कोणालाही आदर्श स्थितीतलं आसन करता येत नाही. आसनानंतर प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. ही आठ अंगे म्हणजे आत्मविकासाचे सोपान. त्यात प्रत्याहार महत्वाचा. कारण योगाचा नियमित सराव झाला की, काही सिध्दी प्राप्त होतात. सिध्दी देणं हा साधनेचा स्वभाव असतो. राक्षसाने साधना केली, तरी त्याला सिध्दी मिळते, हा इतिहास आहे.

            ध्येयावरची नजर कधीही न ढळू देण्यासाठी प्रत्याहार आवश्यक आहे. त्यालाच गीताकारांनी दम असा शब्द वापरला आहे. मानवी मन स्वभावत:च चंचल आहे. इंद्रिये या शरीररूपी रथाचे घोडे आहेत. त्यांना जिकडे हिरवा चारा दिसेल तिकडे  धावणारच. मन हा लगाम आहे. लगाम कमजोर पडला की, हा रथ अधोगतीच्या खाईत गेलाच म्हणून समजा. बर्याच गोष्टी मनाला कळत असतात, पण वळत नाहीत. ते वळवण्याची साधना म्हणजे दम. गावठी भाषेत म्हणतात, जरा दम धरा. दम धरायला शिकलं की, घोटाळा होत नाही. जगात जितके लोक कुपोषित आहेत, त्यापेक्षा जास्त लोक लठ्ठ आहेत. जिभ ताब्यात नसते. जे खाऊ नये ते खाणं, पिऊ नये ते पिणं, पाहू नये ते पाहणं, जिथे जाऊ नये तिकडे जाणं टाळता येत असूनही, टाळलं जात नाही, म्हणून प्रॉब्लेम निर्माण होतात.

            खड्गधारी योध्दा ज्याप्रमाणे शत्रूचे शिर कलम करून संकटांची शक्यता समाप्त करतो, त्या प्रमाणे नको त्या विषयांकडे धावणार्या इंद्रियांचे नियमन करणे म्हणजे दम. इंद्रियांना विषयांचा वारही लागायला नको. ज्या इंद्रियांच्या माध्यमातून विषय मनात प्रवेश करतात, त्या इंद्रियांच्या प्रवेशद्वारावरच वैराग्याची मशाल घेऊन दमरूपी द्वारपाल उभा करायचा. माऊली म्हणतात, आंतुला चित्ताचें अंगवरीं । प्रवृत्ति पळे पर बाहेरी । आगी सुयिजे दाहींहि द्वारीं । वैराग्याची ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९३२८१६१८३

Dam, दम
दम



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या