![]() |
doubt |
प्रत्येक गुलाबाला
काटे असतात, अशी एक म्हण आहे. ती तुमच्या नात्याला यथार्थपणे लागू होते.
नात्यामध्ये बरेवाईट क्षण परिहार्यपणे येतच असतात. एखादा टप्पा अत्युच्च आनंदाचा
येतो, तर एखाद्या अत्यंत वाईट. संशयाचा क्षण त्यातला सर्वांत वाईट टप्पा. संशयाची
वाळवी नात्याला पोखरून टाकते. बर्याच घरांत बाहेरून सगळं गोड गोड दिसत असलं, तरी
आतून मनं पोखरलेली असतात. सामाजिक व्यवस्थेची अपरिहार्यता म्हणून एका छताखाली राहावं
लागतं. दुसरा पर्याय मिळाला, तर घरट्यातून पक्षी उडावा तसा उडण्याची अनेकांची
इच्छा असते. दहातले नऊ जण 'मला तर नात्याचाच कंटाळा आला आहे' असे म्हणणारे भेटतात.
सर्वाधिक घरगुती हिंसा, घटस्फोट,
गुन्हे आणि आत्महत्या संशयाच्या कारणाने होतात. जे नातं जीवन समृद्ध करण्यासाठी
जन्माला आलेलं असतं, तेच जीवनाची राखरांगोळी करतं. संशयाचा रावण मन:शांतीरूपी सीतेचं हरण करतो. संशय निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत.
महत्वाची तीन म्हणजे पूर्वग्रह, आत्मविश्वासाचा अभाव, आणि संवादाचा अभाव. पूर्वी
कधीतरी कोणीतरी तुमचा विश्वासघात केलेला असतो. तो अनुभव तुमच्या डोक्यातून जातच
नाही. सध्याच्या नात्यातही जरासं काही वावगं घडलं की, तुम्ही त्याला तुमच्या जुन्या अनुभवाशी जोडून पाहता. परिणामी
समोर दोरी असली, तरी साप असल्याचा भास व्हायला लागतो. पूर्वग्रहाचं ओझं जोवर
तुमच्या मानेवर आहे, तोंपर्यंत नातं फुलत नाही. पूर्वग्रह सोडला की, नवी सुरूवात
करता येते.
मी कोणीतरी हलका किंवा हलकी आहे आणि
आपला जोडीदार आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हा भाव निर्माण झाला की, आत्मविश्वास खलास
होतो. त्यामुळे जोडीदार कोणाशी बोलला, तरी जीव खालीवर होतो. नातं तेव्हाच रूजतं
जेव्हा हा श्रेष्ठकनिष्ठतेचा भाव संपतो आणि एकत्व निर्माण होतं. कुटुंब म्हणून
तुम्ही एकच असता. भिन्न नसताच. संवाद हरवला की, संशय घरात घुसतो. कुटुंबातल्या
एकमेकांच्या फोनच्या स्क्रीनलॉकचे कोड आपल्याला माहित नसतात. काही तर ते रोज
बदलतात. इतकं काय गोपनीय असतं तुमच्या फोनमध्ये, जे तुम्हाला तुमच्या
जोडीदारापासूनही लपवावं वाटतं. याने संशयाला बळ मिळतं. अनेक घटस्फोट या
मोबाईलच्या पासवर्डने घडवून आणलेले आहेत.
संशय बळी घेतो, नात्याचा आणि सुखाचाही. संशयी व्यक्तीला खरेखोटे, हिताहित, बरेवाईट
कळत नाही. माऊली म्हणतात, तैसे साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें ।संशयी तो
नोळखे । हिताहित ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क- ९९२१८१६१८३
0 टिप्पण्या