तुम्ही फक्त कर्तव्य करा

 

तुम्ही फक्त कर्तव्य करा, youjust do your duty
 you just do your duty

परदेशातून एका वाचकाचा फोन आला. " मी आमच्या घरात चार भावांमध्ये शेवटचा. नोकरी करणारा पहिलाच. माझे शिक्षण माझ्या भावांनीच केले. मी जेव्हा भारत सोडला, तेव्हा गावात आम्हाला  पाटी टेकवयाला जागा नव्हती. आज बत्तीस एकर शेती आहे. मी तीनही भावांच्या मुलांना शिकविले. त्यांच्या मुलींच्या लग्नांचा सर्व खर्च केला. मोबाईल  रिचार्ज करायलाही पैसे मागतात. पुतण्याला प्लॉट घ्यायला पैसे दिले नाहीत, म्हणून भाऊ माझ्याशी बोलत नाहीत. मी इतकं सगळं करूनही, 'अमेरिकावाल्याने काय केले आमच्यासाठी?' असे गावभर बोलतात. त्याचा मला खूप मन:स्ताप होतो. रात्रभर झोप लागत नाही. काय करू?"

 अशी परिस्थिती थोड्या बहुत फरकाने प्रत्येक घरात दिसेल. घरोघरी मातीच्याच चुली. करतो तोच मरतो. आईबाप अनंत खस्ता खाऊन ज्यांना मोठे करतात, तीच मुले मोठेपणी म्हणतात आईवडिलांनी आमच्यासाठी काय केले? ज्या भावंडांसाठी आयुष्य वेचले तेच कृतघ्न होतात. अशावेळी यांना मदत करण्यात आपली चूक तर नाही ना झाली? असा अपराधीभाव मनात निर्माण होतो. मनात चोहोबाजूंनी निराशेचे मळभ दाटून येतात. आयुष्य फुकट गेल्यासारखे वाटते.

यातून सुटण्याचा मार्ग गीतेने सांगितलेला 'कर्मण्येवाधिकरस्ते' हाच आहे. तुम्ही तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे केले ना? बस्स! आता परिणामांकडे  दुर्लक्ष करा. तुम्ही अमूक केले असे कुणीतरी म्हणावे, ही अपेक्षाही ठेऊ नका. अपेक्षभांगाचे दुःख मोठे असते. आपलं वागणं आपण ठरवू शकतो, परंतु समोरच्याने कसं वागावं, हे त्याचे जन्मजन्मांतरीचे संस्कार ठरवतात. मी काहीतरी केलेय वा करतोय हा कर्तृत्वाचा अहंकार सोडला की, अपेक्षा उरत नाही. अपेक्षा सरली की कोणी कसाही वागो, व्यथा होत नाही.

जगात कोणीही कोणाला दुःख देऊ शकत नाही. समोरच्याने कसे वागावे याबाबत आपले काही आडाखे असतात. ते चुकले की, दुःख होते. नियतीने आपल्या खांद्यावर जी जबाबदारी दिली ती इमानदारीने निभवावी. मी अमूक केले म्हणजे तमूक व्हायला पाहिजे असा आग्रह नसावा. जग स्वार्थी आहे. अपेक्षांचे बंध तोडले की, मुक्तीचा आनंद अनुभवता येतो. ज्या गोष्टी दुःख देतात त्यांचा विचार सोडा. तुम्ही फक्त कर्तव्याचा विचार करा. फळ मिळालेच तर देवाचा प्रसाद. माऊली म्हणतात, तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला । तो घर रिघोनि वरिला । शांति जगीं ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

तुम्ही फक्त कर्तव्य करा, you just do your duty
you just do your duty


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या