यज्ञ

 

यज्ञ, yadnya
यज्ञ

 दररोज सकाळी नदीच्या किनारी एक गुराखी बाबा भेटतात. त्यांचं नाव गाव काहीही माहित नाही. अनोळखी असले, तरी ओळखीचं हसतात. 'राम राम गुरूजी', असं गोड स्वागत करतात. मीही उलट 'रामराम घालतो'. एक विचार मात्र सारखा डोक्यात पिंगा घालतो. रामाला जाऊन कमीत कमी पंधरा हजार वर्षे झालीत. जे बाबा रामराम घालतात, त्यांच्या सात पिढ्यांतही कोणी शाळेचं तोंड पाहिलेलं नाही. ना पोथी, ना पुराण, ना वाचन. कुठली सांप्रदायिक परंपराही नाही. मग यांच्या मुखात राम कसा आला? गावोगावी लग्न, हळदी समारंभात अडाणी, वयस्कर स्त्रिया अजूनही सीतामाईचीच गाणी का म्हणतात?

            याचं कारण यज्ञ. माणसाला माणसाशी माणूसकीच्या धाग्याने जोडणारं  क्रांतिकारक सांस्कृतिक साधन म्हणजे यज्ञ. माणसं सुधारतात तेव्हा, अंधश्रध्दा कमी होते. राक्षसी विचारधारेला आव्हान मिळते. म्हणून यज्ञाचा आणि यज्ञ करणार्या तपस्व्यांचा नाश करण्याचं काम राक्षस करतात. या राक्षसांच्या जुलुमापासून पहिल्यांदा ही भूमी निर्भय आणि स्वतंत्र बनविली रामाने. तेव्हापासून राम जनमनाचा अधिनायक बनला. तो कल्पांतापर्यंत सज्जनांच्या हृदय सिंहासनावर राज्य करेल. नर, वानर, कोळी, पारधी, भिल्ल, नगरजन, गिरीजन सर्वांना माणूसकीच्या एका सूत्रात बांधणारा राम होता. ते सूत्र होतं यज्ञ. यज्ञ हा शब्दच युज धातूपासून बनला आहे. युज म्हणजे जोडणे. जेथे जेथे माणसामाणासांत संवाद आणि सौहार्दाचा सेतू बांधण्याचं काम चालतं, तो यज्ञ.

            भीवरेच्या वाळवंटात वारकरी जात पात विसरून एकमेकांच्या मुखात प्रेमप्रसादाच्या मुठी देतात. हरिनाम सप्ताहात गावोगाव अठरापगड जातींच्या दारात पंगती उठतात. भेदभ्रमाचे कृत्रिम पडदे दूर सारून, जेव्हा समाज एकत्वाने उभा राहतो, तेव्हा तो यज्ञ होतो. तिथे भांडणाला वाव नसतो. जिथे कलह वाढतो, तिथे असूरी शक्ती प्रबळ झाली, असे समजावे. असूर समाज एक होऊ देत नाहीत. यज्ञीय कार्य करणारे समाज फूटू देत नाहीत. सुष्ट आणि दुष्टांमधला हा संघर्ष कालातीत आहे. सुष्टांना बळ देणारी शक्ती म्हणजे यज्ञ. प्रत्येकाने आपले विहितकर्म अपेक्षाहीत भावनेने करणे म्हणजे यज्ञ. केवळ होम, हवन, स्वाहा आणि भोजनावळी म्हणजे यज्ञ नाही.

            या राष्ट्राला तोडण्याचे अनंत प्रयत्न अनाचारी आक्रमकांपासून, ते आजच्या त्यांच्या अनुयायांपर्यंत कित्येकांनी केले. तरी हा देश अखंड आहे. हिमालयपासून कन्याकुमारीपर्यंत एकच विचार पेरणारे हजारो अश्वमेध या देवभूमीच्या पराक्रमी पुत्रांनी केले. त्याचा परिणाम म्हणून आज या देशात भाषा, वेश, प्रदेश वेगळा असला तरी संस्कृती एक आहे. कर्तेपणाचा अहंकार सोडावा. वेदांनी विहित केलेल्या कर्ममार्गाचे अनुसरण करावे. दु:ख, दैन्य, दारिद्र्य याच्या पल्याड जाण्याची वाट दाखविणारा वाटाड्या म्हणजे यज्ञ. माऊली म्हणतात, अर्जुना एवं यज्ञु । सर्वत्र जाण साज्ञु ।कैवल्यमार्गींचा अभिज्ञु । सांगाती हा ॥

रमेश वाघ, नासिक

संपर्क- ९९२१८१६१८३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या