ग्रंथ करावे सोबती

         हल्ली मूलं वाचीतच नाहीत, अशी तक्रार आईबाप मोबाईल मधलं डोकं बाजूला न करता करीत असतात. त्यापूर्वी काही प्रश्नांची उत्तरे तुम्हीच तुम्हाला द्यायला हवीत. तुम्ही मुलांसाठी नियतकालिके खरेदी करता, पण तुम्ही स्वत: किती नियतकालिकांचे वर्गणीदार आहात? तुमच्या हातात मोबाईल जास्त वेळ असतो की, पुस्तक? तुमच्या घरात मोठ्या स्क्रीनचा टिव्ही असतो, पण ग्रंथांसाठी एखादा कोपरा असतो का? आवडलेल्या पुस्तकाबद्दल मुलांशी गप्पा मारता का? उशाला मोबाईल घेऊन झोपता, कधीतरी उशाला पुस्तक घेऊन झोपावं असं वाटतं का?

granth kara re sobati, how to read

सिनेमा पाहण्यापेक्षा तो ज्या पुस्तकावर बेतलाय ते पुस्तक वाचणे भारीच असते. याची जाणीव आपण मुलांना करून देतो का? माझं अमुक काम राहिलंय, म्हणून आपण जितकी धावपळ करतो, तितकी या आठवडयात मला हे वाचायचं होतं, पण राहिलं, अशी तोंडदेखली का होईना खंत प्रकट करतो का? नातेवाईक, मित्रांशी प्रत्यक्ष आणि फोनवरही बोलताना सांसारिक चर्चा करतानाच(उदा. ती सध्या काय करते?  वगैरे)  सध्या काय वाचताय, हा प्रश्न आपण विचारतो का? टीव्हीचा, फोनचा रिचार्ज संपला की, आपण लगेच मारतो, किमान तितक्या पैशांची तरी पुस्तक खरेदी महिन्याला आपली होते का? कित्येक लोकांच्या घरी वर्तमानपत्रही येत नाही. नियतकालिके, दिवाळी अंक आणि पुस्तके तर दूरची बात. कित्येकांना अमूक पुस्तक घ्या, अशी आम्ही शिफारस करतो, तेव्हा वेळच नाही, अशी लोणकढी थाप बिनधास्तपणे मारतात.

तुम्ही वाचा म्हटल्याने कोणी वाचीत नसतो. तुम्ही वाचताना दिसला पाहिजेत. तुम्हाला पाहून मुले शिकत असतात. मुलांना सांगण्यापेक्षा प्रश्न विचारण्याने जास्त प्रेरणा मिळते. नऊ वर्षे सतत आततायी शत्रूंशी एकहाती झुंज घेतानाही शंभूराजांनी बुधभूषणम् सारखे ग्रंथ लिहिले, त्यांनी काय आणि किती वाचलं असेल, असा खडा टाकल्यागत प्रश्न तरी आपण मुलांसमोर मांडतो का? जी लोक वाचून मोठी झाली, त्यांच्या यशाच्या चर्चा व्हायला हव्यात. एलॉन मस्कपासून ते शाहरूख खानपर्यंत प्रत्येक मोठा माणूस हा वाचनाने घडलेला आहे. वाचनाने दृष्ट आणि अदृष्ट सर्वच सुखं व्यक्तीला प्राप्त होतात. आदिपुरूषाचे भजन जितके महत्वाचे आहे, तितकेच वाचनही महत्वाचे. जीवनात ग्रंथच सोबती करावेत. आता एका क्लिकसरशी पुस्तके घरपोच येतात. माऊली म्हणतात, आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥

संपर्क - रमेश वाघ, नासिक

मो. ९९२१८१६१८३

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या