![]() |
ha-konata-shahanpana |
तुम्ही कोणाच्या घरात जन्माला यावं, हे तुम्हाला ठरवता येत नाही. ते स्वातंत्र्य तुम्हाला नसतं. श्रीमद्भगवद्गीता सांगते तुमचं पूर्वजन्माचं कर्म तुमचा जन्म निश्चित करतं. तुमचा जन्म तुमचे नातेसंबंध निश्चित करतो. अमूक मामा, मावशी, आत्या हे तुम्हाला जन्माने दिलेली नाती असतात. तुमचा मामा खूप श्रीमंत आहे, यात तुमचे कर्तृत्व काय? तुमचे आजोबा पाकिस्तानसोबतच्या युध्दात पराक्रम गाजवून आले. तुम्ही त्याच गोष्टी गुटखा चघळत मित्रांना सांगता. त्याच शिदोरीवर आजही मिरवण्याचा प्रयत्न करता. हा कोणता शहाणपणा? 'सांगे वडिलांची किर्ती तो एक मुर्ख' असे समर्थ म्हणतात. ते यासाठीच. एखाद्याची सासरवाडी श्रीमंत वगैरे असेल, तर याच्या फुशारक्या मारण्यात काय हशील? काही जणींना तर आयुष्यभर विनाकारण माहेरचे गोडवे गाण्याची हौस असते. कणगीचं खायचं आणि इरल्याला गायचं.
जे आपलं नाहीच त्याच्या अहंकाराचा भार माथ्यावर वाहणं व्यर्थ आहे. ज्ञानेश्वरी अशा लोकांना असूर म्हणते. यांचा तोरा वेगळाच. मी धनवान, मी कुलीन, माझ्यासारखा दुसरा कोण? कुबेरालाही माझ्या ऐश्वर्याची सर येणार नाही. साक्षात लक्ष्मीपती नारायण देखील माझ्या संपत्तीची बरोबरी करू शकणार नाही. माझ्या कुळाची शुद्धता, जातीचा व गोताचा समुदाय पहाता ब्रह्मदेव देखील हलका ठरावा. तापाने फणफणल्यावर रोगी जसा वाटेल तसा बडबडतो, त्याप्रमाणे ते मनोरथांची वाटेल तशी वटवट करीत असतात. दुसर्याच्या सावलीला उभा राहणारा स्वत: प्रकाशित कधी होणार? माऊली म्हणतात, अज्ञान आतुले धुळी । म्हणौनि आशा वाहटुळी । भोवंडीजती अंतराळीं । मनोरथांच्या ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - 9921816183
![]() |
हा कोणता शहाणपणा? |
0 टिप्पण्या