![]() |
जीभ गोड तर
जग गोड
मराठी कविता
दिनाच्या निमित्ताने सार्वजानिक वाचनालयाच्या वतीने 'मी कवी
कसा झालो' या विषयावर तीन मिनिटे सादरीकरण करण्यासाठी कवींना
आमंत्रित केले होते. मी कवितेकडे कसा वळलो, या विषयीचा टर्निंग पॉईंट सांगायचा
होता. कित्येकांनी याचा अर्थ आपले संपूर्ण आत्मकथन सांगायचे आहे, असाच घेतला. संयोजकांना त्यांना बळेच थांबवावे लागत होते. आपल्याला देवाने
तोंड दिलंय, म्हणजे कितीही बोललं तरी चालेल, असाच काहींचा ग्रह असतो. देवाने
माणसाला दोन कान आणि एकच मुख दिलेलं आहे. त्यामागचा भाव हाच की, माणसाने कायम एकपट बोलावं आणि
दुप्पट ऐकावं. आपण मात्र नेहमीच उलट वागत असतो.
कित्येकजण जे बोलतात ते बरंही नसतं
आणि खरंही नसतं. तोंडाची टकळी मात्र अखंड चालूच. आमचा एक परिचित आहे. तो समोरून
येताना दिसला की, लोक पळून जातात. त्याच्या बोलण्यात एखाद्यावर टीका किंवा निंदा
यापलीकडे दुसरा काहीही विषय नसतो. ज्याच्यावर टीका केली जाते, त्याच्याशी आपली
ओळखही नसते. मग विनाकारण त्याची निंदा ऐकण्यात आपण वेळ का वाया घालवायचा? काहींना कायम नकारात्मक बोलायची सवय असते. त्यांना कोणत्याही गोष्टीत चांगले
काही दिसतच नाही. एखाद्याचं लग्न जमलं, तरी ते
कसं मोडणार, याविषयाचे आपले अंदाज हवामान खात्याच्या अविर्भावात ही मंडळी
वर्तवित फिरत असतात. एखादा अभ्यास करत असला तरी, 'काय फायदा
अभ्यासाचा?, दे सोडून!' म्हणून त्याला
खचविणार.
श्यामची आई श्यामला सांगते, 'जीभ गोड, तर जग गोड.' हा संदेश आपणा सर्वांसाठीच आहे.
व्यक्तीने मितभाषी असायला हवे. आवश्यकता नसेल, तर मौन धारण करायला हवे. नको तिथे,
नको ते बोलल्याने मोठेमोठे अनर्थ जगाच्या
इतिहासात घडलेले आहेत. माणूस दोन वर्षांचा होईपर्यंत बोलायला शिकतो. परंतु कसं आणि काय बोलावं, हे त्याला शेवटपर्यंत कळत नाही. वाणी ब्रह्माचं रूप आहे. आपल्या शब्दांनी
कोणांचही आत्महनन होता कामा नये. जी अमृतासमान असते, ती अमृतवाणी. तुमच्या
शब्दांनी समोरच्याला बळ मिळालं पाहिजे. नेताजी, गांधीजी, छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या शब्दांनी लाखो लोकांच्या हृदयात प्रेरणेचा प्राण फुंकला. त्यांच्या
बोलांनी सामान्यांच्या असामान्य कर्तृत्वाचा इतिहास लिहिला गेला. माणसाने बोलावं
कसं? माऊली म्हणतात, साच आणि मवाळ। मितुले आणि रसाळ। शब्द
जैसे कल्लोळ। अमृताचे।।
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
0 टिप्पण्या