परंपरेचं डोळस पाईकपण

 

पाईकपण, soldier of god
पाईकपण

साल १६४८. सुभानमंगळाचा कोट घेऊन फत्तेखानाने आपली छावणी खळद बेलसरच्या परिसरात टाकलेली. मराठ्यांची एक तुकडी खानावर अचानक हल्ला करते. छावणीची दाणादाण, कापाकापी! काम फत्ते! आघाडीची तुकडी परत फिरते, पण ध्वजवाहक तुकडी अडकते. तितक्यात गनिम ध्वजधारक मावळ्यावरच घाव घालतो. स्वराज्याच्याचा भगवा भूईवर पडणार, इतक्यात एक मर्द मावळा विजेच्या वेगाने गर्दीत घुसतो. झेंड्याभोवतीचे गनीम क्षणार्धात कापून काढतो. कोणाला काही कळायच्या आत ध्वज आणि जखमी मावळ्याला घेऊन पुरंदराकडे पसार होतो. त्या मावळ मर्दाचं नाव, बाजी जेधे. महाराज म्हणाले, "सिंहाला साजेसं काम केलंत, आजपासून आम्ही तुम्हाला सर्जेराव हा किताब बहाल करीत आहेत." आयुष्यभर स्वराज्याच्या धन्याची सावलीप्रमाणे साथ करणारे बाजी सर्जेराव जेधे ते हेच.

            आज तिथीनुसार शिवजयंती म्हणून हे स्मरण. ध्वज तुमच्या अस्मितेचं, ध्येयाचं आणि आस्तित्वाचं प्रतिक असतो. ध्वज आहे, म्हणजे तुम्ही आहात. ध्वज पडला की, खलास. पूर्वी लढाईत ध्वज दिसला नाही की, सैन्य पळून जायचे, हाताशी आलेला विजय पराभवात परिवर्तित व्हायचा. पानिपत आणि तालिकोटचा इतिहास पहा. जो ध्वज आम्ही रस्तोरस्ती लावतो, त्याच्या मागचा इतिहास आपल्याला ठाऊक तरी असतो का? शिवप्रभूंनी देवाधर्माचं राज्य उभा केलं, म्हणून देवाचा ध्वज तोच हिंदवी स्वराज्याचा ध्वज. त्या ध्वजामागे बाजी, तानाजी, येसाजी, रामजी, संताजी, धनाजी अशा अनेक अनाम महावीरांच्या शौर्य आणि बलिदानाची गाथा आहे. कुठेतरी पडून त्या ध्वजाची तेजपरंपरा मलीन होणार नाही इतकंच लक्षात ठेवूयात.

            शिव म्हणजे कल्याण. शिव म्हणजे मंगल. शिवजयंती म्हणजे आमच्या हृदयात मांगल्याचा जन्म होणे. भगवा हाती घेणं, म्हणजे त्यामागे असलेल्या जाज्वल्य इतिहासाचं पाईकपण शिरावर घेणं. माझ्या देशातल्या समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा पाईक होण्याची शपथ आपण प्रत्येकाने घेतलेली आहे.  फक्त घोषणा देऊन शिवजयंती होत नसते, कृतीची जोड असावी. भगव्याकडे पाहताना त्याच्यासाठी प्राणाची कुर्वंडी करणारे महानायक त्यात दिसले पाहिजेत. 'प्रतिप्चंद्रलेखेव...'  मुद्रा काळजावर उमटली पाहिजे. 'उभारिला ध्वज तिहीं लोकांवरी । ऐशी चराचरी कीर्ति ज्याची ॥' असा शिवरायांचा किर्तिध्वज. त्या स्वराज्यध्वजाचा अपमान होऊ नये, इतकीच आजच्या पवित्र दिवशी अपेक्षा. धर्मरक्षणार्थ जो ध्वज उभारला जातो, त्यावर साक्षात शिवशंकराचा वास असतो. माऊली म्हणतात, ध्वज स्तंभावरी वानरु। तो मूर्तिमंत शंकरु।

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या