![]() |
स्वाध्याय
जगात
काय चाललंय याची तुम्हाला खबर असते,पण घरातलं काही ठाऊक नसतं. शेजारणीचे सगळे
किस्से माहीत असतात, पण आत्ता विचारा, बायकोच्या हातातल्या बांगड्यांचा रंग सांगता
येणार नाही. माणूस लोन काढून जग फिरण्याच्या बाता मारतो, पण गावाबाहेरच्या भग्न
मंदिराचं ऐतिहासिक शिल्पसौंदर्य डोळाभरून न्याहाळावं, असं
त्याला कधी वाटत नाही. उत्क्रांतिवाद, फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती
कदाचित सगळ्यांनाच तोंडपाठ असेल, पण आपल्या घरातल्या चौथ्या-पाचव्या
पिढीपलीकडचा इतिहास कोणाला सांगता येणार नाही. पानिपतात महाराष्ट्रातला घरटी एक
माणूस गेला असे म्हणतात, पण आपल्या घरातला कोण गेला, हे कोणालाच
माहित नाही.
सतत
बाहेर धावणार्या मानवी मनाला, आपल्या आत
डोकावयाला लावणं म्हणजे स्वाध्याय. स्व± अध्याय म्हणजे स्वाध्याय. अध्याय म्हणजे
धडा. जीवनाच्या पाठशाळेत मिळालेल्या धड्याचे पुन्हा पुन्हा मनन करून त्यापासून बोध
घेणे, म्हणजे स्वाध्याय. सतत जगाचा अभ्यास करीत राहण्यापेक्षा स्वत:चा अभ्यास करीत राहणे, म्हणजे स्वाध्याय. तैत्तिरिय उपनिषदातल्या प्रथम
वल्लीतील नवव्या अनुवाकात स्वाध्यायचे सविस्तर विवरण दिलेले आहे. आश्रमातलं शिक्षण पूर्ण झाल्यावर गृहस्थाश्रमात कसे
राहावे, याविषयीचे आदेश अकराव्या अनुवाकात दिलेले आहेत. त्यात स्वाध्यायान्मा प्रमदः ।, स्वाध्यायप्रवचनाभ्यां न
प्रमदितव्यम् । हे प्रमुख.
प.पू
पांडुरंगशास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याय परिवार स्वाध्यायची संकल्पना प्रत्यक्ष जगण्यात
उतरवतो आहे. घरातल्या महागड्या फर्निचरवर धूळ झाली, म्हणून कोणी ते फेकून देत
नाही. त्यावरची धूळ झटकून त्याला लखलखीत बनवलं जातं. सांस्कृतिक साधनांवरची धूळ झटकून
त्याला काळाच्या अनुषंगाने झळाळी देण्याचं काम स्वाध्याय परिवार करतो आहे. मी कोण,
कोणाचा, कोणामुळे, कशासाठी आहे, या प्रश्नांचा शोध घेणे, म्हणजे स्वाध्याय. या
प्रश्नांचं उत्तर देणारं ब्रह्मास्त्र म्हणजे त्रिकालसंध्या. सकाळी उठल्यावर, दुपारी
जेवताना आणि रात्री झोपताना दिवसातून किमान तीन वेळा, जो आपलं जीवन चालवितो,
त्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करायचं. त्यामुळे मला सतत सांभाळणारा कोणीतरी आहे, हा
भाव सतत जागा राहतो. मनामध्ये अहंकार उत्पन्न होत नाही. अहंकार गेला की, आग्रह
जातो. त्यामुळे संघर्ष उद्भवत नाहीत. असलेले संघर्ष निवळतात.
चेंडू
पुन्हा हातात यावा, म्हणूनच जमिनीवर मारतात. एका दाण्याचे शंभर दाणे उगवून यावेत,
म्हणूनच मातीत बी विखरून देतात. अंधारात ठेवलेली वस्तू दिसावी, म्हणून दिवा हातात
घेतात. वृक्षाला फळे, फुले यायला हवी असतील, तर त्याच्या मुळाला सिंचन करावं
लागतं. आपलं प्रतिबिंब नीट दिसावं वाटत असेल, तर आरसा वारंवर स्वच्छ करावा लागतो. तसं
परमात्म्याचं प्रतिबिंब जीवनात पडायचं असेल, तर अंत:करण
घासून पुसून लख्ख करायला हवं. अंत:करणाचं मालिन्य घालविण्याचा
अभ्यास म्हणजे स्वाध्याय. माऊली म्हणतात, तैसा वेदप्रतिपाद्यु जो ईश्वरु । तो
होआवयालागीं गोचरु ।श्रुतीचा निरंतरु । अभ्यासु करणें ॥
रमेश वाघ, नाशिक,
संपर्क - 9921816183
![]() |
स्वाध्याय |
0 टिप्पण्या