जगण्यात मार्दव असावं

 

जगण्यात मार्दव असावं, jagnyat-mardav-asave
jaganya-mardav-asave

काही लोक जखमेला बांधले, तरी खुपत नाहीत. काही बरोबर जखमेवरची खपली काढतात. काहींचं तत्वज्ञानच विचित्र असतं. नात्यन्तं सरलेन भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम् छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः। माणसानं अति सरळ असू नये. जंगलात सरळ झाडंच पहिल्यांदा कापली जातात. वाकड्यातिकड्या झुडूपांना कोणी हात लावत नाही. अति सरळ असू नये, म्हणजे बोराटीच्या झुडपासारखं दिसेल त्याला ओरबाडावं असंही नाही. आजकाल तुम्हाला ओरबाडणारेच जास्त भेटतील. देव भावाचा भुकेला असं भक्त म्हणतात. आज सर्वाधिक भावनिक कुपोषण माणसाचं झालेलं आहे. व्यक्ती स्वत:च कुपोषित असेल, तर तो दुसर्याचं पोषण कसा करू शकेल. भेटणार्या प्रत्येक व्यक्तीपासून मला फायदा काय, हाच विचार सर्वप्रथम त्याच्या डोक्यात येणार. या फायदावादी वृत्तीने अंतिमदृष्ट्या सर्वांचाच तोटा होत असतो.

काहींचा जन्मच इतरांना दु:ख देण्यासाठी आहे असं वाटावं; असं त्यांचं वागणं असतं. ज्यांच्या पोटी जन्माला येतात, त्यांनाही ताप देतात. जे यांच्या पोटी जन्माला येतात, त्यांचंही अकल्याण करतात. ज्यांच्या सोबत जगतात, त्यांच्या जीवनाचा नरक बनवून टाकतात. समाजात नकारात्मकतेचा प्रसार करतात. जीवनात अशुभाचीच पेरणी केलीत, तर शुभाचे अंकुर कसे फुटणार? यांच्या इच्छेला केवळ नवनव्या स्वार्थाचेच धुमारे फुटत असतात. त्यांचं पोट सर्वभक्षक असतं. सर्वांचं सर्वकाही गिळंकृत केलं, तरी ते तृप्त होत नाहीत. शेजार्याचा बांध कोरणार्यांपासून मोठमोठे घोटाळे करणार्यांपर्यंत, या सर्वांचं गोत्र एकच असतं. माऊली त्यांना असूर संबोधतात.

तुमच्याकडे काही असो वा नसो तुमची मन:स्थिती स्थिर ठेवा. प्रत्येकाला शेवटी फक्त कर्मांच्या आठवणीच ठेवून जावं लागणार आहे. कोणी  तुमच्याशी कसाही वागो, तुम्ही इतरांशी कसं वागायचं याचं  स्वातंत्र्य तुम्हाला कायमच उपलब्ध असतं. लोक वाईट वागतात म्हणून तुम्ही वाईट वागायला जाल, तर आगोदर तुम्हाला वाईट व्हावं लागेल. स्वत:चं चरित्र मलिन करून घ्यावं लागेल. ते सज्जनांना परवडणारं नाही. आपण माणुसकीच्या अंगणात मांगल्याचा सडा शिंपडावा.

जगावं कसं? जीवन शिक्षणाचं जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजे ज्ञानेश्वरी. तिथून जगण्याची दीक्षा घेतलीत, तर  तुमच्या सर्व समस्या खलास होतील. असं जगावं की, तुमचं आस्तित्व कोणाला खूपू नये. मधमाशांना मोहोळ सुखकर वाटतं. जलचरांना पाणी टोचत नाही. पाखरांना भरारी घेण्यापासून आभाळ अडवत नाही. आईची लेकराविषयीची माया मृदुल असते. वसंतात मलयगिरीवरून वाहात येणारा वारा स्पर्शाला मवाळ असतो. कासवीची दृष्टी तिच्या पिलांचं पोषण करते. आकाश आपल्या पोटात अवघ्या विश्वाला धारण करतं, तरीही प्रत्येक परमाणूमध्ये सामावलं जातं. विश्वाचाच आकार धारण करतं. जगाच्या कल्याणाकरता जगणं म्हणजे  मार्दव. माऊली म्हणतात, काय सांगों ऐसें जिणें । जें जगाचेनि जीवें प्राणें । तया नांव म्हणें । मार्दव मी ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क ९९२१८१६१८३

जगण्यात मार्दव असावं

जगण्यात मार्दव असावंटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या