मनाची खिडकी पुसा

 

मनाची खिडकी पुसा

            श्रावणात सृष्टी हिरवाईने नटते. संसारतापाने पोळलेलं मनही हिरवं व्हावं म्हणून आपल्या संस्कृतीने याच काळात मोठ्या प्रमाणात व्रत-उत्सवांची योजना केलेली दिसते. व्रतानं मन स्वच्छ होतं. हल्ली लोक देवासाठी म्हणून व्रतं करतात. वार पाहून स्टेटस् बदलतात. वास्तविक जो चंद्रसूर्यांना गती देतो, नियमितपणे तुमचं हृदय चालवतो, त्याला तुमच्या उपवास धरण्या न धरण्याने फरक पडणारा नसतो. घरात अभ्यास करणार्या मूलाला वाटतं की, तो आईबापांवर उपकार करतोय. पण त्याला हे कळत नसतं की, हा अभ्यास त्याच्यासाठीच असतो. देवावर उपकार म्हणून व्रतवैकल्ये करणार्यांना हे ठाऊक नसतं की, व्रतं त्यांच्याच मनाच्या शुध्दीसाठी आहेत.

            दृष्टी तशी सृष्टी अशी म्हणी ऐकतच आपण सर्व लहानचे मोठे झालो. पण त्याची प्रचिती घेण्याचा प्रयत्न कधी केला नाही. समाजातल्या नकारात्मक व्यवहाराने आपली नजर नकारात्मक बनत जाते. आपल्या मनाच्या खिडकीवर दररोज अहंकार, मद, मत्सर, ईर्षा आदींची धूळ बसत जाते. त्यामुळे आपली स्पष्टपणे पाहण्याची नजर हरवते. नजर बदलली की, नजारे बदलतात. याचा अर्थ चष्म्याचा नंबर बदलायचा असा नाही. जगाकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदला. चेहर्यावरच जर धूळ असेल तर आरसा कीतीही पुसला, तरी प्रतिमा मळकटच दिसणार. लोक वाईट आहेत म्हणून तुम्हीही वाईटच असलं पाहिजे, असा काही नियम नाही. संतसाहित्य असा दीर्घदृष्टीचा चष्मा देतं. म्हणून श्रावणात संतसाहित्याची पारायणं होतात. वाचता येणारा वाचतो, वाचता न येणारा ऐकतो.

            विश्व रंग बदलणार्या चमत्कारिक चित्रासारखं आहे. ज्या कोनातून तुम्हाला जीवनाचं, सुंदर मांगलिक चित्र दिसेल, त्याच कोनातून जगाकडे पहा. सुंदर पाहिलं की, डोळ्यांना आल्हाद मिळतो. मनही सुंदर बनत जातं. समोरचा कसाही असला तरी त्यातलं उणं सोडून द्यायंचं, बरं तेवढंच पाहायचं. तुम्ही जे पाहता त्याचा परिणाम तुमच्या अचेतन मनावर होत असतो. नकारात्मकच पहाल, तर मन सकारात्मक कसं होईल? जीवनभर ज्याने छळलं त्या समाजाविषयी तुकोबा म्हणतात, आता उरलो उपकारापुरता। ज्यांनी आयुष्यभर बुडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याचविषयी म्हणतात, बुडतसे जन न देखवे डोळा। ही तुकोबांची जगाकडे पाहण्याची भद्र दृष्टी आहे. मन हे भ्रांतीचं कोठार आहे. ते बुध्दीचं दार अडवून उभं राहतं. माऊली मनाविषयी म्हणतात, जें भुलीचें कुहर । वायुतत्त्वाचें अंतर ।बुद्धीचें द्वार । झाकविलें जेणें ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क ९९२१८१६१८३

मनाची खिडकी पुसा, manachi-khidaki-pusa
manachi-khidaki-pusa


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या