![]() |
Start-from-yourself |
एकाला मुलांसाठी एक चांगले मासिक सुचवले. एका महिन्याने पुन्हा त्याच्या घरी जाणे झाले. त्यावेळी त्याची तक्रार, "अरे मासिकाची वर्गणी भरली, पण पोरं वाचीतच नाहीत." मी म्हणालो, "ठीक आहे मुलं वाचत नाहीत, पण तू तरी वाचलंस का?" त्यावर तो म्हणाला, "छे! छे! आपल्याकडे कुठंय इतका वेळ?" मी म्हणालो, "मूलं का वाचीत नाहीत, त्याचं उत्तर हे आहे!" दर वेळेला जेव्हा मी त्याला भेटतो, तेव्हा त्याच्या हातात मोबाईलच असतो. 'लालयेत् पञ्च वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत्। प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत् ॥' पाच वर्षांपर्यंत लाड, नंतर शिस्त आणि सोळा वर्षाच्या पुढे मुलांशी मैत्रीभाव जपावा. अशी जुनी म्हण आहे. तुमच्या-आमच्या दुर्दैवाने की सुदैवाने वयाचा हा आकडा आता फार जवळ आलेला आहे. पूर्वी सोळावं वरीस धोक्याचं मानलं जात होतं. आता प्रत्येक क्षण धोक्याचा आहे. अशा वातावरणात केवळ दूरून मार्गदर्शन करून भागणार नाही. मुलांनी जसं वागावं असं तुम्हाला वाटतं, तसं तुम्हाला वागावं लागेल. तुम्हीच जर दिवसभर रील्स पाहत असाल, तर मुलांनी मोबाईल पाहू नये, ही अपेक्षाच चूक आहे. आईला मालिकांशिवाय करमत नाही, बाप त्याच बातम्या पुन्हा पुन्हा पाहतो. मुलांनी मात्र कार्टून्स पाहू नयेत, असा विचार म्हणजे 'लोका सांगे ब्रह्मज्ञान' असंच होईल.
आईबाप जर फावल्या वेळात पुस्तक घेऊन बसतील, तर लेकरूही आपसूक पुस्तकच काढेल. सकाळी उठल्यावर आईबाप सूर्यनमस्कार, योग, प्राणायाम करीत असतील, तर लेकराला 'तू कर' असं सांगावं लाग नाही. ते त्याला काही कळायच्या आगोदर तुमचं अनुकरण करीत असतं. बाप जर सकाळी देवपूजेनंतर घरातल्या वडीलधार्यांच्या पाया पडत असेल, तर मूल आपोआप अनुकरण करणारच. ओल्या मातीवर उमटलेले ठसे चिरकाल टिकतात. फक्त ते ठसे उमटवणार्यांना त्याचं भान असलं पाहिजे. आपण वगळता सगळं जग आदर्शवादी असलं पाहिजे, असा केवळ विचार करत बसणं म्हणजे बाभळीच्या झाडाला आंबे कधी येतील, याची वाट पाहण्यासारखं आहे. स्वत:पासून सुरूवात करा. तुमचं जग म्हणजे तुमचे लेकरंच असतात नाही का? तुम्ही बदललात, की तुमचं जग आपोआप बदलेल. माऊली म्हणतात, एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क 9921816183
0 टिप्पण्या