पैशाला किती महत्व द्यायचं?

 

importance-of-money
importance-of-money

काल बोलता बोलता एक मित्र म्हणाला, "लिखाणाचे तुला किती पैसे मिळतात?" "थोडेसे" मी म्हणालो. तेव्हा 'आजि म्या ब्रम्ह पाहिले' या थाटात माझ्याकडे पाहत तो म्हणाला, "कशाला हमाली करतोस मग? सगळं जग पैशाच्या मागे धावतंय. निस्वार्थ सेवा-बिवा सगळं थोतांड आहे." यस्यार्थास्तस्य मित्राणि यस्यार्थास्तस्य बान्धवाः। यस्यार्थाः स पुमांल्लोके यस्यार्थाः स च पण्डितः॥ ज्याच्याकडे पैसा त्याचेच मित्र. गणगोतही त्याचंच. त्यालाच पंडीत मानलं जातं. हे सगळं खरं असलं, तरी एक प्रश्न उरतोच. जगाच्या इतिहासावर ज्यांनी चिरकाल सद्प्रभाव टाकला, ते लोक धनवान होते का?

ज्या साम्राज्यावर कधी सूर्य मावळत नव्हता, त्या साम्राज्याला हादरे देणारा व्यक्ती फक्त पंचा नेसायचा. ना ब्रॅंडेड कपडे ना घर. आज प्रत्येक नोटेवर त्याचा फोटो आहे. ज्याला लोकांनी गावात राहू दिलं नाही. भिक्षा घातली नाही. उपाशी दिवस काढले, त्या एकवीस वर्षाच्या योग्याला विश्व आज 'माऊली' म्हणून पूजतंय. ज्याच्या लेकरांनी उपास काढले, त्याच्याच अभंगांच आज भव्य मंदिर उभारलं गेलंय. जे महाश्रीमंत सिकंदराला जमलं नाही, ते एका भगव्या वस्त्रातल्या योग्याने करून दाखवलं.  ज्ञानाच्या जोरावर विश्वविजय. अंगावर चिंध्या आणि डोक्यावर गाडगं धारण करणार्या एका महामानवाने लाखो लोकांना आसरा दिला. विचार करा या सगळ्या लोकांनी आयुष्यात फक्त पैसाच मिळवायचं ठरवलं असतं, तर किती पैसा मिळवला असता? मग हे सगळे वेडे होते का?

पैशाचं सोंग आणता येत नाही, हे खरंच. पैशाशिवाय पानही हलत नाही हेही खरं; पण पैसा साधन आहे, साध्य नाही. हा विवेक आला की, जीवनात शांतता लाभते. काही कायम कुत्र्याप्रमाणे धावतच असतात. मिळवलेल्या पैशात अजून भर घालीत बसण्याऐवजी, मिळालेय त्याचा उपभोग घ्या. पैसा तुमच्याठी, की तुम्ही पैशासाठी, हा विचार करा. पैसा नक्की कमवावा; पण निति, मुल्ये, धर्म, न्याय, सत्य या गोष्टींना सोडून नव्हे. वाईट मार्गाने येणारा पैसा येताना चांगला वाटत असला, तरी तो पचत नाही. शेवटी पैसाच कामाला येत असता; तर पैसेवाल्यांचा शेवट झालाच नसता. जरा दोन वर्षे मागे वळून पहा म्हणजे कळेल. ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे विचार करावा. माऊली म्हणतात, आतां तूं ययावरी । निकें हें निर्धारीं । निर्धारूनि करीं । आवडे तैसें ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क  - ९९२१८१६१८३

importance-of-money
importance-of-money


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या