![]() |
lajja-param-bhushanam |
नात्यापासून सुभाषितापर्यंत जितकं आपल्या फायद्याचं आहे
तितकंच वापरायचं. हा मानवी स्वभाव आहे. 'निर्लज्जं
सदा सुखी' लाज
सोडली की सुख मिळते, हा तसाही गैरसमजच. प्राप्ते तु षोडशे वर्ष । पुत्रे
मित्रवदाचरेत् ।। या वचनाचा इतका विपरित अर्थ लावतात की, बाप पोराला सिगारेट ऑफर करतो.
टिव्हीवर भलत्या जाहिराती दाखवणारे एकपट तर त्या पाहणारे दुप्पट निर्लज्ज.
निवडणुकीत वारेमाप घोषणा करून नंतर विसरणारे तर महानिर्लज्ज. स्वभावात लाज असली, तर साज येतो. फुकटच्या गोष्टींचा
माज चढला, की लाज निघून जाते. निर्लज्ज तात्पुरता सुखी होईनही
कदाचित; पण त्याला सदैव सुख मात्र मिळू शकत नाही. पोरगा बापाला
लाजत असेल, तर त्यात काव्य आहे. प्रिय व्यक्ती गोड लाजली, की शिण हलका होतो. लाजेत वेगळा
सुगंध आहे, सौंदर्य आहे. लाजाळू बाहेर पाहण्यापेक्षा अंत:करणात
डोकावतो, उजळ होत जातो.
सलज्ज स्वभावाने विनम्रता उभी राहते. कर्तृत्ववान पुरूष
कायम सलज्ज असतो. त्याला कोणी आपली स्तुती केली, तर मेल्याहून मेल्यासारखं होतं. स्वत:च्या तोंडाने
स्वतचं कौतुक करणं म्हणजे आत्महत्याच. तुमच्या आजूबाजूला तुम्हाला थापाडे भरपूर
मिळतील. लाजाळू बाता मारत नाही. शांत राहतो. सर्वांचं ऐकून घेतो. त्यामुळे तो
सर्वांना आवडतो. माणूस कमी बोलला, तर नंतर पस्तावण्याची वेळ येत नाही. लज्जा हा मानवी
स्वभावाचा अलंकार आहे. राजा युध्दात पराजित झाल्यावर किंवा मानी पुरूषाला अवदशा
आल्यावर तो जसा लज्जित होतो, तशी माणसाची भावना असायला हवी. युध्दातून पळालेला योध्दा
छाती काढून चालत नाही. एखाद्या सौंदर्यवतीला जर कोड फुटले, तर तिला प्राणावर संकट
आल्यासारखं वाटतं. एकदा आपलं खरं कर्तृत्व काय, याची जाणीव झाली की, आपोआप आत्मप्रौढी खलास होते.
अहंकाराची जागा विनम्रता घेते. ज्या
देहाची टिमकी वाजवता, तो तुम्ही बनवलेला नसतो. त्याच्या सौंदर्याचा अभिमान गेला
की, सलज्जता
उभी राहते. मी अमूक केलं, तमूक केलं अशी शेखी मिरवणार्याला एकदा स्वत:ची असहायता
आणि अगतिकता ध्यानात आली की, तो आपोआप जागेवर येतो. दुर्दैवाने हे त्याला मरेपर्यंत हे
लक्षात येत नाही. तुमच्या नसलेल्या कर्तृत्वाचा कोडगा अभिमान धरून जगणे, ही सर्वांत लाजिरवाणी गोष्ट आहे.
माऊली म्हणतात, हें बहू असो देहपणें। नामरूपासि येणें। नाहीं गा
लाजिरवाणें। तयाहूनी।।
रमेश वाघ, नाशिक
संपर्क ९९२१८१६१८३
0 टिप्पण्या