निश्चयाचे बळ

 

vishchayache-bal,निश्चयाचे-बळ

एका मित्राला सिगारेट ओढण्याची फार सवय होती. आयुष्यात एक वेळ अशी आली की, डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं की, तुम्हाला यापुढं सुखानं जगायचं असेल, तर सिगारेट आत्ताच्या आत्ता बंद करावी लागेल. त्यांना सिगारेटचं इतकं दांडगं व्यसन होतं की, सुटणं जवळपास अशक्यच होतं. मला हिशेब सांगिताना म्हणाले, "आजपर्यंत मी अठ्ठावन्न लाखांच्या सिगारेट ओढल्या आहेत." पण जेव्हा उत्तम आरोग्यपूर्ण जीवन आणि व्यसन यात निवड करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी आरोग्याची निवड केली. मनाप्रमाणे जगायचं ठरवलं. स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर आजपर्यंत उत्तम प्रतीची आठ पुस्तके लिहिलीत.

                कुठल्यातरी बुवा बाबांकडे जाऊन तुमचे व्यसन सुटत असेल, तर तेही वाईट मानता येत नाही. पण बहूतेक वेळा पदरात निराशा पडते. कोणती गोष्ट धरायची वा सोडायची हे तुमच्या मनाच्या निश्चयावर अवलंबून असते. एकदा मनाचा निर्धार पक्का केलात की, सगळी आव्हानं छोटी वाटू लागतात. 'हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा' म्हणणार्या छत्रपती शिवरायांनी एकदा आपल्याला काय करायचंय ते पक्कं ठरवल्यावर कोणतंही जीवावरचं संकट हसत हसत झेललं. ध्येपासून चलित झाले नाहीत. म्हणूनच समर्थांनी 'निश्चयाचा महामेरू' म्हणत त्यांचा गौरव केला. निश्चय पक्का असला, की ध्येयाची वाट आपोआप उजळत जाते. 'स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे, तो मी मिळवणारच!' असं म्हणणार्या टिळकांच्या ध्येयासक्तीला मंडालेच्या काळकोठडीच्या भिंतीही अडवू शकल्या नाहीत.

                स्थान एव नरा: पूज्यंते। जो आपल्या निश्चयावर अढळ असतो त्याचीच पूजा होते. निश्चय नीट असला  की, यशाची वाट उजळत जाते. धरसोड केलीत की, यशही तुम्हाला धरून सोडून देतं. थॉमस एडीसनने हजार वेळा अपयश आलं, तरी आपला मार्ग बदलला नाही. म्हणून आज तुमच्या आमच्या घरात उजेड आहे. यशाचा मार्ग खडतर असतो. अपयशाकडे सकारात्मकतेनं पाहणं त्याहूनही कठीण असतं. पण तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आणि वज्रनिर्धार असेल, तर अडचणींचे डोंगर चक्काचूर होणारच. तुमचं आयुष्य पूर्णपणे तुमच्याच नियंत्रणात आहे असा विचार करा. ईश्वराने प्रत्येकाला इच्छाशक्ती आणि बुध्दीचं वरदान त्यासाठीच तर दिलेलं आहे.

                धृव निश्चयापासून ढळला नाही म्हणून अढळपदी विराजमान झाला. तुमच्या आणि दुसर्यांच्याही चुकांतून शिका. भूतकाळ हे प्रशिक्षण समजा. जे झालं ते झालं. त्यातून धडा घ्या. इंद्रियाणि च संयम्य बकवत पण्डितो नर:। देशकालबलं ज्ञात्वा सर्वकार्याणि साधयेत्।। बगळ्यापर्माणे संयम धारण करा. इंद्रिये ताब्यात ठेवा. सर्व कार्ये आपोआप सिध्द होतील. वाईट सवयी सुटतील, चांगल्या लागतील. सूर्य मावळला की, सूर्यकिरणांचा प्रसारही थांबतो, तसा मनावर ताबा मिळाला की, इंद्रियेही गुलाम बनतात. माऊली म्हणतात, कीं मावळलिया दिनकरु । सरे किरणांचा प्रसरु । तैसा मनोजयें प्रकारु । ज्ञानेंद्रियांचा ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क ९९२१८१६१८३

vishchayache-bal,निश्चयाचे बळ
vishchayache-bal


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या