शब्द शब्द जपावा

 

shabd-shabd-japava,शब्द शब्द जपावा
shabd-shabd-japava

 चॅनेलवरच्या चर्चा आणि पुढार्यांच्या वल्गना ऐकल्या की, काय बोलावं तेच कळत नाही. आसपासच्या समाजाचंही तेच चित्र. कारण नेत्याप्रमाणे समाज बनत जातो. महाभारताच्या शांतिपर्वात युधिष्ठीराने पितामह भीष्मांना विचारलं की, “काळ राजाचं कारण असतो की, राजा काळाचं कारण असतो?” भीष्म पितामहांनी दिलेलं उत्तर सुभाषितासारखं वापरलं जातं. कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम् । इति ते संशयो मा भूद राजा कालस्य कारणम् ।। राजा त्याच्या काळाला आकार देत असतो. म्हणून इतिहासाच्या एका काळाला आपण शिवकाळ म्हणतो, तर एकाला गांधीयुग म्हणतो. इतिहासात कोणे एकेकाळी होऊन गेलेल्या कल्याणकारी राज्याची आठवण आपण रामराज्य म्हणून आजही काढतो. कारण वाचेची शुचिता जपणारे मर्यादाशील राजकर्ते.

सत्तेची सावली समाजावर पडते. राजा वाचाळ तर प्रजा वाचाळ. काहीतरीच बोलण्यापेक्षा मौन श्रेयस्कर. वाचाळांच्या बरळण्याने त्यांचं भलं तर होतच नाही, पण ते आपल्या संगतीत राहणार्यांचा पण नाश ओढवून घेतात. बोलायला रिचार्ज लागत नाही, म्हणून काहीही बोलू नये. जे फुकट असतं त्याची किंमत देण्याची आपली कुवत नसते. म्हणून देणार्याने ते आपल्याला फ्री दिलेलं आहे. हवा फुकट आहे, पण करोना काळात कळली तिची किंमत! पाणी आणि वाणी जपूनच वापरली पाहिजे. बोलताना असं बोलावं की, मधाच्या पोळ्यातून मध टपकावा. ऐकणार्याला अंत:करणाच्या टिपकागदाने शब्द टिपावेसे वाटावेत. शब्द असा उच्चारावा की श्रोत्याच्या हृदयाची वीणा झंकारली पाहिजे. वाणी परिमित असावी.

कसं बोलावं, यासाठी ज्ञानेश्वरीचा सतरावा अध्याय उघडा. परीसाला लोखंडाचं सोनं करण्यासाठी त्याचे तुकडे करावे लागत नाहीत. एखाद्याला सुधरवण्यासाठी प्रत्येक वेळी त्याच्या काळजावर घाव घालणारे शब्दांचे बाण सोडणं आवश्यक नसतं. गवताला कोणी पाणी घालत नाही, झाडाला दिलेलं पाणी त्याच्यापर्यंत आपोआपच पोचतं. तसं आपल्या बोलण्याने सर्वांचंच हित व्हायला हवं. अमृताच्या गंगेचं स्नान घडल्यावर अमरत्व तर येतंच, पण पाप आणि ताप, दोन्हीही नाहीसे होतात. गोडी लाभते ती आगळीच. तसा वाणीचा गोडवा असावा. शब्दाला शब्दब्रम्ह मानलेलं आहे. त्याची उपासना व्हावी, उपेक्षा नको. वाचाशुध्दतेचा आग्रह असावा, तरच वाचासिध्दी प्राप्त होईल. योग्य शब्द योग्य जागी वापरणं, हे वाणीचं तप. शब्द अमृताप्रमाणे असावेत. माऊली म्हणतात, साच आणि मवाळ। मितुले आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे।।

रमेश वाघ, नाशिक

संपर्क ९९२१८१६१८३

shabd-shabd-japava
shabd-shabd-japava


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या