तेज कशाला म्हणतात?

 

tej-kashala-mhantat, तेज-कशाला-म्हणतात
tej-kashala-mhantat

काहींना देवाने कितीही भरभरून दिलेलं असू द्या, त्यांच्या तोंडावर कायम बारा वाजलेले असतात. काहींच्या घरी खायची पंचायत असते, पण चेहरा कायम हसरा असतो. काहींच्या जवळ गेलं, की रडणारा हसायला लागतो. काही हसणार्याला  रडायला लावतात. तेजस्वी व्यक्तीमत्व कायम विकासाची वाट चालतं. स्वत: सोबत इतरांनाही विकासवारीचा वारकरी बनवतं.  तेजस्वी लोकांना आपल्या शत्रूची उन्नती सहन होत नाही. आभाळात मेघ गरजले, तरी सिंहाला ते खपत नाही. तो आपल्या गुहेतून बाहेर येतो आणि डरकाळी फोडतो. आव्हानाला प्रतिआव्हान देतो. किमपेक्ष्य फलं पयोधरान्ध्वनतः प्रार्थयते मृगाधिपः । प्रकृतिः खलु सा महीयसः सहते नान्यसमुन्नतिं यया।।

लहानपणी एकदा छत्रपती शिवरायांना फर्जंद शहाजीराजे आदिलशहाच्या भेटीला घेऊन जातात. सर्वजण बादशहाला मुजरा करून खालमानेने उभे राहतात. बालशिवबा मुजरा तर करत नाहीच, पण बादहाच्या नजरेत नजर घालून पाहतो. एका कवीने या प्रसंगाचं खूप वीरश्रीयुक्त वर्णन केलेलं आहे. मी म्हणता "नाही. नाही..!" दरबारी नेले आई ! जो आत शिरोनी पाही, वर चढोनी गेली भुवई ! मुजर्याला हात न वाही, शिर लववू शकलो नाही. तेजस्विता हाच जन्मजात नरसिंहांचा स्वभाव असतो. ज्याला ईश्वराचं साम्राज्य उभा करायचंय, तो फुटकळ सत्ताधार्यांना शरण जात नसतो.

काळ्या पाण्याची शिक्षा ऐकल्यानंतर टिळकांनी काढलेले धीरोदात्त उद्‌गार पहा. ते म्हणतात, ज्यूरींनी काहीही निकाल दिला असला, तरी मी पूर्ण निर्दोष आहे, अशी माझी धारणा आहे. न्यायालयाची सत्ता श्रेष्ठ असेल, पण वस्तुजाताच्या नियतीचे नियमन करणारी सत्ता त्याहूनही श्रेष्ठ आहे. माझ्या स्वातंत्र्यापेक्षा  माझ्या हालाअपेष्टांनीच मी अंगीकृत केलेले कार्य अधिक भरभराटीस यावे, असाही परमेश्वराचा संकेत असेल मंडालेच्या बंदिवासातही त्यांनी गीतारहस्य सारखी अत्यंत मौलिक भेट मानवजातीला दिली. जिथे तुम्हाला श्वास घ्यायचीही परवानगी नाही अशा वातावरणात तुम्ही, स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ असं म्हणता, तेव्हा प्रश्न पडतो हे सामर्थ्य येतं कुठून?

भारतीय संस्कृती तेजाची उपासक आहे. गीतेत भगवंत सांगतात, जे लोक तेजस्वी असतात, त्यांच्यातलं तेज मीच आहे. तुमच्या जीवनाचं प्रत्येक अंग तेजाने तळपायला हवं. चालणं, बोलणं, वागणं, शिकणं याला एक प्रकारची झळाळी असावी. जगण्याला दिशा असावी. दिशा मिळाली, की अवदसा येत नाही. काळजात रोकडा ध्येयवाद असला की, थिल्लर गोष्टी मनाला प्रभावित करीत नाहीत. ध्येयनिष्ठ जीवनाला प्रलोभन भुलवित नाही. निषेध त्याच्या आड येत नाही, विधीची भीड पडत नाही. आपल्या ध्येयापरती महासिद्धीची आवडही त्याच्या मनात उत्पन्न होत नाही. माऊली तेजाची व्याख्या करताना म्हणतात,  ऐसें ईश्वराकडे निज । धांवे आपसया सहज । तया नांव तेज । आध्यात्मिक तें ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - 9921816183

Tej kashala mhantat
Tej-kashala-mhantat


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या