वृत्तिरूपेण संस्थिता

     नवरात्राच्या नऊ दिवसांत देवीची विविध नऊ रूपांत उपासना  केली जाते. त्या प्रत्येक रूपाच्या पूजनामागचा भाव तितकाच वेगळा आणि मंगलमय आहे. नित्यापावन स्तोत्रात मातेचं विविध अंगांनी स्मरण केलेलं आहे. ते जर जीवनात उतरलं, तर सुख शोधायला इतरत्र धावायची गरजच उरणार नाही. कल्याणी, माता, चेतना, बुध्दी. क्षुधा, शक्ति, तृष्णा, शांति, श्रद्धा, कांति, लक्ष्मी, वृत्ति, स्मृति, दया, तुष्टी या नित्यपावनस्मरण स्तोत्रातल्या प्रत्येक मंत्रातल्या रूपाकडं नीट निरखून पाहिलं, तर लक्षात येतं, हे शब्द केवळ स्तुतीसाठी नाहीत. ती यशस्वी जीवनाची जीवनसूत्रे आहेत.
vruttirupen-sansthta
vruttirupen-sansthta
            त्यातला सर्वांत जास्त भावणारा शब्द म्हणजे वृत्तिरूपेण संस्थिता. जगदंबा प्रसन्न झाली, तर तुमची वृत्ति शुध्द होते. जळकट, हलकट वृत्ति नाहीशी होते. ईश्वरपरायण वृत्ति विकसित होते. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. तितक्याच वृत्तीही. दुसर्याच्या दु:खाने हसणारी आणि सुखाने  रडणारी वृत्ती नकारात्मक वृत्ती. ती घालविण्यासाठी नवरात्रात विविध व्रते केली जातात. व्रताने वृत्ती विकसित होते. तुमची वृत्ति कशीही असली, तरी तिच्या केंद्रस्थानी भगवंत असेल, तर ती जगाला हितकारक होते. त्यामुळे देवीला केंद्रस्थानी ठेऊन गरबा, रास, दांडीया खेळण्याची परंपरा निर्माण झाली. स्वार्थकेंद्रित जगणं ईशकेंद्रित झालं, तर त्यात जगाचंही भलं आहे, आणि व्यक्तीचंही. 'मेरी मर्जी' म्हणत  मनाप्रमाणे वागणार्यांची 'बुर्जी' व्हायला वेळ लागत नाही.

            जीवनात काही बंधनं पाळली, तर जीवनविकास होतो. नदीनं तटाचं बंधन झुगारलं, तर विध्वंसकारी होते. वृक्षाने मुळांच बंधन त्यागायचं म्हटलं, तर त्याचं उन्मळून पडणं निश्चित ठरलेलं आहे. मानवी जीवन सतारीप्रमाणे आहे. सतारीने जर खुंटीचं बंधन पाळलं नाही, तर तीमधून सुमधूर सूर बाहेर पडणार नाहीत. जीवनात बंधनं पाळायचीच नाहीत, म्हटलं  तर आयुष्याचा नाश ठरलेलाच. नवरात्रात उपवास करण्यामागचं कारणही हेच. व्रत म्हणजे आपणच आपल्यावर लादलेली बंधनं. ती स्वयंस्फूर्त असल्याने विकास करणारी असतात.  मर्यादेत राहणारा मर्यादा पुरूषोत्तम म्हणून पूजला जातो. मर्यादा तोडणार्याचा त्याच्या कुलासहित नाश होतो. मग तो दशग्रंथी, वेदांना स्वर देणारा रावण असो, की विष्णूयागारखे महायज्ञ करणारा दुर्योधन. नुसत्या देखाव्याने वृत्तिविकास होत नसतो. मनाच्या विकासासाठी मनोवृत्तीमध्ये जगन्मातेचा वास आवश्यक. मानवी मनच व्यक्तीच्या विविध दशेला कारणीभूत होते. माऊली म्हणतात, वायां मन हें नांव । एऱ्हवीं कल्पनाचि सावेव । जयाचेनि संगें जीव- । दशा वस्तु ॥

Vruttirupen sansthita
Vruttirupen sansthita 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या