मानवतेचा गौरव: मनुष्यगौरव दिन

 

 आज मानवी जीवन अत्यंत गतिमान झालेलं आहे. एक प्रचंड मोठा चंगळवादी, भौतिकवादी प्रवाह निर्माण झालेला आहे. प्रत्येकाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पैसा मिळवायचा आहे. मार्ग कुठलाही असला तरी चालेल. Buy, Borrow or Steal.  प्रत्येकजण सुखाच्या पाठीमागे देहभान विसरून कुत्र्यासारखा धावतो आहे. कुत्रा कायम धावत असतो, पण कधी श्रीमंत झाल्याचे तुम्ही बघितलेत का? मा धाव मा धाव विनैव दैव | नो धावन साधनमस्ति लक्ष्म्याः । चेद्धावन साधनमस्ति | लक्ष्म्याः श्वा धावमानोऽपि लभेत लक्ष्मीम् ॥ धावल्याने श्रीमंती येईल हा गैरसमज आहे, हे कळत असूनही प्रत्येक जण धावतोच आहे. जेव्हा सगळी गात्र थकून जातात, तेव्हा लक्षात येतं, की आपली धावाधाव व्यर्थ होती. 

मनुष्यगौरव-दिन,manusyagaurav-din
मनुष्यगौरव-दिन

 माणसाला ‘माणसासारखं वाग’, असं म्हणावं लागतं. कुत्र्याला कुत्र्यासारखं वाग असं सांगावं लागत नाही. माणसातलं मानव्य जीर्ण झालेलं आहे. हे लक्षात आलेला पहिला महापुरुष म्हणजे पांडुरंगशास्त्री आठवले. ‘सर्व समस्यांच्या केंद्रस्थानी व्यक्ती आहे. म्हणून व्यक्तीला उभं करावं लागेल. समस्येचे समाधान शोधण्याऐवजी ज्याने समस्या उभी केली, त्या व्यक्तीला उभं करावं लागेल’ या दृष्टिकोनातून सर्वप्रथम पांडुरंगशास्त्री आठवले  यांनी कार्याला सुरुवात केली.

 जगामध्ये प्राण्यांवर, भौतिक साधनांवर, विज्ञानावर प्रयोग झालेले आहेत. होत आहेत, होत राहतील; परंतु माणसांवर प्रयोग करणारा आणि पतीत झालेल्या मानव्याला उभा करणारा पहिला महापुरुष म्हणजे पांडुरंगशास्त्री आठवले. त्यांनी मनुष्याला मनुष्याच्या मनुष्यत्वाची जाणीव करून दिली. त्याच्यामध्ये अस्मिता उभी करून एक नवा गौरव उभा केला. त्यांचा जन्मदिन म्हणजे मनुष्यगौरव दिन.

 आज प्रत्येकाला पैसा, पद असेल तरच समाजामध्ये मान मिळतो.  खिशात पैसा नसेल तर मित्रही ओळख नाकारतात. पण जर तो एखाद्या पदावर गेला, तर मात्र त्याच्या मागे-मागे धावतात. पदाव्यतिरिक्तही व्यक्तीची काही किंमत आहे, ही गोष्ट समाजाच्या गावीही नसते. मानवातली मानवता जीर्ण होत आहे. पदाशिवायही व्यक्ती म्हणून व्यक्तीची काही किंमत आहे, हे ठासून सांगणारा पहिला कर्ता विचारवंत, म्हणजे पांडुरंगशास्त्री आठवले. त्यांना स्वाध्याय परिवार त्यांना प्रेमादराने दादाजी असे संबोधतो.

 एखादं नवीन घर बांधणं सोपं असतं, परंतु मोडकळीस आलेल्या घराचा पुन्हा जीर्णोद्धार करणं कठीण असतं. हे अशक्यप्राय काम दादाजींनी स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून करून दाखविले. मानव्याचा जीर्णोद्धार करताना दादांनी सर्वप्रथम हा विचार केला, की मानवाची उन्नती कोणत्या गोष्टींमुळे होते? या गोष्टीचा विचार करताना आपल्या लक्षात येतं, की धर्म, संस्कृती आणि भक्ती या गोष्टी जितक्या उच्चस्तरावर असतील, तितक्या उच्च स्तरावर मानवता असते. जेव्हा धर्म, संस्कृती आणि भक्तीमध्ये अविचाराची जळमटं घुसतात, त्यावेळेला मानवता जीर्णशीर्ण होऊ लागते. 

 मंदिर कशासाठी? समाजातल्या शेवटच्या घटकाचं उत्थान करण्यासाठी. हे पहिल्यांदा प्रयोगाने सिद्ध करणारे दादाजी आहेत. त्यासाठी त्यांनी अमृतालयम् सारखा  प्रयोग उभा केला. झाड लावूनही भक्ती करता येते. ‘सर्वस्यचाहं हृदिसन्निविष्टो’ म्हणजे सर्वांच्या हृदयात भगवंत आहे. तो जसा व्यक्तीमध्ये आहे तसा चराचरातही आहे. हे फक्त म्हणण्यापुरतं नाही, तर माधववृंद प्रयोगाच्या माध्यमातून ‘वृक्षात वासुदेव’ पाहण्याची दृष्टी देणारे दादाजी हे विरळे तत्वज्ञ आहेत. शेतामध्ये काम करणं, मासे मारणं, ड्युटी करणं हे देखील भक्ती होऊ शकतं. हा भक्तीचा नवाच व्यवहारिक दृष्टिकोन त्यांनी मानवाला दिला. 

ज्यांच्या सात पिढ्यांमध्ये कधी कोणाला संस्कृत येत नाही, असे सागरी, वाघरी, आगरी लोक आज वेदमंत्रांचा उद्घोष करतायेत. नारायणोपनिषदाचे पारायण करताहेत. रोज सकाळ-संध्याकाळ त्यांच्या घरामध्ये वेदमंत्रांचा उद्घोष होतो आहे. त्रिकालसंध्येच्या माध्यमातून दिवसातून तीन वेळा श्रीमद्भगवद्गीतेंचे आणि उपनिषदांचे दहा श्लोक त्यांच्या मुखातून म्हटले जातात. आंधळीपांगळी झालेली भक्ती ही फक्त डोळस आणि गतिमान बनवण्याचं काम दादाजींनी केलं.

 एकादशीव्रत, तीर्थयात्रा या गोष्टींमध्ये घुसलेली कर्मकांडी वृत्ती नष्ट करून त्याला समाजाभिमुख करण्याचं काम दादांनी केलं. एकादशी फक्त खाण्यापुरती नाही, तर एकादश इंद्रियांच्या माध्यमातून भगवंताला अपेक्षित कृती करणे म्हणजे एकादशी ही समज उभी केली. भक्ती म्हणजे अगरबत्ती लावून स्वतः पुरती पूजा करणे, हा दृष्टिकोन न ठेवता, भक्तीतून सामाजिक बदल घडू शकतो. भक्ती ही समाजाच्या उद्धाराचे शक्तिशाली साधन बनू शकते, हे त्यांनी सप्रमाण सिध्द केले. दादा म्हणायचे “bhakti is a social force.”

देव कुठेतरी आभाळात, दूर मंदिरात बसलेला आहे. असं जोपर्यंत तुम्ही म्हणाल तोपर्यंत तुम्ही स्वतःला दुबळंच समजाल. जेव्हा देव माझ्यासोबत माझ्या सुख दुःखामध्ये आहे, ही भावना निर्माण होते, तेव्हा व्यक्तीची अस्मिता जागृत होते. एखाद्या ठिकाणी तुमचा  कोणी ओळखीचा साहेब असेल, तर तुमची कॉलर टाइट होते. साहेबाच्या ओळखीची इतकी मस्ती असेल, तर ज्याची  देवाशी ओळख आहे, तो किती मस्तीत जगेल? स्वतःच्या दिव्यत्वाची माणसाला ओळख करून देण्याचं काम स्वाध्यायाने केलेलं आहे. त्यातून मनुष्यामध्ये गौरव उभा राहिलाय.

 युवा केंद्र, स्वाध्याय केंद्र, युवती केंद्र, बालसंस्कार केंद्र अशा  प्रकारच्या केंद्रांच्या माध्यमातून जीर्ण मानवी मूल्यांचं संवर्धन करण्याचं काम चालू आहे. भावफेरीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले विचार फक्त स्वतःपुरते न ठेवता सर्व समाजापर्यंत घेऊन जात आहेत. माझा गौरव तसा इतरांचाही गौरव व्हायला पाहिजे, हा विचार किती उदात्त आहे!  आत्मसन्मान तसा परसन्मान महत्वाचा. तुझा, माझा त्याचा गौरव म्हणजे मनुष्यगौरव हा एक नवाच विचार या माध्यमातून त्यांनी पुढे मांडला. 

या सगळ्या कार्याचं अधिष्ठान म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. श्रीमद्भगवद्गीतेच्या पायावरच जगाचं पुनरुत्थान होऊ शकेल. गीता मानवधर्माचा आधार होऊ शकते, हा त्यांचा ठाम विश्वास होता. तो विश्वास त्यांनी कृतीत उतरवला. त्याचा परिणाम म्हणून आज वनवासींपासून तर सागरी, आगरी वाघरीपर्यंत प्रत्येक जण स्वतःचा धंदा कसाही असला तरी गौरवाने भक्ती करू लागला आहे. विष्णुसहस्रनाम, रामरक्षा प्रत्येकाच्या ओठावर नाचते आहे. मी हलका नाही, मी पतीत नाही. माझा जन्म कुठेही, कुठल्याही जातीत, समाजात, प्रदेशात झाला असला, तरी माझं कर्म ही माझी योग्यता ठरवते. अशा प्रकारचे दिव्य कर्म करण्याची प्रेरणा दादांनी लोकांना दिलेली आहे

रमेश वाघ, नासिक
संपर्क - ९९२१८१६१८३
maharashtrache-vichardurg
maharashtrache-vichardurg
आमचा हा ग्रंथ घरपोच मागविण्यासाठी त्वरित संपर्क करा. ९९२१८१६१८३

आमच्या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी येथे क्लिक करा. 

 आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.

h




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या