धनत्रयोदशीचा अर्थ

 

एकवेळ सुईच्या टोकातून उंट जाऊ शकेल; पण धनवंताला मोक्ष मिळणार नाही; असं जगातला एक धर्म म्हणतो. जोडोनिया धन। उत्तम व्यवहारे। उदास विचारे। वेच करी।। हा तुकोबारायंचा शास्त्रीय दृष्टीकोन. मार्क्सपेक्षाही उच्च दर्जाचा दैवी समाजवाद उपनिषदांनी मांडलेला आहे. ईशा वास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्‌। तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्‌ ॥ सर्व काही ईश्वराचं आहे. गिधाडासारखं ओरबाडू नका, आनंद घ्या. ह्याचा विसर पडला, की शोषण करणारी व्यवस्था जन्माला येते. त्याविरोधात क्रांतीचे नगारे बडवले जातात. क्रांती करून जे सत्तेवर येतात, तेच पुन्हा शोषण करायला लागतात. रशिया, चीन ही ठळक उदाहरणं. आपल्या देशी राजकारणातही असे अनेक नमुने आढळतील.

धनत्रयोदशीचा अर्थ
            अश्वपूर्वांरथमध्यांहस्तिनादप्रबोधिनीम् । श्रियंदेवीमुपह्रयेश्रीर्मादेवीजुषताम्।। जी वाजत-गाजत सर्वांसमक्ष दिवसाउजेडी रथात बसून तुमच्या घरी येते, तीच लक्ष्मी असते. चोरून लपून, बांध कोरून, टेबलाखालून येणारी अलक्ष्मी असते. अलक्ष्मी अवदसा घेऊन येते. अशी अवदसा ज्याच्या घरात असते, त्याची इमारत भले सुंदर असेल, पण त्या घराच्या घरपणाचा पाया ढिसाळ असतो. फक्त वित्ताला आमच्या ऋषीसंतांनी धन मानलेलं नाही. बर्याच लोकांकडे धन असतं, पण ते स्वत:ही त्याचा उपभोग घेत नाहीत; दुसर्यालाही घेऊ देत नाहीत. साठलेल्या पाण्याला जशी दुर्गंधी येते, तशी जे गरजवंताच्या  उपयोगाला येत नाही, त्या धनाला दुर्गंधी येते.

            जी सुख देते ती लक्ष्मी. सुख फक्त पैशाने मिळत नाही. पैसा त्याचा एक भाग आहे. अर्थागमो नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च। वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या षट् जीवलोकस्य सुखानि राजन्।। पोटाला पोटभर मिळावं, आरोग्य उत्तम असावं, पती पत्नींमध्ये प्रेम असावं, लेकरं आज्ञाधारक असावीत आणि जीवनाला अर्थ प्राप्त होईल असं ज्ञान असावं, त्याला लक्ष्मी म्हणतात. असा जो कोणी भाग्यवान त्याला 'श्री'मान म्हणतात. लोक परंपरा म्हणून नावापुढे 'श्री' लिहितात, पण वास्तविक 'श्री' सोबत संबंध येतो की नाही देवच  जाणे! सरस्वती आणि लक्ष्मी एकच. आम्हाघरी धन शब्दांचीच रत्ने. ज्ञान हेच धन! ज्ञानासोबत धनाची उपासना हीच धनत्रयोदशी. अंत:करणात विवेकाचा सूर्य उगवला, की ज्ञानाचं साम्राज्य प्राप्त होतं. अशा कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राटाला रोजच धनत्रयोदशी. माऊली म्हणतात, सुर्ये आधिष्ठीली प्राची। जगा राणीव दे प्रकाशाची।। तैसी श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।। 

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

dhantrayodashicha-arth


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या