कशाला विद्रोहाची भाषा?

आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी अवघ्या सृष्टीशी द्रोह करायला लोक तयार होतात . कोणी कळ सोसायलाच तयार नाही. एकेका राजकीय पक्षाची होऊ नयेत तितकी शकले होतात. विद्रोह कोणाशी, का, त्याला तात्विक अधिष्ठान काय, याचा विचारच कोणी करायला तयार नाही. मुलगा बापाचं ऐकायला तयार नाही. विद्यार्थी शिक्षकांचं ऐकत नाहीत. कार्यकर्ता नेत्याचं मनावर घेत नाही. त्यामुळं कागदावर कितीही गोड योजना असली, तरी ती जमिनीवर उतरत नाही. उतरली तरी तिचा अपेक्षित हेतू साध्य होत नाही. पती पत्नीतही व्यक्तीस्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली बंडाळी माजलेली असते. त्यामुळे त्यांच्या संसारिक सुखाची राखरांगोळी होते. क्षुल्लक गोष्टींवरून घटस्फोट होतात. नको त्या कारणावरून आत्महत्या, हत्या, मारामार्या घडतात. स्वत:पलीकडे जग नाहीच, या अविर्भावात प्रत्येकजण वागतो आहे. स्वार्थाला अडसर आला, की अवघ्या विश्वाला अंगावर घेण्याची भाषा केली जाते. स्वत:च्या अंतकरणात डोकावून आत्मपरिक्षण करण्याची हिंमत कोणी दाखवित नाही.
kashala-vidrohachi-bhasha
kashala-vidrohachi-bhasha


            विद्रोह हा शब्द फॅशन म्हणून वापरला जातो. राजकीय विद्रोहाची भाषा बोलताना गाडी इतकी घसरते की सुखदां, वरदां मातृभूमीच्या विरोधात गरळ ओकलं जातं. राजकीय विरोध करता करता सत्य सनातन धर्माच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या मुखातून अमृताचं सिंचन करायचं, त्या मुखातून विषाचे फवारे बाहेर पडतात. ज्या चित्ताने मंगलाचं चिंतन करायच, ते अमंगलाचं आराधन करायला लागतं. जे पेरता तेच उगवतं. चित्तातलं अमंगळ तुमच्या वर्तनात यायला लागतं. काही तर दिवसरात्र व्हाटस्अपवर दुसर्या धर्मांच्या नावानं बोटं मोडीत असतात. दुसर्यांना नावं ठेवण्याऐवजी तुमच्याकडे काय उत्तम, श्रेष्ठ आहे ते कधीच सांगत नाहीत. अभ्यासच नाही तर काय सांगतील ? परिणामी त्यांना कुत्रंही विचारत नाही. नकारात्मकतेची पेरणी करणारा कायम एकटाच पडत असतो, हा सनातन नियम आहे.

गंगेचा अमृतप्रवाह तीरावरच्या झुडपासंकट महावृक्षांचंही पोषण करतो. औषधी वनस्पती असो, की विषवृक्ष प्रत्येकाची तृष्णा ते गंगाजल हरण करतं. तीरावर गाय येवो, की हिंस्त्र पशू प्रत्येकाची तहान कोणताही भेदभाव न करता गंगा भागवते. ज्या ज्या ठिकाणी त्या शीतल जलाचा स्पर्श होतो, तिथला ताप नाहीसा होतो. पाप फिटून जातं. अपवित्रांना पवित्र करीतच हा पुण्यप्रवाह सागराला जाऊन मिळतो. सूर्य विश्व प्रदक्षिणेला निघाला म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यांवरचा अंधकार दूर करतो. सर्वांना कल्याणाचा दरवाजा दाखवतो. दिवसरात्र आपल्या स्वार्थाचा विचार न करता इतरांच्या हिताचा विचार करावा. जे संकटात अडकलेले असतील त्यांच्या बंधविमोचनाचा विचार करावा. कोणाचंतरी अहित करून आपलं हित करावं असा विचार चुकूनही मनात न येणं, याला अद्रोहत्व म्हणतात. माऊली म्हणतात, वांचूनि आपुलिया काजालागीं । प्राणिजाताच्या अहितभागीं । संकल्पाचीही आडवंगी । न करणें जें ॥

रमेश वाघ, नासिक

संपरक - ९९२१८१६१८३

कशाला विद्रोहाची भाषा? kashala-vidrohachi-bhasha
kashala-vidrohachi-bhasha




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या