प्रौढ संस्कार वर्गाची गरज

  सध्या निरक्षरांना साक्षर करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यावर आमचे पंढरपूरस्थित मित्र श्री संतोष चौंडावार सहज बोलून गेले, "आज समाजाला प्रौढ साक्षरता नाही; प्रौढ संस्कार वर्गांची आवश्यकता आहे." त्यांच्या या वाक्याचं हसू आलं खरं, पण जरा विचार केल्यावर त्यांच्या वाक्यातली वास्तविकता ध्यानात आली. आजकाल सुशिक्षित होणं याचा अर्थ संस्कार सोडणं असाच घेतला जातो. नुसत्या पुस्तकी शिक्षणाने समाजात नवनवीन अंधश्रध्दा समाजात जन्माला येत आहेत. उदाहरणार्थ जो धर्म आणि संस्कृतीवर जास्तीत जास्त टीका करील, तो अधिक सुशिक्षित आणि  शहाणा समजला जातो. विचित्र कपडे घालणारे लोक मॉडर्न असतात. जास्त किंमतीच्या वस्तू चांगल्याच असतात. इंपोर्टेड वस्तू चांगल्याच असतात वगैरे वगैरे.
प्रौढ संस्कार वर्गाची गरज
प्रौढ संस्कार वर्गाची गरज
            तुम्हाला अडाणी व्यक्ती सिग्नल तोडताना कधीच दिसणार नाही. कॉलेजमध्ये जाऊन नागरिकशास्त्र शिकलेले लोक सिग्नल तोडतात. व्यक्ती शिकला, की आपण खूप हुशार आहोत, असं त्याला वाटायला लागतं. अत्यंत उच्चविद्याविभूषित जोडप्यांची खूप शिकलेली लेकरं बिघडलेली आपण पाहतो. आजकाल ऑनलाईन फ्रॉड करून लोकांचे पैसे गायब करणारी जमात गरीबाघरची नाही. त्यांना सगळे नियम माहित आहेत; पण ते पाळण्याचे संस्कार झालेले नाहीत. संस्काराने ज्ञान स्वभावात उतरतं. दैनंदिन जीवनाचा भाग बनतं. न शिकलेला म्हणतो, एकवेळ उपाशी मेलो तरी चालेल; पण कष्टाचंच खाईल. शिकलेला म्हणतो, वाटेल ते पाप करीन; पण बसूनच खाईल!
दुसर्याचा विचार न करता स्वत: खाणं म्हणजे पाप, असं श्रीमद्भगवद्गीता म्हणते. भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्। याउलट काही फुकट मिळत असेल, तर ते जमेल तितकं ओरबाडावं, असा समाजाचा अलिखित नियम आहे. त्यामुळे प्रत्येकजण स्वत:च्या स्वार्थाचाच विचार करतो आहे. मुलं लहानपणापासून हेच पाहतात. त्यातून दुसर्यांचा विचार करायचाच नसतो, हाच संस्कार त्याच्या मनावर पक्का होत जातो. नवीन पिढी बिघडली म्हणणार्यांनी आपण किती ध्यानावर आहोत, याचाही विचार करावा. दिलं जातं ते शिक्षण आणि उचलले जातात, ते संस्कार. असा संस्कारवर्ग सरकार चालवित नसतं. तसं असतं तर गीता ज्ञानेश्वरीसारखे जीवनग्रंथ अभ्यासक्रमात आले असते. त्यासाठी तुम्हालाच तुमचं वर्तन बदलावं लागेल. नेतृत्व करणार्यांचं वागणं विशेष असावं. माऊली म्हणतात, एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
प्रौढ संस्कार वर्गाची गरज
प्रौढ संस्कार वर्गाची गरज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या