विजयादशमीला गल्लीतल्या चिमुकल्या लेकरांची फौज घरात आली. ‘हॅपी दसरा काका’ म्हणून एकच कल्ला केला. मी म्हणालो, “अरे बाबा आपण मराठी आहोत. मराठीत शुभेच्छा द्या.” तेवढ्यात एक चिमुरडी म्हणाली, “काका इट्स सोs लॉंग टू से.” त्यांना शिवरायांचा फोटो दाखवत म्हणालो, “हे कसा दसरा साजरा करायचे माहित आहे का? सर्वजण एकमेकांना उराउरी भेटायचे. मोठ्यांचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घ्यायचे. दसर्याला सीमोल्लंघन करून मुलूखगिरीवर निघताना जय भवानी, हर-हर महादेव अशा घोषणा दिल्या जायच्या.” वायुवेगाने वानरसेना बाहेर पडली. लेकरांनी सोनं वाटताना ‘हॅपी दसरा’ अशा कोरड्या परभाषी शुभेच्छा न देता, घरोघरी जाऊन जय भवानी, हरहर महादेव, जय श्रीराम, अशा अभिवादनांनी शुभेच्छा दिल्यात.
तुमची भाषा मेली, की तुमचा इतिहास संपला. तुमचा इतिहास संपला, की तुमची संस्कृती लयाला जाणार. तुमची संस्कृती संपली, की तुम्हाला दुसर्याच्या तालावर नाचायला आनंद वाटणार. अशाच लोकांना भारतीय समृध्द परंपरांवर शेण फेकण्यात गौरव वाटतो. हे जाणणारा पहिला राजा या भूतलावर जन्माला आला, छत्रपती शिवाजी महाराज! जी भाषा जगाच्या लेखी मेली होती, सत्तेच्या परिघाबाहेर होती, त्या संस्कृत भाषेत महाराजांनी आपली राजमुद्रा बनवली. दैनंदिन व्यवहारातले परभाषिक शब्द हटवून, त्या जागी अस्सल मराठी आणि भारतीय परंपरेचा गंध असलेल्या शब्दांची योजना केली. शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप। शिवरायांचा आठवावा साक्षेप।भूमंडळी।। असं समर्थ म्हणतात, तेव्हा ते फक्त भाषणात वापरण्यापुरतं नसतं. ते जीवनातही वापरायला हवं. इंग्रजी माध्यमात मुलं शिकवण्यात गैर नाही, पण तुमचं लेकरू तुम्हाला जेव्हा, ‘हॅपी शिवजयंती’ म्हणेल, तेव्हा ‘श्रीं’च्या राज्यासाठी आभाळसंकटं झेलणार्या माझ्या राजाला काय वाटेल! याचा जरूर विचार करा.
स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा, स्वसंस्कृती याचा ज्याला जाज्वल्य आभिमान असतो, तोच दुसर्या भाषा,धर्म, संस्कृतीचा सन्मान करू शकतो. अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम् । उदारचरितानां तु वसुधैवकुटुम्बकम् ॥ विश्व हेच माझं घर आहे, ही सिंहगर्जना करण्याचं सामर्थ्य स्वत:च्या स्वत्वाच्या जाणिवेतून निर्माण होतं. माऊलींनी वैश्विक तत्वज्ञान लोकभाषेत मांडलं म्हणून हेटाळणारे खूप होते. माऊलींना स्वभाषेविषयी नुसता अभिमान नव्हता, तर गौरव होता. म्हणून माऊली म्हणतात, माझा मराठाचि बोलु कौतुकें। परि अमृतातेंही पैजां जिंके। ऐसीं अक्षरें रसिकें। मेळवीन।।|
रमेश वाघ, नाशिक.
संपर्क- ९९२१८१६१८३
0 टिप्पण्या