अत:करणाच्या अयोध्येत विवेकरूपी
रामाचं आगमन होणं म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे तेजाचा उत्सव. जे तेजस्वी असतात,
तेच हा तेजाचा उत्सव तेजस्वितेने साजरा करू शकतात. मनाचे सगळे अंधारे कोपरे उजळले,
म्हणजे जीवनात प्रसन्नतेचा उजेड पडतो. प्रसन्नतेची प्रभा अवघा आसमंत उजळवून टाकते.
तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे दीपोत्सव. म्हणून हा उत्सव भारतीय
संस्कृती पाच दिवस साजरा करते.
धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज. यातला
प्रत्येक उत्सव जीवनात आनंदाची उधळण करणारा. या सणांमागचा भाव समजावून घेतला, तर
प्राचीन भारतीय ऋषींच्या दूरदृष्टीचा अभिमान वाटतो.
tamaso-ma-jyotirgamay |
'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी।।' हा धनामागचा आमचा दृष्टिकोन. धन कमवा; पण नीतीने. त्याचा विनियोग करताना त्याचा मालक म्हणून नव्हे, तर विश्वस्त बनून करा. जे स्वार्थासाठी वापरलं जातं ते वित्त. परपीडनासाठी वापरली जाते ती अलक्ष्मी. जी परार्थासाठी वापरली जाते, ती लक्ष्मी. जी ईश्वरी कार्यासाठी वापरली जाते, ती महालक्ष्मी. धनतेरस साजरी करण्यामागचा सनातन संस्कृतीचा विचार हा असा इतका उदात्त आणि दैवी आहे. लक्ष्मीला आम्ही चंचल मानत नाही; पण लक्ष्मी ज्याला पचविता येत नाही, तो चंचल बनतो. तो नाती-गोती, स्थिती-गती सर्वकाही विसरतो. अशा व्यक्तीला समर्थ मूर्ख म्हणतात. 'लक्ष्मी आलियावरी । जो मागील वोळखी न धरी । देवीं ब्राह्मणीं सत्ता करी । तो येक मूर्ख ॥'
शुभ कार्याला इष्टानिष्ट असं काहीही नसतं. अमावस्येला लोक अशुभ मानतात. पण दिवाळीसारखा सण जर अमावस्येला साजरा केला जात असेल, तो दिवस अशुभ कसा? हा प्रश्न कोणाच्याही मनात येत नाही. अज्ञानातून अशुभाचा जन्म होतो. विवेकाचा दिवा प्रजव्लित केला; तर अविवेकाची काजळी झडून जाते. सणांमागची तर्कशुध्द जीवनदृष्टी समजून घेतली; तर दिवाळी एक दिवस नव्हे रोजच साजरी केल्यासारखं होईल. माऊली म्हणतात, 'मी अविवेकाची काजळी । फेडूनी विवेकदीप उजळीं । तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥'
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
0 टिप्पण्या