लोकांचा बुद्धिभेद करू नका

      "साहेब मला सुट्टी हवी आहे" "कशासाठी?"  "आमच्या घरी लग्न आहे" "कोणाचं?" "तुळशीचं!" असा विनोद सध्या सोशल मीडियातून फिरवला जातो आहे. जगातल्या सर्वांत सुंदर भावनेचा इतका हिडीस विपर्यास फक्त निर्बुद्ध लोकच करू शकतात. भारतीय सणसमारंभांना निश्चितच शास्त्रीय बैठक आहे. ते समजून घेण्याची आमची कुवत  नाही, ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. कडू औषध गोड आवरणातून दिलं जातं. विज्ञान लोकांना समजत नाही. त्याची भावनेशी गाठ बांधली, की न सांगताही अंमलबजावणी होते. म्हणून पुराणातल्या रंजक अख्यानांपासून ते विविध सण उत्सवांची योजना आमच्या ऋषींनी अत्यंत योजकतेने केली आहे.

लोकांचा बुद्धिभेद करू नका
      लोकांचा बुद्धिभेद करू नका

          शहरी जीवनाचा उबग आला, की  फ्रेश होण्यासाठी लोक निसर्गात जातात. सुंदर निसर्गाचा उकिरडा बनवून टाकतात. वनवासी माणूस गरीब असेल; पण  निसर्ग जपतो. निसर्गाशी त्याचा भावबंध जुळलेला आहे. नागपंचमीला नागाची पूजा करणारी सासुरवाशीण नागाला भाऊ मानते. वडाला फेऱ्या मारणारी गृहलक्ष्मी वडाला आपल्या भावजीवनाचा घटक मानते. आपल्या जीर्ण देहाने गंगेत डुबकी मारणारा भाविक आईच्या कुशीत शिरण्याचा भावनेने बुडी मारतो. बैलपोळ्याचा सण आमचा शेतकरी बैलाची पूजा करून साजरा करतो. काळया वावरात नैवेद्य ठेवतो, नारळ फोडतो. पहिलं कणीस देवळात ठेवतो.

          प्रकृतीबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेतून भारतीय समजपुरूष  वर्षानुवर्षे हे करतो आहे. जगातल्या सगळ्या पापाला प्रायश्चित्त आहे; पण कृतघ्नतेला नाही. निसर्गाच्या जीवावर जगतोय म्हणून त्याविषयीची कृतज्ञता जपणारी आपली सनातन संस्कृती आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात लोकांकडे माहिती भरपूर आहे; पण अक्कल नाही. त्यामुळे माणसंही कृत्रिम झालीत. तुम्ही चारचाकी गाडीत फिरायला लागलात, हातात महागडा फोन, खिशात चार पैसे जास्त झाले म्हणून ज्ञानोबा-तुकोबांपेक्षा जास्त बुद्धिमान होत नाहीत. फळ, फुल, सावली काहीच देत नसली, तरी तुळस आमच्यासाठी पूजनीय आहे. कोणत्याही कामात येत नसला, तरी गंडकी नदीतला शाळिग्राम दगड आमच्यासाठी विष्णू आहे. यामागचा पर्यावरणीय भाव आणि विज्ञान जाणून घेणार की नाही? फक्त निर्बुद्ध  टीका नको. समाजाचा अर्थहीनपणे बुद्धिभेद करणे पाप आहे. न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां।  स्वतःला शहाणे म्हणवणाऱ्या धुरिणांनी समाजाला आचारातून मार्ग दाखवावा. ज्ञानाची दिवटी हातात धरून अज्ञान्यांची वाट उजळावी. माऊली म्हणतात, मार्गीं अंधासरिसा । पुढें देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनी ॥ 

रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
lokancha-buddhibhed-karu-naka
lokancha-buddhibhed-karu-naka



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या