मान सोडा सन्मान मिळेल

 

         तुम्ही एखाद्याला सहज प्रेमाने भेटायला जावं, आणि त्याने आपल्या नसलेल्या कर्तृत्वाचा पाढा तुमच्यासमोर वाचायला सुरू करावी, असा प्रसंग तुमच्या आयुष्यात नक्कीच आला असणार. मी अमूक केलं, तमूक केलं, माझ्यामुळं यॉंव झालं, त्यॉंव झालं अशा फुकाच्या फुशारक्या इतक्या मारतात, की शेवटी तुम्ही कंटाळून निघून येता. समाजात दुसर्याच्या गुणांच कौतुक करणारं कोणीच नसतं. दुसर्याचं कौतुक करण्यासाठी आभाळाएवढं काळीज असावं लागतं. आत्मप्रौढी मारणारे पदोपदी भेटतात. आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति ।सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥ हृदय खुजं असलं,  की जगात आपल्यापेक्षा मोठा कोणी दिसतच नाही.

मान सोडा सन्मान मिळेल
मान सोडा सन्मान मिळेल

         महाभारताच्या कर्णपर्वात खूप उद्बोधक प्रसंग आहे. 'माझ्या गांडीव धुनष्याची जो निंदा करील, त्याचा मी जीव घेईन' अशी अर्जुनाची प्रतिज्ञा असते. कर्णाकडून पराभूत झाल्यावर धर्मराज अर्जुनाच्या गांडीव धनुष्याची निंदा करतात. अर्जुन तलावर घेऊन धर्मराजाला मारायला धावतो. 'अर्जुनाने धर्मराजाला शस्त्राने न मारता त्याचा अपमान करावा. सन्माननीय व्यक्तीसाठी अपमान हा मृत्यूच असतो.' असा मध्यममार्ग श्रीकृष्ण सुचवितात. पुन्हा पंचाईत होते. 'जो धर्मराजाविषयी अपशब्द काढेल, त्याला मी मृत्युदंड देईल' अशी अर्जुनाची दुसरी प्रतिज्ञा असते. अर्जुन खड्ग उपसून स्वत:चंच शीर कापण्यासाठी सरसावतो. तेव्हा श्रीकृष्णच म्हणतात, 'स्वत:च्या तोंडाने स्वत:ची स्तुती केली, तर तो तुमचा मृत्यूच असतो. स्वत:ची स्तुती कर.' अर्जुनही वाचला आणि त्याची प्रतिज्ञाही.

         श्रीमद्भभगवद्गीता अमानित्व हा दैवी गुण मानते.  स्वत:ची थोरवी गाणारे बावळट आणि अज्ञानी असतात. ज्ञानी व्यक्तीला कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी  करणं आवडत नाही. मोठेपणाचं त्याला ओझं वाटतं. त्याच्या गुणांचं वर्णन केलं, तर पारध्याने चोहोकडून वेढलेले हरीणाप्रमाणे किंवा पोहताना भोवर्‍यात सापडणार्या  पोहणार्यासारखी त्याची गत होते. आपली पूज्यता आपल्या डोळ्यांनी पाहू नये, आपली कीर्ति आपण कानांनी ऐकू नये, आपली लोकांना आठवणच होऊ नये असं त्याला वाटतं. सत्काराचा तर प्रश्नच नाही. कोणाकडून आदराची अपेक्षा नसते. कोणी नमस्कार केला, तर मेल्याहून मेल्यासारखं होतं. बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता प्राप्त झाली, तरी तो वेड पांघरतो. शहाणपण लपवून ठेवतो. त्याला प्रसिद्धीची शिसारी असते. व्यर्थ वादविवाद करण्याचा कंटाळा असतो.

 लोकांनी आपला अनादरच करावा. नातलगांनी आपल्याला थाराच देऊ नये अशी त्याची इच्छा असते. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' म्हणत निसर्गाशीच त्याची सोयरिक जमते. ज्या कृतीने नम्रता अंगी बाणेल, त्याच गोष्टी तो करतो. आपल्या आस्तित्वाचं जगाला भान नसावं अशा प्रकारचा त्याचा आयुष्यक्रम असतो. त्याला एकांत फार आवडतो. ही सुचिन्हे ज्याच्या चरित्रात आढळतात तो ज्ञानमार्गाचा वारकरी समजावा. माऊली म्हणतात, किंबहुना ऐसीं । चिन्हें जया देखसी ।जाण तया ज्ञानेंसीं । शेज जाहली ॥

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

मान सोडा सन्मान मिळेल
मान सोडा सन्मान मिळेल



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या