वृद्धअवस्थेतही सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉटने केलेल्या लाठीहल्ल्यात जखमी झाल्यानंतर लाला लजपतराय म्हणाले, "आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील." आज त्यांचा स्मृतिदिन. त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत्। राष्ट्र हितासाठी व्यक्ती, कुटुंब, गाव अशा संकुचित स्वार्थाचा त्याग करावा. हसत हसत आपल्या प्राणाची समिधा स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात अर्पण करणारे अनेक नररत्न या भारतमातेच्या कुशीत जन्माला आले.
रामाचं सीतेवर किती प्रेम होतं, याचं शब्दांत वर्णन करता येणार नाही. ते मूळ वाल्मिकी रामायणात संस्कृतातूनच वाचावं. दुष्ट रावणाने सीतेचं अपहरण केल्यानंतर रामाने केलेला विलाप दगडाच्याही काळजाला पाझर फोडतो. चक्रवर्ती सम्राट असूनही आपल्या प्रिय पत्नीसाठी नाशिक ते श्रीलंका अनवाणी पायाने चालत जातो. रावणासारख्या महाबलढ्य शत्रुसोबत वनवासी वानरांना घेऊन लढतो. तोच राम राष्ट्राचा विचार आला, की आपल्या प्रियतमेचा त्याग करतो. स्वतःचा मामा जरी व्यापक समाजहिताला बाधा आणीत असेल, तर त्याला सिंहासनावरून खेचूनच मारला पाहिजे. हा विचार कृतीत आणणारा श्रीकृष्ण आमचा मार्गदर्शक आहे. वास्तविक भीष्म, द्रोण धार्मिक आणि तपस्वी होते; पण अन्यायाच्या बाजूने उभे असतील, तर त्यांना मारणे कर्तव्यच आहे, असा विचार मांडणारी श्रीमद्भगवद्गीता आज जगाच्या तत्त्वज्ञानाचा मुगुटमणी आहे.
0 टिप्पण्या