जिच्यावर तुमचा फार जीव असतो, त्या व्यक्तीचं मन दुसरीकडेच अडकलेलं
असतं. हे आपल्याला कळतं; पण वळत नाही. राजा भर्तृहरीला हे कळलं आणि त्याने राज्यत्याग केला.
आपल्याकडून त्याग घडत नाही. आपण अजूनच चिकटून बसतो. त्यामुळे वरचेवर दु:खांचा सामना करावा लागतो. तुम्ही
ज्याच्याप्रति समर्पित असता, त्याला तुमची किंमत कधीच कळत नाही. घरातला एक मुलगा
कुटुंबासाठी आपली जवानी खर्च करतो. दुसरा आयुष्यभर टवाळ्या करतो. तरीही घरातले
ज्येष्ठ त्याचीच तळी उचलतात. उद्या एकत्र कुटुंब विभक्त व्हायची वेळ आल्यावर,
ज्याने आपल्या सुखाचा त्याग करून सर्वांच्या सुखाचा विचार केलेला असतो; त्याला शेलका वाटा कधीच मिळत
नाही. ज्याने सर्वाधिक खस्ता खाल्ल्या त्याला, पस्तावा करण्याची वेळ येते.
प्रामाणिकपणे काम करणारी सून सासूला क्वचितच आवडते.sadosh-goshti-soda
आईवडील रात्रंदिवस तुमच्या हितासाठी
खपतात. त्यांचा हिताचा शब्द तुम्हाला कडू लागतो. जे मित्र वाईट सवयी लावतात,
त्यांचे बोल 'ब्रह्मवाक्य' वाटतात. गोड बोलून घर फोडणारी भावकी घरातल्यांपेक्षा प्रिय वाटते.
बर्याचदा परके वाट दावतात. जवळचे वाट लावतात. दारू, सिगारेट, जुगार ह्या सवयी
शत्रुंमुळे लागत नाहीत. समाज ज्यांना हिरो मानतो तेच लोक समाजविघातक गोष्टींच्या
जाहिराती करतात. अशा गोष्टींचा वेळीच त्याग केला पाहिजे. ज्या व्यक्तीजवळ दया आणि
धर्म नाही तिला सोडून द्या. ज्याच्याजवळ अध्यात्मिक ज्ञान नाही अशा गुरूचा त्याग
करा. जिच्या चर्येवर कायम घृणा असेल अशी व्यक्ती कितीही प्रिय असली तरी दूर करा.
ज्या नातेवाईकांचं तुमच्यावर प्रेम नाही, त्यांना बाजूला सारा. त्यजेध्दर्म
दयाहीनं विद्याहीनं गुरुं त्यजेत्। त्यजेत्क्रोधमुखीं भार्यान्निं
स्नेहानबंधवांस्त्यजेत्।।
चुकीच्या गाडीत बसलात तर इच्छित स्थळी
कसे पोचणार? आपण जगतो तो समाज मायेचा बाजार आहे. जेथे दु:खरुपी माल आलेला आहे. तो
मृत्यूच्या मापाने मोजला जातो आहे. अशा बाजारात एखादा शेवटी शेवटी खरेदीला गेला, तर त्याच्या पदरात काय पडेल? आपलीही तीच गत झालेली आहे.
आपल्याला सुख नावाचा माल खरेदी करायचा आहे. तो इथे मिळणारच नाही. राख कितीही
फुंकली तरी त्यातून आग प्रज्वलित करून दिवा लावता येत नसतो. भलत्या जागी भलती
अपेक्षा करू नये. माऊली म्हणतात, आंता सुखेसि जीविता । कैचीं ग्राहिकी किजेल
पंडुसुता । काय राखोंडी फुंकिता । दीपु लागे?।।
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
0 टिप्पण्या