अभिमान

 
        टीचभर पोटासाठी आटापिटा केला जातो. पोट भरलं की, इच्छेला नवनवे धुमारे फुटतात. आपण सर्वश्रेष्ठ असावं. आपल्या बरोबरीचाही कोणी असू नये, अशी मनोधारणा बनते. दुसर्याशी तुलना सुरू होते. दुसरा कसा आपल्यापेक्षा हलका आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी व्यक्ती कितीही चांगली असली, तरी तिचे फक्त दोषच पाहिले जातात. तिचे दुर्गणच समाजात मोठे करून दाखविले जातात. परिणामी ज्याचे दोष चर्चिले जातात, ते शुध्द होत जातात. पण त्यांच्या दोषांचं वर्णन करणार्यांची वाचा मलीन होते. मलीन वाचेच्या वाटेने ते दोष त्याच्या चरित्रात प्रविष्ट होतात. अर्थहीन अभिमान मिरवताना समोरच्याने स्वत:हून मान द्यावा, असंही आपलं व्यक्तीमत्व उरत नाही.
abhiman,अभिमान
abhiman

            संपूर्ण विश्वाचा विश्वास वेदांवर आहे. सर्व जग ईश्वराला पूजनीय मानते. म्हणून आनंदाने कोणी वेद आणि ईश्वर यांचं वर्णन करायला लागलं, तर आभिमानी व्यक्ती मत्सराने पेटून उठतो. गर्वाने फुगतो. सगळ्या सार्वभौम जगाचं नायकत्व आपल्या पायाशी असावं आणि आपल्याला कधी मृत्यू येऊच, नये अशी, त्याची  महत्वाकांक्षा बनते. विश्वाच्या पसार्यात आपल्या संपुर्ण सूर्यमालेचंच स्थान नेमकं एका बिंदुएवढं आहे, की त्यापेक्षाही कमी, याचा नेमका पुरावा अजून मानवजातीला सापडलेला नाही. पृथ्वीचा विचार केला तरी अजूनपर्यंत पृथ्वीवरच्या फक्त पाच टक्केच रहस्यांचा उलगडा मानवाला झालेला आहे. त्यातल्या कुठल्याशा चिमूटभर कोपर्यात सन्मान मिळाला, की व्यक्ती हवेत चालायला लागते. नसलेल्या मोठेपणाची झूल अंगावर चढवली, की जग तुच्छ वाटायला लागते.
        ईश्वराला खाऊन टाकावे की काय, असे त्याला वाटते. आपल्या पेक्षा ज्ञानी कोणीच नाही, अशी त्याची भावना होते. वेदांना विष द्यावे. एनकेनप्रकारेन जगातलं प्रस्थापित ज्ञान उडवू लावावं, म्हणजे जग कायम आपले गोडवे गाईल, अशी मनोराज्ये रचतो. यासाठीच तो आपली सगळी शक्ती खर्च करतो. पतंगाला ज्योत आवडत नाही. सूर्याच्या तेजाने काजव्याला खंत वाटते. टिटवी समुद्राशी वैर धरते. आभिमानी व्यक्तीचा आभिमान या स्तराला पोचलेला असतो, की त्याला ईश्वराचं नावही सहन होत नाही. घरात जन्मदाता बाप कारभारी असेल, तर तेही त्यांना सहन होत नाही. बापाला सुध्दा सवतीप्रमाणे वागणूक देतात. खरंतर असं वागणं म्हणजे सोन्यासारख्या आयुष्याचा नरक केल्यासारखे आहे. माऊली म्हणतात, ऐसा मान्यतेचा पुष्टगंडु । तो अभिमानी परमलंडु । रौरवाचा रूढु । मार्गुचि पै ॥
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
अभिमान, abhiman
abhiman


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या