अंतरातला राम जागवूयात

             कालपरवा एकाने पाठीमागून आमच्या गाडीला धडक दिली. त्याला काहीही बोललो नाही. क्षमा केली. पण आपल्याच बाबतीत असं का घडावं? असा विचार वारंवार मानात येत होता. टेन्शनमध्ये संध्याकाळी झोपताना लेकीला गोष्टही सांगितली नाही. या पार्श्वभूमीवर राम आठवतो. आज आपला राज्याभिषेक होणार, या सुखस्वप्नात रमलेला राम कैकेयीच्या तोंडून ऐकतो, सप्त सप्त च वर्षाणि दण्डकारण्यमाश्रितः। अभिषेकमिमं त्यक्त्वा जटाजिनधरो वस।। राज्याभिषेक विसरा. वल्कले धारण करू चौदा वर्षांसाठी  दण्डकारण्यात जा! रामाच्या चेहर्यावर दु:खाची पुसटशीही छटा उमटली नाही. वाल्मिकी लिहितात, श्रुत्वा न विव्यत्थे राम: इतकी भयानक गोष्ट ऐकूनही राम विचलित झाला नाही.

awaken-the-ram-within
awaken-the-ram-within

                रामसीतेच्या संकटांचा विचार केला तर आमच्या समोरच्या समस्या क्षुल्लकच आहेत. ज्याच्या घोड्यांच्याही अंगावर अफाट सोनं आहे, त्याला झाडांच्या साली नेसून बिन पायताणाचं रानोमाळ भटकावं लागलं. राजर्षी जनकाची कन्या, महासम्राट दशरथाची सून आणि जगाच्या मालकाची पत्नी, जिला सूर्यानेही कधी पाहिली नव्हती, ती सीता वनवासी झाली. पण त्या वनवासातही स्वर्ग निर्माण केला दोहोंच्या प्रेमाने. एकमेकांशिवाय त्यांना स्वर्गही नको वाटतो. दीनो वा राज्यहीनो वा यो मे भर्ता स मे गुरू:।। पतिपत्नींच्या अंतकरणात सीता-रामाचे गुण प्रकट झाले, तर जगातले निम्मे घटस्फोट आणि आत्महत्या थांबतील.

                नाग्निर्नान्यानि शस्त्राणि न न: पाशा भयावहा: । घोरा: स्वार्थप्रयुक्तास्तु ज्ञातयो नो भयावहा: आम्हाला अग्नी, इतर शस्त्र तसेच पाश यांपासून कसलंही भय नाही. आम्हाला खरं भय आमच्या स्वार्थी जातभाईंपासूनच आहे. हे रावणाच्या तोंडचं वाक्य आजही सत्य आहे. रामाचा परिवार याच्या उलट आहे. आजचा सगळा संघर्ष सत्तेसाठीच आहे. राम-भरताचा संघर्ष निराळा आहे. दोघांनाही खुर्ची नकोय. त्यांना सत्तासुंदरी मोहवित नाही. जगाच्या इतिहासात इतक्या मोठ्या साम्राज्याच्या सिंहासनावर आपल्या भावाच्या पादुका ठेवून राज्य चालविलेलं उदाहरण दुसरं नाही. साम्राज्यासाठी आलेलं प्रत्येक पत्र पहिल्यांदा पादुकांना निवेदित केलं जायचं आणि मग भरत त्यावर कार्यवाही करायाचा. प्रत्येक आदेश पादुकांना दाखवून घोषित केला जायचा. सत्तेच्या परिघात राहून इतकं प्रेम कुठल्याही परिवारात पहायला मिळत नाही.

                अयोध्येतील सर्वच नागरिक रामाची प्रतिमुर्ति वाटावेत असे होते. राज्यात भिकारी, दरीद्री कोणीही नव्हता. सर्व जातिवर्णांच्या लोकांना समान मान होता. स्त्रीला पुरूषाच्या बरोबरीचा दर्जा होता. आज रामाची प्रतिष्ठापना प्रत्येक भारतीयाने आपल्या अंत:करणात केली, तर खरं रामराज्य येईल. वैययक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय जीवनात राम जागवावा लागेल. राम प्रत्येकाच्या अंत:करणात आहेच. पण काळाच्या प्रभावाने आणि काही स्वार्थांधांच्या बुध्दीभेदाने त्या रामस्वरूपावर भ्रमाचा पडदा पडलाय. तो दूर केला तर सर्वांना रामराज्याच्या प्रकाशाचा अनुभव  येईल. माऊली म्हणतात सर्वांघटी राम देहादेही एक । सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी।।

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

अंतरातला राम जागवूयात,awaken-the-ram-within
awaken-the-ram-within


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या