युवान होऊयात

 
        तारूण्य ही जीवनातली सर्वांत सुंदर अवस्था आहे. पैसा कमावण्यासाठी व्यक्ती तारूण्य खर्च करतो. तोच पैसा कितीही खर्च केलात, तरी तारूण्य पुन्हा मिळत नाही. यौवनात जे साध्य करता येतं, ते आयुष्याच्या कोणत्याच टप्प्यात करता येत नाही. जगाचा इतिहास उष्ण रक्ताच्या युवकांच्या शौर्याने आकाराला आलेला आहे. स्वामी विवेकानंद म्हणत, 'Give me hundred Nachiketas, I shall change the whole world.' नचिकेतासारख्या तेजस्वी वृत्तीचे शंभर तपस्वी कार्यतत्पर युवक मला द्या. मी अवघे विश्व बदलून टाकीन. दुर्दैवाने आजच्या युवकांना हा नचिकेता कोण, हेच माहित नाही.
yuvan-houyat
yuvan-houyat

            यौवन म्हणजे चैतन्याचा अखंड निर्झर. सामर्थ्याचा महाप्रपात म्हणजे यौवन. यौवनाला दिशा दिली की, स्वत:सोबत विश्वाचीही दशा बदलते. चौदा वर्षे कंदमुळे खाऊन, वल्कले धारण करून, अनवाणी पायांनी अरण्य तुडवणार्या रामाने हजारो आततायी  राक्षसांचा नि:पात केला. रावणासारखा महान ब्रह्मराक्षस यमसदनी धाडला. राम अयोध्येच्या राजमहालातून वनवासासाठी बाहेर पडला, तेव्हा उणापुरा अठरा वर्षांचा होता. भरसभेत कंसाला सिंहासनावरून खेचून यमसदनी धाडणारा कृष्ण सोळा वर्षांचा होता. गीतेच्या ज्ञानगंगेला महाराष्ट्राच्या अंगणात घेऊन येणारा ज्ञानोबा सोळा वर्षांचा होता. रायरेश्वराच्या शिवलिंगाला आपल्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक करून मावळ मुलखातल्या बालकांसोबत हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारा शिवबा सोळा वर्षांचाच होता.
            शास्त्रकार म्हणतात, युवा स्यात् साधु युवाध्यायक: । अशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ:।। ज्याच्यामध्ये नवसर्जनाचा उत्साह असतो, त्याला युवा म्हणतात. युवान सन्मार्गी असावा. तारूण्यातच अविवेक घडतो. नियमांनी बांधलेले, शिस्तशीर जीवन असेल, तर तर यौवन समृध्द आयुष्याची पायाभरणी करतं. युवक सतत अध्ययनशील असला पाहिजे. कॉलेज संपलं, तरी शिक्षण थांबता कामा नये. स्वाध्यान्मा प्रमद: निराशा सावलीलाही उभी राहू नये. ज्या दिवशी फाशी दिले जाणार, त्या पहाटे भगतसिंग सूर्यनमस्कार घालत होते. माझी शक्ती पुढच्या जन्मात इंग्रजांशी लढायला कामात येईल, हा केवढा आशावाद! इतका दुर्दम्य आशावाद युवकांमध्ये असायला हवा. दृढनिश्चयापासून कधीही ढळत नाही, तोच युवक. सामर्थ्याचा पूजक म्हणजे युवक. यौवन म्हणजे सामर्थ्य. सामर्थ्य हेच जीवन. दुर्बलता म्हणजे मृत्यू. गेम खेळून-खेळून कुबड निघालेल्या युवकांनी याचा जरूर विचार करावा. सामर्थ्याची उपासना करणार्याला भगवंतच शक्ती-बुध्दिरूप बनून मदत करतो. माऊली म्हणतात, बळियांमाजी बळ। ते मी जाणे अढळ।बुध्दिमंतीं केवळ। बुध्दि ते मी।।
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - ९९२१८१६१८३
Yuvan houyat
Yuvan houyat


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या