दर्प

 

        लोकांना मिरवायची फार हौस असते. प्रत्येक गाढवाला वाटतं, लोकांनी आपल्याला सुंदर म्हणावं. जवळच्या कार्यक्रमात कोणी मिरवत असेल, तर ते समजू शकते. परंतु मिरवण्याची हौस याच्याही पलीकडे पोचलेली आहे. प्रत्यक्ष मिरवणं सोडा, मिरवलेलं मिरवणंही कित्येक दिवस मिरवलं जातं. त्याच्या खर्या खोट्या कहाण्या चघळल्या जातात. प्रत्येकाला कायम चर्चेत राहावंसं वाटतं. एखादा बाहेरून फजिती होऊन आला तरी, गावात आल्यावर आपण कसा पराक्रम वगैरे करून आलोत, याविषयी बाता मारत सुटतो.  लोकही कंटाळतात. शेवटी तर तो दिसला, की रस्ता बदलतात.  
दर्प
दर्प
           
           आजकाल तू मला ओवाळ, मी तूला ओवाळतो अशी फॅशनच आलीय. एकमेकांच्या संगनमताने एकमेकांना पुरस्कार दिले जातात. त्याचे बॅनर सार्वजानिक जागा अडवून चौकात लावले जातात. कार्यकर्त्याला आमदार झाल्यासारखं वाटतं. आमदाराला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसल्यासारखं वाटतं. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून अभिनंदनाचे सोहळे आयोजित केले जातात. कशासाठी? फक्त देखाव्यासाठी. आजच्या समाजात तुम्ही काय आहात, यापेक्षा तुम्ही काय दाखविता, हे महत्वाचं ठरू लागलं आहे. जाहिरात महत्वाची. अर्ध्या जगाची अर्थव्यवस्था नसेल, इतकी जाहिरातींची उलाढल आहे. उत्पादन काय दर्जाचं आहे, हे कोणी पाहत नाही. मॉलमधली चकाचक मांडणी, रिशेप्शनिस्टने खोटं हसून केलेलं स्वागत, यानेच तुम्ही हरखून जात. याचा फायदा घेऊन तुमचा लाभ उठविणारी लोक समाजात आहेत. अगदी भाजीपाल्याच्या बाजारापासून लग्नाच्या बाजारापर्यंत बढाया मारून लढाया जिंकल्या जातात.

                बढाईखोरपणा हा असूरीगुण आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायात देव आणि असूर यांच्या गुणांचं  वर्णन केलेलं आहे . असूरी वृत्तींच्या लोकात दर्प निसर्गत:च असतो. असूर म्हणजे काही मोठ-मोठे दात वा शिंगे असणारे लोक नसतातत. ते तुमच्या आमच्यातच राहतात. त्यांना लक्षणांवरून ओळखायचे असते. तुम्हालाही एखाद्या वेळी वातावरणाचा प्रभाव म्हणून बढाई माराविशी वाटली, तर समजून चाला, की तुमच्यातला असूर जागा झालाय.  जिथं देवत्व असतं, तिथेच असूरत्वही असतं. तुम्ही कशाला वाव देता, त्यावरून ठसरतं असूरत्व प्रगट होणार की देवत्व!

                दोन अक्षरं कळायला लागली तर मूर्खाला विद्वानांची सभाही फिकी वाटते. कुपाटीवर बसलेल्या सरड्याला वाटते आपण स्वर्गापेक्षाही उच्चासनावर बसलेलो आहोत. तबेल्यातला ठाणबंदी घोडा ऐरावतालाही कमी लेखतो. डबक्यातल्या माशाला डबकं समुद्रापेक्षाही मोठं वाटतं. दरिद्राला एक दिवस जरी पक्वान्न मिळालं तरी उड्या मारायला लागतो. एखाद्याला सुंदर स्त्री, धन, मान आणि स्तुती जर मिळाली तर त्याचे हात आभाळाला टेकतात. असं वागणं म्हणजे ढगाची सावली पडली म्हणून घर मोडण्यासारखं आहे. मृगजळाला पाहून आपला पाणवठा फोडून टाकण्यासारखं आहे. ही सगळी दर्पयुक्त व्यक्तीची लक्षणे आहेत. माऊली म्हणतात, किंबहुना ऐसैसें । उतणें जें संपत्तिमिसें । तो दर्पु गा अनारिसें । न बोलें घेईं ॥

रमेश वाघ, नासिक

संपर्क - ९९२१८१६१८३

darp,दर्प
दर्प


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या