हसण्यासाठी जन्म आपुला

 
            हसणं हा माणसाचा स्वभाव आहे. आज हसण्याचाच अभाव आहे म्हणून जगणं बेभाव आहे. कोणत्याही नवीन गोष्टीचं लेकरू हसून स्वागत करतं. मोठी माणसं बहुधा नाक मुरडून किंवा कपाळावर आठ्या पाडून स्वीकारतात किंवा नाकारतात. हीच कपाळावरची आठी मनात अढी निर्माण करते. मग गुंता वाढतच जातो. नात्यांचा आणि जगण्याचाही. माणूस जसजसा वयाने आणि अनुभवाने वाढत जातो, तसतसं त्याच्या चेहर्यावरचं हास्य मावळत जातं. बालक दिवसाला चारशे वेळा स्मित करतं. स्त्रिया  बासष्ट वेळा, तर पुरूष फक्त आठ वेळा. म्हणूनच  लेकराला भगवंताचं रूप मानतात, बहुतेक ठिकाणी रिसेप्शन टेबलवर आणि विविध कंपन्यांकडून कॉल करायला महिलाच असतात. हसणं संसर्गजन्य आहे. मुद्दा नाही कळला, तरी हसणार्याला पाहून आपसूक हसू उमलतं.
hasanyasathi-janm-apula,हसण्यासाठी जन्म आपुला
hasanyasathi-janm-apula
            हसायला पैसे लागत नाहीत. ज्या गोष्टी फुकट असतात, त्या वास्तविक अमूल्य असतात; पण त्याचं मूल्य आपल्याला कळत नाही. मग ती हवा असेल, पाणी वा हास्य. मोकळ्या हवेत गेलं, स्वच्छ पाण्यात पोहलं, की छान वाटतं. तसं मनापासून खळखळून हसलं, की मनावरचं मणामणांचं ओझं आपोआप उतरलं जातं. फिनलंड आणि ब्रिटनच्या संशोधकांनी नुकत्याच 'जर्नल ऑफ न्युरोसायन्स' नियतकालिकात प्रसिध्द केलेल्या अभ्यासानुसार व्यक्ती हसली, की मेंदूमध्ये 'एंडॉर्फिन' नावाचा स्त्राव वाढतो. एंडॉर्फिनची मात्रा वाढली, की तणाव निवळतो. वेदनांचा विसर पडतो. तणाव दूर होतात. म्हणून त्याला 'फिलगुड हार्मोन' म्हणतात. त्याची लस घ्यावी लागत नाही. तुझे आहे तुजपाशी ।
            श्रीमद्भगवद्गीता म्हणते, प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते । तुमचा मूड प्रसन्न असला, की आपोआप दु:खाचा विसर पडतो. एखाद्याविषयी तुमच्या मनात कितीही किंतु असू द्यात, त्याने तुमच्याकडे पाहून नुसतं स्माईल केलं, तरी मनं निवळतात. सांडलवंड करणार्या लेकरावर उगारलेला तुमचा हात, त्याचं निरागस हास्य पाहून आपोआप खाली येतो. मुखातून एक शब्दही न काढता थेट समोरच्याच्या हृदयाशी संवाद साधण्याचं साधन म्हणजे हास्य. कित्येक प्रेमकहाण्या  अशा निर्हेतूक हास्यातूनच फुललेल्या आहेत. हसा, हसवा आणि आनंदाचा दरवळ दाही दिशांतून उधळून द्या. नवीन वर्षात जास्तीत जास्त हसरं बनण्याचा प्रयत्न करूयात. हास्याने प्रसन्नता येते. चित्त प्रसन्न झालं की, जगातलं कोणतंही दु:ख, दु:
खच वाटत नाही. माऊली म्हणतात, देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता ।तेथे रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥ 
रमेश वाघ, नाशिक
संपर्क ९९२१८१६१८३
hasanyasathi-janm-apula, हसण्यासाठी जन्म आपुला
hasanyasathi-janm-apula


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या